Air Marshal Ashutosh Dixit IAF Chief Appointment: भारतीय हवाई दलाच्या प्रमुखपदी एअर मार्शल आशुतोष दीक्षित यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सध्या ते हवाई दल उपप्रमुख म्हणून कार्यरत आहेत. विद्यमान हवाई दलप्रमुख एअर चीफ मार्शल अमर प्रीत सिंह हे ३१ ऑक्टोबर रोजी सेवानिवृत्त होत असून त्यानंतर दीक्षित हे या सर्वोच्च पदाची सूत्रे हाती घेतील.

संरक्षण क्षेत्रातील ‘आत्मनिर्भर भारत’ उपक्रमाला गती देण्यासाठी आणि स्वदेशी बनावटीचे लढाऊ विमान ‘एलसीए तेजस’सह इतर देशांतर्गत विमान प्रकल्पांना बळ देण्यामध्ये एअर मार्शल दीक्षित यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची मानली जाते. त्यांच्या नियुक्तीमुळे देशाच्या हवाई संरक्षण सज्जतेत स्वदेशी तंत्रज्ञानाला आणखी चालना मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे, असे वृत्त न्यूज १८ ने दिले आहे.

कोण आहेत एअर मार्शल आशुतोष दीक्षित?

आशुतोष दीक्षित यांचा जन्म ९ डिसेंबर १९६६ रोजी झाला. ६ डिसेंबर १९८६ रोजी भारतीय हवाई दलाच्या लढाऊ शाखेत दीक्षित यांची नियुक्ती झाली होती. ते राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी, बांगलादेशातील डिफेन्स सर्व्हिसेस स्टाफ कॉलेज आणि नॅशनल डिफेन्स कॉलेजचे माजी विद्यार्थी आहेत.

प्रायोगिक चाचणी वैमानिक आणि पात्र उड्डाण प्रशिक्षक असलेले दीक्षित यांच्याकडे विविध प्रकारची लढाऊ विमाने चालवण्याचा ३,५०० तासांहून अधिक उड्डाणाचा दांडगा अनुभव आहे. यात मिराज-२०००, मिगच्या विविध आवृत्त्या, किरण, जग्वार, आयएल-७८, हॉक आणि तेजस या विमानांचा समावेश आहे.

महत्त्वाच्या मोहिमांमध्ये सहभाग

तब्बल चार दशकांच्या सेवाकाळात त्यांनी अनेक महत्त्वपूर्ण लष्करी कारवाया आणि सरावांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवला आहे. कारगिल युद्धादरम्यान राबवण्यात आलेले ‘ऑपरेशन सफेद सागर’, तसेच ‘ऑपरेशन रक्षक’ आणि ‘ऑपरेशन सिंदूर’ या मोहिमांमध्ये त्यांचे महत्त्वाचे योगदान राहिले आहे. ११ जून २०१९ रोजी त्यांना एअर व्हाइस मार्शल, १ ऑक्टोबर २०२२ रोजी एअर मार्शल आणि १ सप्टेंबर २०२४ रोजी कमांडर-इन-चीफ पदावर बढती मिळाली.