White House Shooting: गेल्या आठवड्यात व्हाईट हाऊस करस्पाँडेंट्स डिनरमध्ये गोळीबाराची थरारक घटना घडली. डोनाल्ड ट्रम्प, जे. डी. व्हान्स यांच्यासह अनेक बडे नेते आणि अधिकारी यावेळी घटनास्थळी हजर होते. गोळीबाराची ही घटना ताजी असताना सोमवारी व्हाईट हाऊसच्या परिसरात गोळीबाराची घटना घडली. व्हाईट हाऊसच्या परिसरात बंदूकधारी व्यक्तीने सीक्रेट सर्व्हिसच्या अधिकाऱ्यांवर गोळीबार केला. या चकमकीत संशयित व्यक्ती जखमी झाला आहे. दरम्यान, या घटनेमुळे व्हाईट हाऊसमध्ये काही काळ ‘लॉकडाऊन’ करण्यात आला होता.
सीक्रेट सर्व्हिसच्या अधिकाऱ्यांवर गोळीबार
अमेरिका सीक्रेट सर्व्हिसचे उपसंचालक मॅथ्यू क्विन यांनी गोळीबाराच्या घटनेबाबत पत्रकार परिषदेत माहिती दिली. वॉशिंग्टन डी.सी. मधील १५ वा मार्ग आणि इंडिपेंडन्स एव्हेन्यूच्या परिसरात ही घडली. व्हाईट हाऊस कॉम्प्लेक्सच्या बाहेर गस्त घालणाऱ्या एजंटना एक संशयित व्यक्ती आढळून आली. संशयित व्यक्तीकडे बंदूक असल्याचे दिसून आले. सीक्रेट सर्व्हिसच्या अधिकाऱ्यांनी विचारपूस करण्यासाठी जवळ जाण्याचा प्रयत्न केला असता, त्या व्यक्तीने पळ काढत अधिकाऱ्यांच्या दिशेने गोळीबार केला, अशी माहिती मॅथ्यू क्विन यांनी दिली.
चकमकीत संशयित जखमी
प्रत्युत्तर म्हणून सीक्रेट सर्व्हिसच्या जवानांनी देखील संशयित व्यक्तीच्या दिशेने गोळीबार केला यात, संशयित व्यक्ती जखमी झाला आहे. त्याला तात्काळ ताब्यात घेऊन रुग्णालयात दाखल करण्यात आले. या चकमकीत संशयिताच्या गोळीबारात एक पादचारी किरकोळ जखमी झाला आहे. जखमी झालेली ही व्यक्ती अल्पवयीन असल्याचे रॉयटर्सच्या वृत्तात म्हटले असून, त्याला देखील उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
जे.डी. व्हान्स यांचा ताफा याच भागातून गेला
संशयित व्यक्तीच्या संशयित हालचाली आणि शस्त्राच्या संशयावरुन सीक्रेट सर्व्हिसच्या जवानांनी त्याची चौकशी केली. दरम्यान, हा हल्ला राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना लक्ष्य करून करण्यात आला होता की नाही, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पण, याबाबत अधिक तपास सुरु असल्याचे क्विन यांनी स्पष्ट केले आहे. गोळीबाराची घटना घडण्यापूर्वी उपराष्ट्राध्यक्ष जे.डी. व्हान्स यांचा ताफा त्याच भागातून गेला होता, असे क्वीन माध्यमांशी बोलताना म्हणाले.
सुरक्षा यंत्रणा हाय-अलर्टवर
धक्कादायक बाब म्हणजे गोळीबाराची घटना घडली त्यावेळी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प व्हाईट हाऊसमध्येच उपस्थित होते. दरम्यान, ‘व्हाईट हाऊस करस्पाँडंट्स असोसिएशन’च्या मेजवानीदरम्यान झालेल्या गोळीबारानंतर वॉशिंग्टनमध्ये सुरक्षा यंत्रणा आधीच हाय-अलर्टवर आहे. संशयिताचे शस्त्र जप्त करण्यात आले असून, अधिक तपास सुरु असल्याची माहिती मॅथ्यू क्विन यांनी पत्रकार परिषदेत दिली.
