Vietnam Boat Accident kills 15 Lava Mobile Employees: दक्षिण व्हिएतनाममधील फु क्वोक बेटाजवळ पर्यटनासाठी गेलेल्या ३२ भारतीय पर्यटक आणि चार कर्मचारी असलेली एक स्पीडबोट उलटून १५ जणांचा मृत्यू झाला. भारतीय दूतावासाने मृतांची नावे जाहीर केली आहेत. व्हिएतनामचे सर्वात मोठे बेट असलेल्या पर्यटनाच्या ठिकाणी ही दुर्घटना घडली. अपघात घडलेल्या बोटीमध्ये लाव्हा मोबाइल्सचे अनेक कर्मचारी आणि वितरक होते, अशी माहिती कंपनीच्या प्रतिनिधीने द इंडियन एक्सप्रेसला दिली.

जोरदार वारे आणि खवळलेल्या समुद्रामुळे बोट उलटली असावी, असा अंदाज व्हिएतनाममधील अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. मात्र अपघाताचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. या घटनेनंतर व्हिएतनाममधील भारतीय दूतावासाने तातडीने प्रतिसाद देत बचाव कार्यात मदत केली. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही जीवितहानीबद्दल दुःख व्यक्त केले.

मार्च २००९ मध्ये स्थापन झालेल्या लाव्हा मोबाइल्स कंपनीच्या कर्मचारी आणि वितरकांची सहल व्हिएतनामला गेली होती. एकूण तीन बोटीमध्ये कंपनीचे कर्मचारी पर्यटनाचा आनंद घेत होते. या दुर्घटनेत मृत्यू पावलेले कर्मचारी हे प्रामुख्याने तमिळनाडू, आंध्र प्रदेश आणि केरळ राज्यातील आहेत.

बोट कशी उलटली?

व्हीएन एक्सप्रेस इंटरनॅशनल आणि व्हिएतनाम न्यूजच्या बातमीनुसार, होन मे रुट न्गोआय बेटापासून ४०० मीटर अंतरावर स्पीडबोट उलटली. यात ३२ भारतीय पर्यटक आणि चार व्हिएतनामी खलाशी होते. फु क्वोक या विशेष आर्थिक क्षेत्रात हे बेट येते. या अपघातानंतर एकूण २१ जणांना वाचविण्यात यश आले तर १५ पर्यटकांचा मृत्यू झाला. तर दोन पर्यटकांची प्रकृती गंभीर आहे.

भारतीय दूतावासाने मृतांची नावे केली जाहीर

हनोईमधील भारतीय दूतावासाने ज्या १५ नागरिकांचा मृत्यू झाला, त्यांची यादी जाहीर केली आहे.

दूतावासाने एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये सदर यादी दिली. तर पोस्टमध्ये लिहिले, आज फु क्वोक बेटाजवळ झालेल्या अपघातात १५ जणांचा मृत्यू झाल्याची बातमी जाहीर करताना दुःख होत आहे. मृतांच्या कुटुंबीयांप्रती आम्ही संवेदना व्यक्त करतो. हो चि मिन्ह शहरातील दूतावास आणि वाणिज्य दूतावास सर्वतोपरी मदतीसाठी उपलब्ध आहे.

मृतांची नावे खालीलप्रमाणे:

सेंथिल कुमार जयवेल (तामिळनाडू)
मुरुगा प्रभू अरुमुगम (तामिळनाडू)
श्रीधर सुंदरराजन (तामिळनाडू)
शेख अब्दुल्ला अब्दुल मजीद (तामिळनाडू)
बालाजी नटेसन (तामिळनाडू)
विनय कुमार चिथापुरम भास्कर (तामिळनाडू)
रविशंकर सुगुमरण (तामिळनाडू)
संतोष कुमार शांतीलाल जैन (तामिळनाडू)
बाबू कुप्पुस्वामी (तामिळनाडू)
अलगुराजन शिवासामी (तामिळनाडू)
नल्लापेटा आदिशैया रवितेजा (आंध्र प्रदेश)
श्रीधर मुडियम (आंध्र प्रदेश)
जया लक्ष्मी गेल्ली (आंध्र प्रदेश)
एविकोट चेरियन थॉमस (केरळ)
लोवेनी थॉमस (केरळ)

मृतांमधील १५ पैकी १० जण एकट्या तमिळनाडूमधील आहेत. आंध्र प्रदेशचे तीन आणि केरळचे दोन नागरिक आहेत.

पंतप्रधान मोदींकडून शोक व्यक्त

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिएतनाममधील घटनेनंतर एक्सवर पोस्ट शेअर करत शोक व्यक्त केला. “व्हिएतनाममधील फु क्वोकजवळ घडलेली बोट अपघाताची दुःखद बातमी ऐकून अत्यंत दुःख झाले. ज्यांनी आपले प्रियजन गमावले आहेत, त्या कुटुंबियांप्रति माझ्या मनपूर्वक संवेदना व्यक्त करतो. भारतीय दूतावास आणि वाणिज्य दूतावास सर्वतोपरी मदत करत आहे”, अशी प्रतिक्रिया पंतप्रधान मोदींनी दिली.