Who Is Angad Singh Dhillon? : भारतीय वंशाचे ३५ वर्षीय अंगद सिंग ढिल्लन यांची संयुक्त अरब अमिरातीमध्ये (यूएई) कॅनडाचे राजदूत म्हणून नियुक्ती झाली आहे. अंगद सिंग ढिल्लन हे मूळचे पंजाबमधील लुधियाना जिल्ह्यातील आहेत. मागील काही वर्षांपासून ढिल्लन यांनी कॅनडाच्या राजकारणात आणि मुत्सद्देगिरीत महत्वाची भूमिका बजावली आहे.
कॅनडाच्या पंतप्रधान कार्यालयात सल्लागार ते दोन केंद्रीय मंत्र्यांचे ‘चीफ ऑफ स्टाफ’ म्हणून अंगद सिंग ढिल्लन यांनी काम पाहिलेलं आहे. आता ढिल्लन यांची यूएईमध्ये कॅनडाचे राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या या नियुक्तीमुळे जागतिक स्तरावर भारतीयांची मान उंचावली आहे. या संदर्भातील वृत्त इंडियन एक्स्प्रेसने दिलं आहे.
अंगद सिंग ढिल्लन कोण आहेत? (Who Is Angad Singh Dhillon?)
अंगद सिंग ढिल्लन हे मूळ पंजाबमधील लुधियाना जिल्ह्यातील आहेत. कॅनडा सरकारमधील परराष्ट्र व्यवहार मंत्री अनिता आनंद यांनी ढिल्लन यांची यूएईमध्ये कॅनडाचे राजदूत म्हणून नियुक्तीची घोषणा केली आहे. सध्या कॅनडात लिबरल पक्षाच्या नेतृत्वाखालील सरकार आहे. एखाद्या सार्वभौम देशाकडून दुसऱ्या देशात उच्च राजनैतिक अधिकारी म्हणून एखाद्या भारतीय वंशाच्या व्यक्तीची नियुक्ती होणं हे अभिमानास्पद आहे.
‘द इंडियन एक्सप्रेस’शी फोनवर दिलेल्या प्रतिक्रियेत ढिल्लन यांनी सांगितलं की, “मी सध्या कॅनडामध्ये कितीही उच्च राजनैतिक पदावर असलो तरी माझं मूळ गाव हेच माझं खरं घर आहे. माझ्या मनातून पंजाबची ओढ कधीच कमी होऊ शकत नाही. आजही मी आठवड्यातून किमान चार ते पाच दिवस भारतीय जेवण जेवतो. मात्र, आता ज्या देशात मी राहतो आणि सेवा करतो त्या कॅनडाशी माझी निष्ठा आहे.”
दरम्यान, अंगद सिंग ढिल्लन हे कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांच्या सर्वात जवळच्या सल्लागारांपैकी एक आहेत. तसेच उच्च-स्तरीय संवाद आणि सहकार्य प्रस्थापित करून भारत आणि चीनसारख्या महत्त्वाच्या द्विपक्षीय भागीदारांशी कॅनडाचे राजनैतिक संबंध दृढ करण्याच्या अनुषंगाने ढिल्लन यांनी महत्वाची भूमिका बजावलेली आहे.
अंगद सिंग ढिल्लन यांचं शिक्षण कुठे झालं?
अंगद सिंग ढिल्लन यांचं शालेय शिक्षण मोहालीमधील एका स्कूलमध्ये झालेलं आहे. त्यानंतर महिंद्रा युनायटेड वर्ल्ड कॉलेज, पुणे येथून त्यांनी बारावीचं शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर ते पुढील उच्च शिक्षणासाठी २०१० मध्ये कॅनडाला गेले आणि तिथेच त्यांनी उच्च शिक्षण पूर्ण केलं. पुढे अंगद सिंग ढिल्लन यांनी २०१५ मध्ये कॅनडाच्या राजकारणात प्रवेश केला.
अंगद सिंग ढिल्लन यांचे आई-वडील अजूनही चंदीगडमध्ये राहतात, जिथे त्यांचा जन्म झाला होता. तसं त्यांचं मूळ गाव पंजाबमधील लुधियानातील घुंगराणा हे आहे. भारताच्या दौऱ्यावर असताना ते कायम आपल्या ‘घुंगराणा’ गावाला भेट देतात.
“मी भारतात आल्यानंतर घुंगराणाला भेट देत नाही असं कधी होत नाही. गावात आमचं वडिलोपार्जित घर आणि शेती आजही आहे. या वर्षी मार्चमध्ये जेव्हा पंतप्रधान कार्नी मुंबईच्या दौऱ्यावर होते, तेव्हा मी माझ्या गावाला भेट दिली होती. आजी-आजोबांबरोबर गावात घालवलेला वेळ आजही आठवतो. आम्ही उन्हाळ्याच्या सुट्टीत आजी-आजोबांसोबत वेळ घालवण्यासाठी गावी जायचो. माझे आजोबा राजकारणात होते, त्यामुळे गावात रॅली वगैरे होत असायच्या. आता जेव्हा मी भारतात असतो, अगदी दोन दिवसांसाठी जरी आलो तरी मी माझ्या गावाला भेट देतोच”, असं अंगद सिंग ढिल्लन यांनी सांगितलं.
