IPS Shivdeep Lande Resign: बिहारचे लोकप्रिय आणि दबंग पोलीस अधिकारी म्हणून ओळखले जाणारे आयपीएस अधिकारी शिवदीप वामनराव लांडे यांनी गुरुवारी (१९ सप्टेंबर) अचानक राजीनामा दिल्याची घोषणा केली. शिवदीप लांडे यांनी फेसबुक अकाउंटवरून दिली आहे. मात्र राजीनामा देऊन आपण बिहारमध्येच राहणार असून या राज्याची सेवा करणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले आहे. राजीनामा दिल्यानंतर पुढे काय करणार? याबाबत मात्र त्यांनी कोणतेही सुतोवाच केलेले नाही. “मी बिहारमध्ये १८ वर्ष काम करून सेवा दिली. बिहार माझे कुटुंब आहे. जर माझ्याकडून नकळत काही चुकले असेल तर बिहारच्या जनतेने मला माफ करावे. आज मी पोलीस दलाचा राजीनामा देत आहे. पण बिहारसाठी यापुढेही काम करत राहिल”, अशी पोस्ट शिवदीप लांडे यांनी लिहिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बिहार पोलीस दलाच्या कार्यशैलीवर नाराज

शिवदीप लांडे सध्या बिहारमधील पूर्नीयाचे पोलिस महानिरीक्षक म्हणून काम करत होते. महत्त्वाचे म्हणजे, २०१९ च्या बॅचच्या आयपीएस अधिकारी काम्या मिश्रा यांनीही ऑगस्ट महिन्यात राजीनामा दिला होता. मिश्रा यांच्याप्रमाणेच लांडे यांनीही वैयक्तिक कारणामुळे राजीनामा देत असल्याचे सांगितले होते. पण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार लांडे हे अजिबात तडजोड न करणारे अधिकारी होते. त्यामुळेच बिहार पोलीस प्रशासनाच्या सध्याच्या कार्यशैलीवरून ते नाराज होते. मुंबईत पाच वर्ष सेवा देऊन बिहारमध्ये परतल्यानंतर ते नाराज असल्याचेही सांगण्यात येत होते.

हे वाचा >> IPS Shivdeep Lande Resign : आयपीएस अधिकारी शिवदीप लांडे यांचा तडकाफडकी राजीनामा; कारण काय?

कोण आहेत शिवदीप लांडे?

शिवदीप लांडे यांचा जन्म २९ ऑगस्ट १९७६ रोजी झाला. शेतकरी कुटुंबातून आलेल्या शिवदीप लांडे यांचे शिक्षण अकोला जिल्ह्यात झाले. त्यानंतर त्यांनी शेगावमधील श्री संत गजानन महाराज इंजिनिअरिंग महाविद्यालयातून इलेक्ट्रॉनिक्समध्ये बीटेक केले. यानंतर यूपीएससीची तयारी करण्यासाठी त्यांनी मुंबई गाठली.

मुंबईत यूपीएससीची तयारी करत असताना त्यांची भारतीय महसूल सेवेसाठी (IRS) निवड झाली होती. मात्र त्यांनी पुन्हा प्रयत्न करून यूपीएससीची परीक्षा दिली आणि २००६ साली ते आयपीएससाठी निवडले गेले. लांडे यांना बिहार केडर मिळाले आणि त्यांची पहिलीच पोस्टिंग नक्षल प्रभावित असलेल्या मुंगेर जिल्ह्यातील जमालपूर येथे झाली. यानंतर लांडे यांनी पटना, अररिया, पूर्णिया, रोहतास अशा अनेक जिल्ह्यांमध्ये विविध पदावर काम केले.

हे वाचा >> मनसूख हिरेन हत्या प्रकरणाचा गुंता सुटला – शिवदीप लांडे

विजय शिवतारेंचे जावई

शिवदीप लांडे हे बिहार केडरचे आयपीएस असले तरी मध्यंतरी त्यांची नियुक्ती महाराष्ट्रात करण्यात आली होती. शिवसेना शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांची मुलगी ममता यांच्याशी शिवदीप लांडे यांचे २०१४ साली लग्न झाले. लग्नानंतर त्यांनी महाराष्ट्र दलात काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती. तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री, तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तसा अर्जही त्यांनी दिला होता. त्यानंतर तीन वर्षांसाठी लांडे यांची महाराष्ट्र पोलीस दलात प्रतिनियुक्ती करण्यात आली होती. महाराष्ट्रात असताना अमली पदार्थ विरोधी पथक, दहशतवादी विरोधी पथकात लांडे यांनी सेवा दिली आहे.

शिवदीप लांडे यांनी फेसबुक पोस्ट लिहून राजीनामा देत असल्याचे जाहीर केले.

२०२२ साली शिवदीप लांडे पुन्हा बिहारमध्ये परतले होते. ६ सप्टेंबर २०२४ रोजी त्यांची पुर्णिया जिल्ह्याच्या पोलीस महानिरीक्षक पदावर बदली करण्यात आली होती. त्यानंतर ते नाराज असल्याचे सांगितले जात होते.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Who is bihar ips officer shivdeep lande resigns from police service know the reason kvg
Show comments