Deep dive into Donald Trump Iran news and the secret White House strategy behind the pilot rescue mission : मघ्यपूर्वेतील संघर्षादरम्यान इराणमध्ये अमेरिकेचे लढाऊ विमान पाडल्यामुळे व्हाईट हाऊसमध्ये मोठा गोंधळ उडाला होता. यावेळी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे त्यांच्या सहाय्यकांवर ओरडत होते. यादरम्यान जेव्हा प्रशासनाचे अधिकारी हे इराणध्ये अडकलेल्या वैमानिकाला वाचवण्यासाठी ‘हाय-रिस्क’ मोहिमेची आखणी करत होते, तेव्हा डोनाल्ड ट्रम्प यांना त्या खोलीच्या म्हणजेच वॉर-रूमच्या बाहेर ठेवण्यात आले होते, असे वृत्त वॉल स्ट्रीट जर्नलने दिले आहे.

जेव्हा डोनाल्ड ट्रम्प यांना दोन अमेरिकन वैमानिक बेपत्ता असल्याचे सांगण्यात आले तेव्हा, ‘गुड फ्रायडे’च्या दिवशी हा प्रकार घडला. रिपोर्टनुसार, इराणच्या सीमेत कारवाई करणे अत्यंत गुंतागुंतीचे असताना देखील, ट्रम्प यांनी तातडीने कारवाई करत बेपत्ता वैमानिकांना परत आणण्यात यावे अशी मागणी लष्कराकडे केली.

कित्येक वर्षांपासून अमेरिकेने इराणच्या भूमिवर कुठलीही प्रत्यक्ष लष्करी कारवाई केलेली नव्हती, अशावेळी कुठल्याही प्रकारची बचाव मोहिम राबवण्यापूर्वी शत्रूच्या प्रदेशात कसा प्रवेश करायचा आणि इराणी सैन्याच्या नजरेत न येता वैमानिकाना कसे बाहेर काढायचे, यासाठीचे अमेरिकन लष्कराला नियोजन करण्यास भाग पाडण्यात आले.

या रिपोर्टमध्ये देण्यात आलेल्या माहितीनुसार, ट्रम्प यांच्या उतावळेपणामुळे नियोजनात अडथळा येऊ शकतो, अशी भीती त्यांच्या सहकाऱ्यांना वाटत होती. त्यामुळे प्रत्येक मिनिटांच्या अपडेट्स मिळत असतानाही त्यांनी ट्रम्प यांना फक्त काही मोजक्या महत्त्वाच्या घटनांचीच माहिती दिली, असे एका वरिष्ठ प्रशासकीय अधिकार्‍याच्या हवाल्याने रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे.

या घटनेमुळे ट्रम्प यांच्या मनात जिमी कार्टर यांच्या कार्यकाळात १९७९ साली घडलेल्या इराण ओलीस संकटाची (Iran hostage crisis) पुनरावृत्ती होण्याची भीती निर्माण झाली होती. या घटनेचे ट्रम्प यांनी यापूर्वी राजकीय संकट असे वर्णन केले होते. “जर तुम्ही जिमी कार्टर यांच्या बाबतीत काय घडलं हे पाहिलं… हेलिकॉप्टर्स आणि ओलिसांच्या घटनेमुळे जे घडले, त्यामुळे त्यांचा निवडणुकीत पराभव झाला,” असे ट्रम्प यांनी मार्चमध्ये म्हणाले होते, तसेच त्यांनी या परिस्थितीचे पूर्णपणे गोंधळाची स्थिती असे वर्णन केले होते.

दरम्यान इराणमध्ये विमान पाडण्यात आल्यानंतर एका वैमानिकाला तात्काळ वाचवण्यात आले, तर दुसरा वैमानिक हा शत्रू प्रदेशात २४ तासांहून अधिक काल अडकून पडला होता, अखेर शनिवारी उशीरा एका अत्यंत जोखमीने भरलेल्या मोहिमेनंतर त्याला वाचवण्यात अमेरिकन लष्कराला यश आले आणि या यशस्वी मोहिमेमुळे प्रशासनावर ओढवू शकणारे एक मोठे संकट टळले.

बचाव मोहिमेच्या काही तासांनंतर डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली. त्यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे इराणला होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून कठोर शब्दात इशारा दिला. या पोस्टमध्ये ट्रम्प यांनी वापरलेल्या अपशब्दांमुळे सर्वांचे लक्ष याकडे वेधले गेले. व्हाईट हाऊसने मात्र राष्ट्राध्यक्षांच्या या परिस्थिती हाताळण्याच्या पद्धतीचे समर्थन केले. प्रेस सेक्रेटरी कॅरोलिन लेविट यांनी या संघर्षाच्या काळात ट्रम्प हे एक एक स्थिर नेतृत्व म्हणून कायम राहिले असल्याचे म्हटले.

दरम्यान, ताज्या घडामोडींनुसार होर्मुझच्या सामुद्रधुनीतील तणाव कायम आहे. अमेरिकन लष्कराने या भागात इराणचे एक मालवाहू जहाज जप्त केले आहे.