TMC Rebel MPs List including Yusuf Pathan Shatrughan Sinha: तृणमूल काँग्रेसमधील खासदारांच्या फुटीची बातमी समोर आल्यानंतर बंडखोरांच्या यादीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तृणमूल काँग्रेसचे लोकसभेमधील एकूण २९ खासदार आहेत. बशीरहाटचे खासदार हाजी नुरुल इस्लाम यांचे निधन झाल्यामुळे ती जागा रिक्त आहे. वेगळा गट स्थापन करायचा झाल्यास, सध्याच्या २८ पैकी बंडखोर गटाला २० खासदारांचा पाठिंबा लागेल. मात्र सध्या बंडखोर गटाकडे १९ खासदारांची स्वाक्षरी केलेली यादी आहे, असे सांगितले जाते. ही यादी लोकसभा अध्यक्षांना देण्यात आली असून काकोली घोष यांनी या गटाचा एनडीएला पाठिंबा असल्याचे जाहीर केले आहे.

तृणमूल काँग्रेसची स्थापना झाल्यानंतर पक्षाला आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या आव्हानाला तोंड द्यावे लागत आहे. ममता बॅनर्जी यांनी तृणमूल काँग्रेसची स्थापना केली होती. पश्चिम बंगालमधील अनेक दशकांची डाव्या पक्षांची सत्ता तृणमूल काँग्रेसने उखडून फेकली. त्यानंतर तब्बल तीन टर्म ममता बॅनर्जी मुख्यमंत्री राहिल्या. मात्र यंदा विधानसभा निवडणुकीत पराभव होताच, पक्षात बंड उफाळून आले आहे.

ममता बॅनर्जी यांच्या सहकारी आणि ज्येष्ठ खासदार काकोली घोष दस्तीदार यांनी बंडखोर खासदारांच्या गटाचे नेतृत्व केले आहे. काकोली घोष यांच्याबरोबर कोण कोण खासदार आहेत? याची चर्चा होत होती. आता या खासदारांची नावे समोर आली आहेत.

यादी खालीलप्रमाणे (कंसात मतदारसंघाचे नाव):

१) काकोली घोष (बारासात)
२) जगदीशचंद्र बसुनिया (कूचबिहार)
३) युसूफ पठाण (बहरामपूर)
४) खलीलुर रहमान (जंगीपूर)
५) अबू ताहिर खान (मुर्शिदाबाद)
६) पार्थ भौमिक (बैरकपूर)
७) बापी हलदर (मथुरापूर)
८) सायोनी घोष (जादवपूर)
९) माला रॉय (कोलकाता दक्षिण)
१०) मिताली बाग (आरामबाग)
११) दीपक अधिकारी (घाटल)
१२) कालीपद सोरेन (झाडग्राम)
१३) जून मालिया (मेदिनीपूर)
१४) अरूप चक्रवर्ती (बांकुरा)
१५) शर्मिला सरकार (वर्धमान पूर्व)
१६) असित कुमार माल (बोलपूर)
१७) शताब्दी रॉय (बीरभूम)
१८) रचना बॅनर्जी (हुगळी)
१९) प्रसून बंडोपाध्याय

बंडखोर खासदारांनी तृणमूल काँग्रेसमधून तात्काळ राजीनामा न देण्याचा किंवा थेट भाजपामध्ये औपचारिकपणे सामील न होण्याचा निर्णय घेतलेला दिसतो. त्याऐवजी एनडीए सरकारला पाठिंबा देत स्वतंत्र गट म्हणून काम करण्याची त्यांची योजना आहे. पक्षांतरबंदी कायद्याअंतर्गत अपात्रतेची कारवाई टाळण्याचा यामागे उद्देश दिसतो.

TMC Split Latest News
‘थोडी तरी लाज बाळगा’, माजी क्रिकेटपटू, खासदार युसूफ पठाणवर महुआ मोईत्रा संतापल्या; अमित शाहांचा उल्लेख करत म्हणाल्या…

बंडखोर खासदारांच्या गटाच्या नेत्या काकोली घोष दस्तीदार यांच्या नेतृत्वाखाली स्वतंत्र संसदीय गट स्थापन करण्याबाबतचे पत्र लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना आधीच देण्यात आले आहे. सूत्रांनी असेही सांगितले की, काकोली घोष या तृणमलू काँग्रेसच्या मुख्य प्रतोद म्हणून कायम राहतील.

मागच्या आठवड्यात भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांच्या दिल्लीतील निवासस्थानी बंडखोर खासदारांच्या गटाने बैठक घेतली. त्याचवेळी मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी हेदेखील दिल्लीत उपस्थित होते, हे विशेष.

बंडखोर गटातील ज्या खासदारांच्या स्वाक्षरीचे पत्र लोकसभा अध्यक्षांना दिले, त्याचे छायाचित्र एएनआय वृत्तसंस्थेने एक्सवर शेअर केले आहे.

पक्षातील सूत्रांनी असाही दावा केला की, २० खासदारांनी रविवारी रात्री दिल्लीतील एका अज्ञात स्थळी झालेल्या बैठकीलाही हजेरी लावली होती.

शत्रुघ्न सिन्हा बंडखोरांच्या यादीत नाहीत – महुआ मोईत्रा

१९ बंडखोरांची यादी समोर आल्यानंतर ममता बॅनर्जी यांच्याशी एकनिष्ठ असलेल्या तृणमूलच्या नेत्यांनी मात्र या यादीतील काही जणांबाबत आशावाद व्यक्त केला आहे. जसे की, शत्रुघ्न सिन्हा आणि देव अधिकारी हे अजूनही तृणमूल काँग्रेसशी एकनिष्ठ असल्याचे बोलले जात आहे. अधिकारी यांनी ममता बॅनर्जी यांना पाठिंबा दर्शवला आहे, असेही सांगण्यात येत आहे. शत्रुघ्न सिन्हा हेदेखील बंडखोरांच्या गटात असल्याचे बोलले गेले. मात्र त्यांचे नाव यादीत नाही.

दरम्यान खासदार महुआ मोईत्रा यांनी हिंदुस्तान टाइम्सला दिलेल्या एका मुलाखतीत म्हटले की, बंडखोरांकडे २० खासदारांचा पाठिंबा नाही. जर त्यांच्याकडे २० खासदारांचा पाठिंबा असता तर त्यांनी लोकसभा अध्यक्षांना दिलेले पत्र प्रसिद्ध केले असते. तसेच त्यांनी यावरून शक्तीप्रदर्शनही केले असते.

Saayoni Ghosh Leaves TMC Crisis
‘दिल मे है काबा’ गाणं गाऊन भाजपाचा विजय सोपा करणाऱ्या खासदार सायोनी घोषही ममतांची साथ सोडणार

महुआ मोईत्रा पुढे म्हणाल्या, बंडखोरांकडे २० नाही तर १६ खासदार आहेत. संख्याबळ सिद्ध करण्याची जबाबदारी तसा दावा करणाऱ्यांवरच येते. मला खात्री आहे की, जर त्यांच्याकडे संख्याबळ असते तर त्यांनी लगेच पत्र काढले असते. त्यावर स्वाक्षऱ्या केल्या असत्या आणि भाजपाबरोबर एक संयुक्त पत्रकार परिषद घेतली असती. मी ठामपणे सांगू शकते की, त्यांच्याकडे २० खासदार नाहीत.

‘२० खासदार असले तरी गट निर्माण होणार नाही’ – मोईत्रा

खासदार महुआ मोईत्रा पुढे म्हणाल्या, २० खासदारांचा गट तयार झाला तरी त्यांच्याकडे पक्षांतर बंदी कायद्याअंतर्गत त्यांच्या गटाला मान्यता मिळेलच असे नाही. पक्षांतर बंदी कायद्याअंतर्गत कारवाई टाळायची असेल तर फक्त विधीमंडळ किंवा संसदीय मंडळातील दोन-तृतीयांश सदस्यांचा पाठिंबा चालणार नाही. तर पक्षातूनही तेवढाच पाठिंबा मिळणे आवश्यक आहे. तसेच केवळ पक्ष सोडून चालणार नाही तर त्यांना भाजपामध्ये विलीन व्हावे लागेल.

राज्यसभा खासदार प्रकाश बाराईक यांचा राजीनामा

लोकसभेतील खासदार बंड करत असताना राज्यसभेतील खासदार एकामागोमाग राजीनामा देत आहेत. गुरुवारी तृणमूल काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार प्रकाश चिक बाराईक यांनी राजीनामा दिला. दोन दिवसांपूर्वी सुखेंदू शेखर रॉय आणि सुष्मिता देव यांनी राजीनामा दिला होता. त्यानंतर आता बाराईक यांचा राजीनामा आल्यामुळे तृणमूलचे तीन खासदार एकाएकी बाहेर पडले आहेत.