पीटीआय, न्यूयॉर्क, वॉशिंग्टन
‘अमेरिकेने भारताला रशियाकडून तेलखरेदी करण्याची तात्पुरती परवानगी दिली आहे. जे तेल यापूर्वीच जहाजांवर आहे, अशा तेलाची खरेदी करण्यासाठीची ही परवानगी आहे,’ असे वक्तव्य अमेरिकेतील व्हाइट हाउसच्या माध्यम सचिव केरोलिन लेव्हिट यांनी केले. ‘अमेरिकेचे भारतातील मित्र हे चांगल्या पद्धतीने नियमांचे पालन (गूड ॲक्टर्स) करतात,’ अशीही पुस्ती त्यांनी जोडली.
व्हाइट हाउसच्या माध्यम सचिव केरोलिन लेव्हिट पत्रकार परिषदेत म्हणाल्या, ‘अमेरिकेने गेल्या आठवड्यात पश्चिम आशियातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर रशियाकडून तेलखरेदी करण्यासाठी भारताला ३० दिवसांची तात्पुरती सूट दिली. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, अर्थमंत्री स्कॉट बेसेंट आणि राष्ट्रीय सुरक्षेसंदर्भातील सर्व सदस्या या निर्णयाप्रत आले, कारण भारतातील आमचे मित्र हे नियमांचे चांगले पालन करीत असून, त्यांनी यापूर्वी रशियाकडून तेलखरेदी थांबविली होती. त्यामुळे आम्ही ही तात्पुरती परवानगी दिली आहे. तसेच, रशियाचे हे तेल समुद्रातच आहे. ते स्वीकारण्यास आम्ही परवानगी दिली आहे. या तात्पुरत्या परवानगी रशियाला फारसा फायदा होणार नाही.’
विरोधकांची जोरदार टीका
लेव्हिट यांच्या वक्तव्यावर काँग्रेसने जोरदार टीका केली असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हे ‘शरणागतीचे प्रमामपत्र’ दिल्याचा आरोप केला. काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश म्हणाले, ‘अमेरिकेच्या अर्थमंत्र्यांनंतर आता अध्यक्ष ट्रम्प यांच्या माध्यम सचिवांनी मोदींना शरणागतीचे प्रमाणपत्र दिले आहे.’ दरम्यान अमेरिकेचे भारतातील राजदूत सर्जिओ गोर यांनी जागतिक बाजारपेठेत तेलाच्या किमती स्थिर ठेवण्यासाठी अमेरिकेचा भारत हा महत्त्वाचा भागीदार देश असल्याचे विधान केले.
