Who is Ashok Mittal : आज दिल्लीत मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या आहेत. आम आदमी पक्षाचे नेते तथा खासदार राघव चड्ढा यांना राज्यसभेतील पक्षाच्या उपनेतेपदावरून तडकाफडकी हटवलं आहे. त्यामुळे खासदार राघव चड्ढा यांना मोठा धक्का बसल्याचं बोललं जात आहे. मात्र, राघव चड्ढा यांना उपनेतेपदावरून अचानक का हटवण्यात आलं? याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
राघव चड्ढा यांना राज्यसभेतील पक्षाच्या उपनेतेपदावरून हटवल्यानंतर लगेच त्यांच्या जागी खासदार अशोक मित्तल यांची सभागृहातील पक्षाचे उपनेते म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबत आम आदमी पक्षाने (आप) राज्यसभेच्या सचिवालयाला पत्र लिहिल्याचं सांगितलं जात आहे.
या पार्श्वभूमीवरच राघव चड्ढा यांच्या जागी आम आदमी पक्षाने नियुक्ती केलेले अशोक मित्तल हे नेमकं कोण आहेत? त्याच्याबाबत थोडक्यात माहिती जाणून घेऊयात.
अशोक मित्तल कोण आहेत? (Who is Ashok Mittal)
आम आदमी पक्षाने राज्यसभेच्या सचिवालयाला पत्र लिहून खासदार अशोक मित्तल यांची सभागृह उपनेतेपदी निवड करण्याची सूचना केली आहे. अशोक मित्तल हे आम आदमी पक्षाचे राज्यसभेचे खासदार आहेत. तसेच ते पंजाबच्या लव्हली प्रोफेशनल युनिव्हर्सिटीचे (LPU) संस्थापक आहेत. जे पंजाबमधील पहिलं खासगी विद्यापीठ आणि भारतातील सर्वात मोठ्या विद्यापीठांपैकी एक आहे.
अशोक मित्तल हे २०२२ पासून सक्रिय राजकारणात आहेत. एप्रिल २०२२ मध्ये अशोक मित्तल हे सभागृहात आले आणि तेव्हापासून ते संरक्षण समिती, वित्त समितीसह विविध अनेक संसदीय समित्यांचा भाग राहिले आहेत.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर डीएमके खासदार कनिमोझी यांच्या नेतृत्वाखालील रशिया, लाटव्हिया, स्लोव्हेनिया, ग्रीस आणि स्पेनला भेट देणाऱ्या सर्वपक्षीय शिष्टमंडळाचाही अशोक मित्तल हे एक भाग होते. सध्या राज्यसभेत ‘आप’चे १० सदस्य आहेत. त्यामध्ये पंजाबमधील ७ आणि दिल्लीतील ३ सदस्यांचा समावेश आहे. आम आदमी पक्षाकडून अशोक मित्तल उल्लेख वर्णन एक प्रख्यात शिक्षणतज्ज्ञ आणि सामाजिक कार्यकर्ते म्हणून केला जातो. तसेच अशोक मित्तल हे सध्या सक्रिय राजकारणात आहेत.
