Donald Trump White House UFC post shared during US Iran conflict and Pakistan negotiations : अमेरिका आणि इराण यांच्यात संघर्ष संपवण्यासाठी सुरू असलेल्या वाटाघाटींबाबत अनिश्चितता असताना, व्हाईट हाऊसने डोनाल्ड ट्रम्प यांचा फोटो असलेली एक गूढ पोस्ट शेअर केली आहे. “लॉक्ड इन मोड : अॅक्टिव्हेटेड, आज सोमवार आहे. कोणतेही कारणे नाही. फक्त विजय,” असे कॅप्शन देण्यात आले आहे.
या पोस्टमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी युएफसी-स्टाईल चॅम्पियनशीप बेल्ट परिधान केलेले दिसत आहे. याबरोबरच या फोटोवर स्मार्टफोनच्या फोकस मोड इंटरफेसप्रमाणे ‘डू नॉट डिस्टर्ब’, ‘वर्क’, स्लीप” आणि ‘लॉक इन’ अशा वेगवेगळ्या प्रॉम्ट्स दाखवण्यात आल्या आहेत.
२०२५ मध्ये अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदावर निवडून आल्यानंतर ट्रम्प यांनी अनेकदा युएफसी स्पर्धांना भेटी दिल्या आहेत. या ट्रम्प यांनी अनेक हाय-प्रोफाइल युएफसी स्पर्धांना हजेरी लावली आहे. यातून या खेळाशी आणि त्याचे अध्यक्ष दाना व्हाईट यांच्याशी असलेले त्यांचे जुने संबंध वारंवार अधोरेखित होत आले आहेत. एप्रिल २०२५ मध्ये मियामी येथील एका युएफसी इव्हेंटमध्ये ट्रम्प खेळाडूंशी बोलताना दिसून आले होते.
जून २०२५ मध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी न्यू जर्सी येथील युएफसी ३१६ या कार्यक्रमाला देखील हजेरी लावली होती. एप्रिल २०२६ मध्ये, ट्रम्प मियामीमधील एका युएफसी कार्यक्रमात दिसले होते, जिथे फायटर पाउलो कोस्टाबरोबर त्यांनी साधलेला संवाद चांगलाच व्हायरल झाला होता. ट्रम्प अमेरिकेचा २५० वा वर्धापन दिनाच्या सोहळ्याचा भाग म्हणून जून २०२६ मध्ये व्हाईट हाऊसमध्ये ‘फाईट कार्ड’ आयोजित करण्याची विचारात आहेत. या पार्श्वभूमीवर ट्रम्प या युएफसी कार्यक्रमांना उपस्थित राहत आहेत.
इराणने सोमवारी अमेरिकेबरोबरच्या चर्चेच्या नव्या फेरीत सहभागी होण्याचा आपला कोणताही विचार नसल्याचे स्पष्ट केल्यानंतर ही पोस्ट समोर आली आहे.
ट्रम्प म्हणाले होते की संघर्ष संपवण्यासाठीच्या चर्चेकरिता ते वाटाघाटीकारांना पाकिस्तानला पाठवत आहेत, मात्र त्यांनी जर करार झाला नाही तर इराणच्या ऊर्जा संबंधी पायाभूत सुविधांना लक्ष्य केले जाऊ शकते असा इशारा दिला होता.
या महिन्याच्या सुरुवातीला देखील इस्लामाबादमध्ये अमेरिका आणि इराण यांच्यात चर्चा झाली होती, मात्र या चर्चेतून कोणताही तोडगा निघू शकला नाही. तेव्हापासून दोन्ही देशांनी एकमेकांवर शस्त्रसंधीचे उल्लंघन केल्याचा आरोप केला आहे. अमेरिकेने इराणचे एक मालवाहू जहाज जप्त केल्यानंतर तणाव अधिकच वाढला असून, ट्रम्प यांच्या म्हणण्यानुसार हे जहाज नौदलाची नाकेबंदी ओलांडून जाण्याचा प्रयत्न करत होते.
“वाटाघाटींच्या पुढच्या फेरीसाठी आमचे कोणतेही नियोजन नाही, या संदर्भात अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही,” असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बकाई (Esmaeil Baqaei) यांनी म्हटले आहे.
