इबोला व्हायरसबाबत WHO अर्थात जागतिक आरोग्य संस्थेने आणीबाणी घोषित केली आहे. कांगो या ठिकाणी आत्तापर्यंत इबोला व्हायरसमुळे ८८ लोकांचा मृत्यू झाला आहे. कांगो आणि युगांडा या ठिकाणी इबोला व्हायरसचा कहर पाहण्यास मिळतो आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे संचालक ट्रेडोस घेब्रेयसस यांनी आता या घटनेनंतर WHO कडून जागतिक आरोग्य आणीबाणी जाहीर केली आहे. कांगो आणि युगांडामध्ये इबोलाचे ३०० रुग्णही सकारात्मक आढळले आहेत.
WHO ने नेमकं काय म्हटलं आहे?
WHO ने दिलेल्या माहितीनुसार ही कोव्हिड १९ सारखी महामारी नाही. मात्र आंतरराष्ट्रीय सीमा बंद करण्याचा सल्ला WHO ने दिला आहे. तसंच कुणीही अनावश्यक प्रवास करु नका, व्यापारासाठीही आवश्यक नसेल तर परदेशवारी करु नका असं WHO ने म्हटलं आहे. WHO ने ज्या देशांमध्ये इबोलाचा प्रार्दुभाव झाला आहे त्या देशांना आम्ही सहकार्य करु असंही म्हटलं आहे. पीटीआयने हे वृत्त दिलं आहे.

१९७६ मध्ये पहिल्यांदा आढळला होता इबोलाचा रुग्ण
इबोला व्हायरसचा रुग्ण हा १९७६ मध्ये पहिल्यांदा आढळला होता. कांगोच्या आरोग्य मंत्र्यांनी ही माहिती दिली. त्यांनी सांगितलं इबोला व्हायरसमुळे कांगोमध्ये १९७६ ला एका नर्सचा मृत्यू झाला. दरम्यान बुनिया, मोंगवालू, रवामपारा या ठिकाणीही इबोलाचा प्रादुर्भाव आढळतो आहे अशीही माहिती त्यांनी दिली.
इबोला व्हायरस म्हणजे काय?
इबोला व्हायरसचा प्रादुर्भाव हा जनावरांकडून मनुष्यांकडे होतो. हा व्हायरसमुळे होणारा आजार आहे.
ताप येणं, उलट्या होणं, शरीराच्या आत रक्तस्राव होणं अशी लक्षणं या रोगाच्या रुग्णामध्ये दिसून येतात.
इबोलाचा प्रादुर्भाव झालेल्या व्यक्तीच्या अवयवांवर परिणाम होऊ लागतो. वेळीच लक्षात आलं नाही तर मृत्यूही होतो.
WHO ने इबोलाचा संसर्ग रोखण्यासाठी उपाय योजनांची शिफारस केली आहे.
या सूचनांमध्ये संक्रमित व्यक्तीने इतर व्यक्तींच्या संपर्कात येऊ नये ही सूचना करण्यात आली आहे.
कांगो या ठिकाणी जिथे हा व्हायरस आढळून आला त्या बाजूने वाहणाऱ्या नदीला इबोला असं नाव देण्यात आलं आहे.
इबोला हा अत्यंत धोकादायक संसर्गजन्य आजार
इबोला हा एक अत्यंत धोकादायक संसर्गजन्य आजार आहे. जो संक्रमित व्यक्तीचं रक्त, उलटी, वीर्य आणि इतर शारीरिक द्रव्यांच्या संपर्कातून पसरतो. हा आजार दुर्मिळ असला तरी, तो अनेकदा प्राणघातक ठरू शकतो. WHO च्या माहितीनुसार इबोला हा रोग अनेक प्रकारच्या विषाणूंमुळे होतो, त्यापैकी इबोला विषाणू, सुदान विषाणू आणि बुंदीबुग्यो विषाणूमुळे मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होऊ शकतो.आफ्रिका सीडीसीनुसार, यावेळी संसर्ग कोणत्या विषाणूच्या प्रकारामुळे होत आहे, हे शास्त्रज्ञ अजूनही निश्चित करण्याचा प्रयत्न करत आहेत. काँगोला इबोलाचा सामना करण्याचा मोठा अनुभव आहे, पण यावेळी आव्हान अधिक कठीण असू शकतं, असं WHO ने म्हटलं आहे. जागतिक आरोग्य संघटनेने काँगोला आपत्कालीन मदत दिली आहे.
इबोला संसर्गाचा धोका
इबोला संसर्गित क्षेत्रे युगांडा आणि दक्षिण सुदान यांच्या सीमेच्या अगदी जवळ आहेत. शेजारील युगांडामध्येही इबोलाचा एक रुग्ण आढळला आहे. तीन दिवसांपूर्वी कम्पाला येथील रुग्णालयात दाखल झालेल्या एका काँगोच्या नागरिकाचा मृत्यू झाला आहे. युगांडाच्या आरोग्य मंत्रालयाने सांगितलं की, या प्रकरणाची सुरुवात काँगोमधून झाली असून, स्थानिक प्रसार झाल्याची अद्याप पुष्टी झालेली नाही. मृताच्या संपर्कात आलेल्या सर्वांना विलगीकरणात ठेवण्यात आलं आहे. आरोग्य अधिकाऱ्यांच्या मते, रुग्णाला बुंदीबुग्यो विषाणूची लागण झाली होती, जो यापूर्वी युगांडामध्ये आढळला होता. आफ्रिका सीडीसीने इशारा दिला आहे की, हा संसर्ग बाधित भागांमधून इतर देशांमध्ये पसरू शकतो. काँगो, युगांडा आणि दक्षिण सुदान येथील आरोग्य अधिकाऱ्यांची एक तातडीची बैठक बोलावण्यात आली आहे, ज्यामध्ये संयुक्त राष्ट्रांच्या संस्था आणि इतर आंतरराष्ट्रीय भागीदारांचाही समावेश असेल.
माणसाच्या शरीरात कशा मार्गे पसरतो इबोला व्हायरस?
- रक्त
- घाम
- लाळ
- उलटी
- लघवी
- शरीरातील इतर द्रव घटक
जर इबोला व्हायरसचा प्रादुर्भाव झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात दुसरा व्यक्ती आला तर त्यामुळे या व्हायरसचा संसर्ग वाढतो. वटवाघूळ आणि इतर जंगली जनावारांद्वारे इबोलाचा प्रादुर्भाव होतो. इबोला व्हायरसचा प्रादुर्भाव हवेतील संक्रमणाने होत नाही असंही WHO ने सांगितलं आहे.
इबोला व्हायरसची लक्षणं काय आहेत?
रुग्णाला सणकून ताप भरतो
शरीरात त्राण उरत नाही, अशक्तपणा जाणवतो
डोकं दुखू लागतं
शरीरातल्या नसाही ठणकू लागतात
घसा खवखवतो
उलटी आणि जुलाब होऊ लागतात
पोटात दुखू लागतं
शरीरातून रक्त येतं
या आजारामुळे रुग्णाच्या किडनीवर, यकृतावर परिणाम होतात
इबोला झालेल्या रुग्णावर उपचार कसे केले जातात?
ऑक्सिजन सपोर्ट दिला जातो
रुग्णाला क्वॉरंटाइन करण्यात येतं
इन्टेसिल केअर युनिटमध्ये उपचार केले जातात
शरीरातील पाण्याची कमतरता भरुन काढली जाते.
संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात कुणी येणार नाही याची काळजी घेतली जाते.
उपाय करणारे डॉक्टरही पीपीई सूट परिधान करुन उपचार करतात
