Identify Cole Tomas Allen: व्हाईट हाऊस करस्पॉन्डंट्स डिनर कार्यक्रमात शनिवारी गोळीबार झाला. या गोळीबारात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प लक्ष्य होते, असं त्यांनीच सांगितलं. दरम्यान, कार्यक्रम स्थळी उपस्थित असलेल्या सुरक्षा यंत्रणांनी तात्काळ हल्लेखोराला ताब्यात घेतलं असून त्याची चौकशी सुरू झाली आहे. अधिकृत यंत्रणांनी त्याच्याविषयी अधिक माहिती दिली नसली तरीही फॉक्स न्यूज (Fox News) आणि न्यूयॉर्क पोस्टच्या स्तंभलेखिका कॅरोल मार्कोविझ यांनी या घटनेतील संशयिताची ओळख पटवली आहे. कोल टॉमस ॲलन (Cole Tomas Allen) असे या संशयिताचे नाव असून तो कॅलिफोर्नियातील टॉरन्स येथील रहिवासी असल्याचा दावा त्यांनी केला आहे. मार्कोविझ यांनी ‘X’ (ट्विटर) वर याबद्दलची पहिली माहिती शेअर केली असून संबंधित व्यक्ती सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे.
त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, “व्हाईट हाऊस करस्पॉन्डंट्स डिनरमध्ये गोळीबाराचा प्रयत्न करणारा व्यक्ती ३१ वर्षीय कोल टॉमस ॲलन असून तो टॉरन्स, कॅलिफोर्नियाचा आहे आणि तो सध्या कोठडीत आहे.”
जहाल उजव्या विचारसरणीच्या कार्यकर्त्या लॉरा लूमर यांनीही संशयिताचे नाव कोल टॉमस ॲलन असल्याचे सांगितले आहे. लूमर यांनी असा दावाही केला आहे की, तो एक नोंदणीकृत डेमोक्रॅट (Democratic Party) असून त्याने कमला हॅरिस यांच्या २०२४ च्या अध्यक्षीय मोहिमेसाठी देणगी दिली होती. मात्र, त्याच्या राजकीय पार्श्वभूमीबाबतच्या या दाव्यांना अद्याप अधिकृत सूत्रांकडून दुजोरा मिळालेला नाही.
दरम्यान, सोशल मीडियावर ॲलनचे असल्याचे सांगण्यात येणारे काही अनधिकृत प्रोफाइल्स (फेसबुक आणि लिंक्डइन) व्हायरल होत आहेत. या प्रोफाइल्सनुसार, त्याचे शिक्षण कॅलटेक (Caltech) मधून मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये झाले असून, त्याने कॅलिफोर्निया स्टेट युनिव्हर्सिटी, डॉमिन्गेझ हिल्स येथून कॉम्प्युटर सायन्समध्ये मास्टर डिग्री मिळवल्याचा दावा करण्यात येतोय. तसेच त्याने नासा (NASA) मध्ये रिसर्च फेलोशिप केल्याचाही उल्लेख आहे.
याशिवाय, समोर आलेल्या एका फोटोमध्ये त्याला लॉस एंजेलिस काउंटीमध्ये “टीचर ऑफ द मंथ” हा पुरस्कार मिळाला असल्याचंही सांगण्यात येतंय. दरम्यान, या दाव्यांबाबत अद्याप कोणताही अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाही.
