White House Correspondents’ Dinner shooting : अमेरिकेत व्हाईट हाऊस करस्पाँडेंट्स डिनर’मध्ये अत्यंत थरारक घटना घडली. देशातील अत्यंत वरिष्ठ नेते जिथे उपस्थित होते, तिथेच गोळीबार झाला. या हल्ल्यात सर्वच उपस्थित नेते थोडक्यात बचावले आहेत. दरम्यान, हा सर्व गोंधळ सुरू असतानाच हॉलमध्ये उपस्थित असलेल्या काही पाहुण्यांच्या विचित्र कृतीमुळे ते आता जगभरात ट्रोल होत आहेत. दरम्यान, हे पाहुणे म्हणजे पत्रकार असल्याचा दावा काही नेटिझन्सने केला आहे.

हॉलमध्ये गोळीबार झाल्यानंतर राष्ट्राध्यक्षांना सुरक्षितस्थळी हलवले जात असतानाच, प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी जीव वाचवून बाहेर पडण्याऐवजी महागड्या विंटेज वाईनच्या बाटल्या चोरताना कॅमेऱ्यात कैद झाले. लोकशाही आणि पत्रकारितेचा उत्सव म्हणून सुरू झालेल्या या संध्याकाळचे रूपांतर भीषण दहशतीत झाले, जेव्हा हॉलमध्ये गोळीबाराचे आवाज ऐकू आले. मात्र, सुरक्षा पथक राष्ट्राध्यक्षांचा जीव वाचवण्यात गुंतलेले असताना, मीडियाचे काही सदस्य बारमधील बाटल्यांवर डल्ला मारण्यात मग्न होते.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओंमध्ये पत्रकार विंटेज वाईनच्या न उघडलेल्या बाटल्या त्यांच्या कॅमेरा बॅग आणि टक्सिडो जॅकेटमध्ये भरताना दिसले. देश एका संभाव्य घटनात्मक संकटाचा सामना करत असताना, पत्रकार मात्र त्यांच्या घरातील बार भरण्यात व्यस्त होते. तासाभरातच ‘वाईन-गेट’ ट्रेंड होऊ लागले आणि टीकाकारांनी या वागणुकीला “पत्रकारितेची अधोगती” असे संबोधले.

‘X’ वरील एका वापरकर्त्याने लिहिले, “भावांनो, पत्रकारांना हॉलमधून बाहेर काढलं जातंय आणि हे लोक दोन-दोन बाटल्या घेऊन पळतायत, हद्द आहे!” तर @YourAnonCentral या युजरने व्हिडिओ शेअर करत म्हटले, “लोक जेव्हा जीव वाचवून पळत होते, तेव्हा यांनी बाटल्या लंपास केल्या.”

या घटनेमुळे अनेकांनी संताप व्यक्त केला, तरी इंटरनेटवरील एका वर्गाला या धिटाईचे आश्चर्य वाटले. काहींनी “राष्ट्रीय दुर्घटनेच्या वेळी लूटमार” करण्याच्या नैतिकतेवर चर्चा केली, तर एकाने गमतीत लिहिले, “राष्ट्राध्यक्ष सुखरूप आहेत, मग चांगली वाईन का सोडून द्यायची?”

हा धक्का बसल्यानंतर दिलेली प्रतिक्रिया होती की निव्वळ संधीसाधूपणा, यावर चर्चा सुरू आहे. मात्र, या प्रकारामुळे प्रसारमाध्यमांच्या प्रतिमेला मोठा तडा गेला आहे. एका टिप्पणीकाराने म्हटल्याप्रमाणे, “राष्ट्राध्यक्ष तर वाचले, पण या संध्याकाळी पत्रकारितेची प्रतिष्ठा मात्र नक्कीच दगावली.”