Who is General MM Naravane : लोकसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात माजी लष्करप्रमुख जनरल एम. एम. नरवणे यांच्या अप्रकाशित आत्मचरित्रावरून जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली. काँग्रेस खासदार आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी एका मासिकामधील लेखामध्ये देण्यात आलेल्या नरवणे यांच्या पुस्तकातील उतार्‍यांचा संदर्भ वाचून दाखवण्याचा प्रयत्न केल्यानंतर हा गदारोळ झाल्याचे पाहायला मिळाले.

जनरल बिपिन रावत यांच्यानंतर ३१ डिसेंबर २०१९ रोजी जनरल नरवणे हे भारतीय लष्कराचे २७ वे प्रमुख बनले होते. तसेच १५ डिसेंबर २०२१ पासून ३० एप्रिल २०२२ रोजी सेवानिवृत्त होईपर्यंत त्यांनी चीफ ऑफ स्टाफ कमिटीचे तात्पुरते चेअरमन म्हणून देखील जबाबदारी सांभाळली.

भाजपाकडून काँग्रेस देशभक्त नसल्याची टीका केली जाते, याला प्रत्युत्तर देताना राहुल गांधी यांनी सोमवारी नरवणे यांच्या पुस्तकातील उताऱ्यामधील “चायनिज टँक्स इन डोकलाम,” हे वाक्य उच्चारताच संरक्षणमंत्री राजनाथ सिंह लगेच उभे राहिले आणि त्यांनी यामध्ये हस्तक्षेप केला.

यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये लोकसभेत एकच गोंधळ झाल्याचे पाहायया मिळाले. त्यानंतर लोकसभेचे कामकाज दुपारी ३ वाजेपर्यंत स्थगित करण्यात आले. मात्र यामुळे जनरल एन.एम. नरवणे आणि त्यांचे अद्याप प्रकाशित न झालेले पुस्तक चांगलेच चर्चेत आले.

कोण आहेत जनरल मनोज मुकुंद नरवणे?

२२ एप्रिल १९६० रोजी पुण्यात जन्मलेले जनरल एम. एम. नरवणे हे भारतीय हवाई दलातील एका माजी अधिकाऱ्याचे सुपुत्र आहेत. नरवणे यांनी पुण्यातील नॅशनल डिफेन्स अकॅडमी आणि इंडियन मिलिटरी अकॅडमी, डेहराडून येथे शिक्षण घेतले आहे. तसेच त्यांनी डिफेन्स स्टडीजमध्ये एम.फिल. पदवी देखील आहे.

जून १९८० मध्ये नरवणे यांची शीख लाइट इन्फंट्रीच्या ७ व्या बटालियनमध्ये नियुक्ती झाली होती. त्यानंतर त्यांनी जम्मू-काश्मीरमधील राष्ट्रीय रायफल्सच्या सेकंड बटालियनचे (SikhLi) आणि १०६ इन्फंट्री ब्रिगेडचे नेतृत्व केले. तसेच नरवणे यांनी आसाम रायफल्सचे नेतृत्व करण्याबरोबरच काश्मीर आणि ईशान्य भारतातील अनेक कारवायांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

१६ डिसेंबर २०१९ मध्ये जनरल जनरल रावत यांच्यानंतर लष्करप्रमुख पदासाठी नरवणे यांचे नाव जाहीर करण्यात आले होते आणि लष्करप्रमुख या पदावरून नरवणे हे एप्रिल २०२२ मध्ये निवृत्त झाले.

नरवणे यांचे पुस्तक चर्चेत

जनरल एम. एम. नरवणे यांचे आत्मचरित्र २०२४ मध्ये प्रसिद्ध होणार होते, मात्र यातील काही उतारे हे एका वृत्तसंस्थेने आणि इतर काही माध्यमांनी २०२३ मध्ये प्रसिद्ध केले.अमेझॉन आणि इतर काही ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म्सनी या पुस्तकाच्या प्री-ऑर्डर्सदेखील स्वीकारल्या होत्या. ‘फोर स्टार्स ऑफ डेस्टिनी’ या नावाचे हे पुस्तक ‘पेंग्विन’ प्रकाशनाकडून प्रकाशित केले जाणार होते. मात्र, सरकारकडून परवानगी न मिळाल्यामुळे हे पुस्तकाचे प्रकाशन रखडल्याचे सांगितले जाते. अमेझॉनवर अजूनही या पुस्तकाची लिस्टिंग दिसते मात्र ते ऑर्डर करण्यासाठी उपलब्ध नाही.