उत्परिवर्तीत डेल्टा उपप्रकार प्रबळ ठरण्याची शक्यता

भारतात गेल्या आठवड्यात करोनाच्या सर्वाधिक (४,४१,९७६) प्रकरणांची नोंद झाली

जागतिक आरोग्य संघटनेचा इशारा

करोना संक्रमणाचा सध्याचा कल कायम राहिला, तर करोनाचा अधिक संक्रमित होऊ शकणारा डेल्टा हा उपप्रकार हा ‘प्रबळ कुळ’ (डॉमिनंट लायनेज) ठरू शकतो, असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) दिला आहे. आतापर्यंत ८५ देशांमध्ये डेल्टा आढळल्याची नोंद झाली असून तो जगातील अनेक ठिकाणी सापडतच आहे.

जगभरात, अल्फा उपप्रकाराची १७० देशांमध्ये किंवा क्षेत्रांमध्ये, बीटा ११९ देशांमध्ये, गॅमा ७१ देशांमध्ये, तर डेल्टा उपप्रकाराची ८५ देशांमध्ये नोंद झाली असल्याचे डब्ल्यूएचओने २२ जूनला जारी केलेल्या ‘कोविड-१९ वीकली एपिडेमिऑलॉजिक अपडेट’ मध्ये म्हटले आहे.

आतापर्यंत ८५ देशांमध्ये नोंद झालेला डेल्टा डब्ल्यूएचओच्या सर्व क्षेत्रांमधील नव्या देशांमध्ये अजूनही आढळत असून, त्यापैकी ११ ठिकाणी तो गेल्या दोन आठवड्यांत नव्याने आढळला, असे या अहवालात नमूद केले आहे.

सध्या ‘चिंताजनक उपप्रकार’ असलेले आणि बारकाईने देखरेख ठेवण्यात येत असलेले अल्फा, बीटा, गॅमा व डेल्टा हे उपप्रकार सर्वदूर पसरले असून जगभरात ते आढळले आहेत, असे डब्ल्यूएचओने सांगितले. ‘डेल्टा उपप्रकार हा अल्फा उपप्रकारापेक्षा अधिक वेगाने संक्रमित होऊ शकणारा असून, सध्याचा कल कायम राहिल्यास तो प्रबळ ठरणे अपेक्षित आहे’, याचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला आहे.

भारतात गेल्या आठवड्यात करोनाच्या सर्वाधिक (४,४१,९७६) प्रकरणांची नोंद झाली, जी गेल्या आठवड्याच्या तुलनेत ३० टक्क्यांनी कमी होती. नव्याने नोंद झालेल्या मृत्यूंची सर्वाधिक संख्याही (१६,३२९  भारतातील होती. हे प्रमाण १ लाखामागे १.२ इतके होते व ही घट ३१ टक्के आहे, असेही अहवालात म्हटले आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Who corona virus infection mutant delta subtypes likely to predominate akp

ताज्या बातम्या