राज्यसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या राजकीय वर्तुळात मोठ्या घडामोडी सुरू आहेत. उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि पश्चिम बंगालमधील राज्यसभेच्या १२ जागांसाठी १६ ऑक्टोबर रोजी निवडणूक पार पडणार आहे. निवडणूक आयोगाने याबाबतचा कार्यक्रम जाहीर केला आहे. दरम्यान, उत्तर प्रदेशातील राज्यसभेच्या जागेसाठी समाजवादी पक्षाने धनराज नाथवाणी यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
धनराज नाथवाणी हे अंबानी कुटुंबाचे विश्वासू मानले जातात. राज्यसभा निवडणुकीपूर्वी समाजवादी पक्षाने घेतलेल्या या धक्कादायक निर्णयाने अनेक राजकीय गणित बदण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेशातून धनराज नाथवाणी यांना आपला उमेदवार म्हणून घोषित केल्यानंतर आज उमेदवारी अर्जही दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, धनराज नाथवाणी हे रिलायन्स इंडस्ट्रीशी संबंध असलेले कॉर्पोरेट अधिकारी आणि अंबानी कुटुंबाचे विश्वासू मानले जातात. राज्यसभेची उमेदवारी देताना समाजवादी पक्ष सहसा तळागाळातील नेते आणि पक्षाशी एकनिष्ठ असलेल्या कार्यकर्त्यांना प्राधान्य देत आल्याचं याआधी पाहायला मिळालं. मात्र, यावेळी धनराज नाथवाणी यांना समाजवादी पक्षाकडून थेट राज्यसभेची उमेदवारी देण्यात आल्याने चर्चांना उधाण आलं आहे. या संदर्भातील वृत्त बिझनेस टुडेने दिलं आहे.
धनराज नाथवाणी यांचे वडील परिमल नाथवाणी हे स्वतः राज्यसभेचे विद्यमान खासदार आहेत. तसेच ते एनडीएचं प्रतिनिधित्व करतात. व्यवसाय, क्रिकेट प्रशासन आणि आता राजकारण अशा विविध क्षेत्रांचा अनुभव असलेल्या धनराज नाथवाणी यांच्या उमेदवारीमुळे समाजवादी पक्षाची रणनीती आणि पडद्यामागची राजकीय समीकरणं याबाबत चर्चांना उधाण आलं आहे.
उत्तर प्रदेश से राज्यसभा के लिए मुझे समाजवादी पार्टी का उम्मीदवार बनाए जाने पर माननीय राष्ट्रीय अध्यक्ष श्री अखिलेश यादव जी का हृदय से आभार एवं धन्यवाद करता हूँ।
— Dhanraj Nathwani (@DhanrajNathwani) September 30, 2026
सार्वजनिक जीवन के इस नए पड़ाव की ओर आज लखनऊ में माननीय अखिलेश यादव जी की उपस्थिति में राज्यसभा के लिए मैंने अपना… pic.twitter.com/03eOC6GtyZ
धनराज नाथवाणी कोण आहेत?
धनराज नाथवाणी हे उद्योगपती परिमल धीरजलाल नाथवाणी यांचे सुपुत्र आहेत. धनराज नाथवाणी हे रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडमध्ये ग्रुप प्रेसिडेंट आणि गुजरात क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आहेत. त्यांचे वडील परिमल नाथवाणी हे झारखंडमधून राज्यसभा खासदार असून त्यांना सत्ताधारी एनडीएचा पाठिंबा आहे.
रिलायन्स समूहात धनराज नाथवाणींची भूमिका काय?
धनराज नाथवाणी हे रिलायन्स कॉर्पोरेट आयटी पार्क लिमिटेड (RCIPTL) चे संचालक आहेत. ही कंपनी सपोर्ट सर्व्हिसेस, आयटी पायाभूत सुविधांचे व्यवस्थापन, डेटा प्रोसेसिंग, होस्टिंग आणि वेब पोर्टल डेव्हलपमेंट या सारख्या सेवा पुरवते. कापड उद्योगापासून ते दूरसंचार क्षेत्रापर्यंत विस्तारलेल्या या समूहासाठी रिअल इस्टेट भाडेतत्त्वावर घेणे आणि त्याचे व्यवस्थापन पाहण्याचे कामही करते.
दरम्यान, धनराज नाथवाणी हे रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या जामनगर आणि वडोदरा येथील उत्पादन विभागांचे (मॅन्युफॅक्चरिंग डिव्हिजन) तसेच गुजरातमध्ये रिलायन्स जिओच्या व्यवसायाचे कामकाजही पाहतात. या व्यतिरिक्त धनराज नाथवाणी हे कंपनीच्या दोन्ही उत्पादन विभागांशी संबंधित वित्त आणि लेखा खरेदी आणि करार, मानव संसाधन, माहिती तंत्रज्ञान, सुरक्षा, कॉर्पोरेट व्यवहार आणि सीएसआर उपक्रम या सारख्या सर्व गोष्टींची जबाबदारी सांभाळतात.
अंबानी कुटुंबाशी काय आहे कनेक्शन?
धनराज नाथवाणी यांचे वडील परिमल नाथवानी हे राज्यसभेचे ज्येष्ठ खासदार आहेत. तसेच ते आरआयएलमध्ये कॉर्पोरेट व्यवहार संचालक म्हणून कार्यरत आहेत. ते मुकेश अंबानी यांच्या अत्यंत जवळच्या सल्लागारांपैकी एक आहेत. रिलायन्सच्या अनेक महत्त्वपूर्ण कामांमध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. दरम्यान, कॉर्पोरेट जगताच्या पलीकडे धनराज नाथवाणी यांचीही अंबानी कुटुंबातील पुढच्या पिढीशी म्हणजेच अनंत अंबानी यांच्याशी मैत्री आहे.
धनराज नाथवाणी यांनी अखिलेश यादव यांचे मानले आभार
“उत्तर प्रदेशातून राज्यसभेसाठी समाजवादी पक्षाचे उमेदवार म्हणून माझी निवड केल्याबद्दल मी अखिलेश यादव जी यांचे मनापासून आभार मानतो. आज लखनौ येथे अखिलेश यादव यांच्या उपस्थितीत मी राज्यसभेसाठी माझा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. या घटनेने माझ्या सार्वजनिक जीवनातील एका नवीन पर्वाची सुरुवात झाली आहे. आपल्या प्रेम, विश्वास आणि शुभेच्छांबद्दल मी अत्यंत कृतज्ञ आहे”, असं म्हणत धनराज नाथवाणी यांनी अखिलेश यादव यांचे आभार मानले आहेत.
