जागतिक आरोग्य संघटना ( WHO ) ने बुधवारी २६ जणांच्या तज्ञ समितीची घोषणा केली आहे. ही समिती जागतिक आरोग्य संघटनेसाठी ‘वैज्ञानिक सल्लागार गट’ म्हणून काम करणार आहे. नव्या रोगांची उत्पत्ती  ( Origins of Novel Pathogens – SAGO ) या विषयावर ही समिती जागतिक आरोग्य संघटनेला सल्ला देणार आहेत. विशेषतः करोना संसर्गाला कारणीभूत ठरलेल्या SARS-CoV-2 विषाणूसारखा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी ही समिती मार्गदर्शक तत्वे, नियमावली तयार करणार आहे. जगभरातून आलेल्या ७०० अर्जांमधून आरोग्य विषयक २६ तज्ञांची निवड करण्यात आल्याचं जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक डॉ टेड्रोस गेब्रेयसस यांनी जाहिर केलं आहे.

“नव्या विषाणूचा उगम होणं आणि यामुळे साथरोग किंवा करोनासारखा संसर्ग पसरणे हे निसर्गातील एक वास्तव आहे. SARS-CoV-2 हा काही शेवटचा विषाणू नाही. भविष्यातही जागतिक पातळीवर अशा प्रकारचे उद्रेक होऊ शकतात. अशा प्रकारचा धोका नेमका कुठे उद्भवू शकतो, कोणते विषाणू धोकादायक ठरु शकतात याबद्दल अंदाज बांधण्यासाठी तज्ञ लोकांची आवश्यकता आहे. म्हणूनच जगभरातून तज्ञांची निवड करत ‘वैज्ञानिक सल्लागार गट’ची स्थापना करण्यात आली आहे, ज्यांच्या मदतीने पुढील काळ अधिक सुरक्षित करण्याचा प्रयत्न करणार आहोत” असं डॉ टेड्रोस गेब्रेयसस यांनी स्पष्ट केलं आहे. 

या समितीच्या माध्यमातून विविध विषाणूंबाबत अभ्यास केला जाणार असून खास करुन करोना व्हायरसचा उगम नक्की कुठे झाला याचा शोधही घेण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न केला जाणार आहे. ही समिती चीनला जाणार की नाही हे स्पष्ट झालं नसलं तरी या समितीच्या निमित्ताने हा जागतिक आरोग्य संघटनेतर्फे केला जाणार हा एक शेवटचा प्रयत्न असेल. पुढील दोन आठवडे लोकांच्या सूचना स्वीकारल्यानंतर वैज्ञानिक सल्लागार गटाची पहिली बैठक होणार आहे. दीड वर्षानंतरही करोना संसर्गाच्या उगमाचे नेमके कारण काय याचा उलगडा अजुनही झालेला नाही. वटवाघुळांच्या मार्फत या विषाणूचा प्रसार झाला असावा असा अंदाज असला तरी त्याला कुठलाही वैज्ञानिक पुरावा नाही. 

SARS-CoV-2 या विषाणू मुळे करोना संसर्ग झाला होता, ज्याची सुरुवात चीनमधील वुहान इथे झाली होती. तेव्हा जगावर संकट कोसळलेल्या करोनाचा उमग हा चीनमध्येच झाला आहे अशी एक शक्यता वर्तवण्यात येत आहे. फेब्रुवारीमध्ये जागतिक आरोग्य संघटनेचे एक पथक चीनमध्ये गेलं होतं, पण हे पथक विषाणूच्या उगमाबाबत नेमका निष्कर्ष ते काढू शकलं नव्हतं.