White House Aliens Website controversy: अमेरिकेत कायदेशीर परवानगीशिवाय राहणाऱ्या लोकांच्या अटकेची माहिती देण्यासाठी व्हाईट हाऊसने अंतराळ संकल्पनेवर (space-themed) आधारित एक नवीन वेबसाईट सुरू केली आहे. यामध्ये विनापरवाना स्थलांतरितांचा उल्लेख करण्यासाठी सहसा परग्रहवासीयांसाठी वापरल्या जाणाऱ्या प्रतिमा आणि भाषेचा वापर करण्यात आला आहे. गुरुवारी सुरू करण्यात आलेल्या या वेबसाईटची रचना सायन्स-फिक्शन (विज्ञान कथा) चित्रपटांची आठवण करून देणारी आहे. यात तारे आणि आकाशगंगांच्या पार्श्वभूमीवर निऑन-हिरव्या रंगाचे स्क्रोलिंग टेक्स्ट दिसत आहे.
पेज उघडताच भेट देणाऱ्यांचे स्वागत “They walk among us” (ते आपल्यातच वावरतात) या संदेशाने होते. ट्रम्प प्रशासनने कायम विनापरवाना स्थलांतरितांना ‘अॅलियन्स’ (Aliens) म्हणून संबोधलं आहे. Aliens.gov या डोमेन अंतर्गत होस्ट केलेली ही वेबसाईट राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या इमिग्रेशनवरील व्यापक कारवाईचा एक भाग आहे. अमेरिकन इमिग्रेशन अँड कस्टम्स एन्फोर्समेंटद्वारे केलेल्या कायदेशीर कारवायांचे प्रदर्शन करणे हा या वेबसाईटचा उद्देश आहे. वेबसाईटवर नमूद केले आहे की, “६० वर्षांपासून अमेरिकन सरकारने एक गुपित अतिशय काळजीपूर्वक जपून ठेवले आहे. अॅलियन्स आपल्यातच वावरत आहेत, आपल्या शेजारी राहत आहेत आणि आपल्या दैनंदिन जीवनात आपल्याशी संवाद साधत आहेत.” पुढे त्यात म्हटले आहे, “पण यात एक अपवाद आहे ते येथे राहण्यास पात्र नाहीत.”
लाईव्ह डॅशबोर्डही उपलब्ध
या प्लॅटफॉर्मवर देशातील इमिग्रेशनशी संबंधित कारवाया आणि अटक यांचा मागोवा घेणारा एक लाईव्ह डॅशबोर्ड देखील समाविष्ट आहे. गुरुवारी संध्याकाळी या काउंटरवर ३१ लाखांपेक्षा जास्त कारवायांची संख्या दिसत होती. परंतु, वेबसाईटवर ही आकडेवारी नेमकी कोणत्या कालावधीतील आहे हे स्पष्ट करण्यात आलेले नाही. व्हाईट हाऊस या प्लॅटफॉर्मचा वापर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या इमिग्रेशन अजेंडाचा प्रचार करण्यासाठी देखील करत आहे. ट्रम्प यांनीच अमेरिकन नागरिकांना विनापरवाना स्थलांतरितांमुळे निर्माण होणाऱ्या धोक्यांबद्दल सर्वात आधी चेतावणी दिली होती, असा दावा यात करण्यात आला आहे.
“राष्ट्राध्यक्ष ट्रम्प हे पहिले नेते होते ज्यांनी प्रत्येक अमेरिकन कुटुंब, समुदाय आणि आपल्या देशाच्या भविष्यासाठी अॅलियन्स निर्माण करत असलेला खरा धोका ओळखून त्याविरुद्ध आवाज उठवला”, असे या वेबसाईटवर म्हटले आहे.
इंटरअॅक्टिव्ह मॅपद्वारे अटकेचा मागोवा
या वेबसाईटचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे युनायटेड स्टेट्समधील इमिग्रेशन अंमलबजावणीच्या कारवाया दर्शवणारा एक इंटरअॅक्टिव्ह मॅप (नकाशा) आहे. ‘ICE’ च्या डेटाचा वापर करणाऱ्या या नकाशाद्वारे युजर्स वैयक्तिक राज्ये आणि शहरांमधील अटकेची माहिती शोधू शकतात. यामध्ये ताब्यात घेतलेल्या व्यक्तींचा मूळ देश, त्यांच्यावरील गुन्हेगारी आरोप किंवा गँगशी असलेले संबंध याची माहिती मिळते. याशिवाय, प्रशासन ज्यांना ‘संशयास्पद अॅलियन्स’ म्हणते, त्यांच्याबद्दल माहिती सबमिट करण्यासाठी नागरिकांना प्रोत्साहित करणारा एक रिपोर्टिंग फॉर्म देखील येथे उपलब्ध आहे. या वेबसाईटवर इमिग्रेशन अंमलबजावणीचे हजारो पानांचे रेकॉर्ड्स आणि ऑपरेशन्सचा डेटा आहे. देशभरातील कारवायांचे हे सर्वसमावेशक विहंगम दृश्य असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. बेकायदेशीर इमिग्रेशनच्या प्रभावाकडे जनतेचे लक्ष वेधून घेण्यासाठी हा प्रयत्न असल्याचे व्हाईट हाऊसच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
एका अधिकाऱ्याने फॉक्स न्यूज डिजिटलशी बोलताना सांगितले की, “मागील प्रशासनाच्या कमकुवत सीमा धोरणामुळे केवळ सीमावर्ती राज्यांमधील कुटुंबेच नाही, तर देशभरातील अनेक लोक धोक्यात आले होते, या वस्तुस्थितीकडे लोकांचे लक्ष वेधण्याचा हा अशा प्रकारचा पहिलाच प्रयत्न आहे.”
ट्रम्प प्रशासनाचा दबाव वाढला
ट्रम्प प्रशासन देशभरात इमिग्रेशन विरोधी कारवायांचा विस्तार करत असतानाच ही वेबसाईट लाँच करण्यात आली आहे. देशात बेकायदेशीरपणे राहणाऱ्या लोकांना मोठ्या प्रमाणावर हाकलून लावण्याच्या ट्रम्प यांच्या आश्वासनाचा भाग म्हणून, डिपार्टमेंट ऑफ होमलँड सिक्युरिटीने अटक आणि हद्दपारीचे प्रयत्न तीव्र केले आहेत.प्रशासनाने अमेरिकेत बेकायदेशीर प्रवेशाला आळा घालण्यासाठी नवीन निर्बंध आणि अंमलबजावणीचे उपाय देखील लागू केले आहेत. वेबसाईट लाँच होण्यापूर्वी व्हाईट हाऊसने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर एक टीझर व्हिडिओ जारी केला होता. यामध्ये ‘Loading’ हा शब्द असलेल्या क्रॉप-सर्कलसारख्या रचनेवर सर्चलाईट फिरताना दिसत होता, ज्यामुळे या नवीन पोर्टलच्या उद्देशाबद्दल उलटसुलट चर्चांना उधाण आले होते.
