Who is General Randy George : अमेरिका-इराण युद्धाला आता एक महिना उलटला आहे. मात्र, मध्यपूर्वेतील या संघर्षाची परिस्थिती अद्यापही नियंत्रणात आलेली नाही. एकीकडे पाकिस्तानच्या मध्यस्थीने इराणबरोबरील युद्ध थांबवण्यासाठी चर्चा सुरू आहेत, तर दुसरीकडे अमेरिका थेट इराणमध्ये घुसून लष्करी कारवाई करण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चाही समोर येत आहेत. यातच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी राष्ट्राला उद्देशून केलेल्या १८ मिनिटांच्या भाषणात युद्ध संपवण्याबाबत कोणतंही स्पष्ट भाष्य न करता इराणला थेट धमकी देणारे वक्तव्य केल्यामुळे या युद्धाबाबत आणखी साशंकता निर्माण झाली आहे.
त्यामुळे अमेरिका-इराण युद्ध नेमकं कोणत्या दिशेने चाललंय? अमेरिका-इराण युद्ध कधी थांबणार? अमेरिका-इराण युद्ध थांबणार की आणखी भडकणार? याबाबत आता संभ्रमाचं वातावरण निर्माण झालेलं आहे. या युद्धाच्या घडामोडी सुरू असतानाच आज अमेरिकेत मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. अमेरिकेच्या लष्करप्रमुखांना पदावरून तडकाफडकी हटवण्यात आलं आहे. अमेरिकेचे संरक्षण सचिव पीट हेगसेथ यांनी शुक्रवारी अमेरिकेचे चीफ ऑफ स्टाफ जनरल रँडी जॉर्ज यांना सक्तीची निवृत्ती घेण्याचे आदेश दिले आहेत.
दरम्यान, रँडी जॉर्ज (Army Chief of Staff) यांना लष्करप्रमुख पदावरून का हटवण्यात आलं? त्यांना सक्तीची निवृत्ती घेण्याचे आदेश का देण्यात आले? नेमकं काय घडलं? याबाबत अद्याप अधिकृत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. मात्र, अमेरिकेने लष्कराच्या प्रमुख पदावरून हटवलेले रँडी जॉर्ज नेमकं कोण आहेत आणि आता त्यांच्या जागी कोणाची नियुक्ती होण्याची शक्यता आहे? याबाबत थोडक्यात माहिती जाणून घेऊयात.
जनरल रँडी जॉर्ज कोण आहेत?
चीफ ऑफ स्टाफ पदावरून हटवण्यात आलेले रँडी जॉर्ज हे अमेरिकेच्या लष्कराचे ४१ वे चीफ ऑफ स्टाफ होते. या पदावरून आता त्यांना सक्तीची निवृत्ती घेण्याचे आदेश देण्यात आल्यामुळे ते निवृत्त होतील. त्यांच्या कार्याबाबत अमेरिकेच्या संरक्षण विभागाने एक निवेदन जारी करत ‘आम्ही त्यांना त्यांच्या निवृत्तीनंतरच्या आयुष्यासाठी शुभेच्छा देतो’, असं म्हटलं आहे.
दरम्यान, रँडी जॉर्ज हे मूळचे अमेरिकेच्या आयोवा (Iowa) राज्यातील आहेत. जॉर्ज हे १९८२ मध्ये अमेरिकेच्या सैन्यात भरती झाले होते. त्यानंतर पुढे १९८४ मध्ये न्यूयॉर्कमधील वेस्ट पॉइंट (West Point) या ठिकाणच्या अमेरिकेच्या लष्करी अकादमीत ते दाखल झाले होते. आपल्या लष्करी कारकिर्दीत जॉर्ज यांनी इराक आणि अफगाणिस्तान युद्धादरम्यान सेवा बजावलेली आहे.

तसेच अमेरिकेच्या ‘ऑपरेशन डेझर्ट स्टॉर्म’ या प्रमुख लष्करी मोहिमेतही रँडी जॉर्ज यांनी महत्वाची भूमिका बजावलेली आहे. अफगाणिस्तानातील युद्धादरम्यान जॉर्ज यांनी चौथ्या ब्रिगेड कॉम्बॅट टीमचं (अमेरिकेची लष्करी तुकडी) नेतृत्वही केलेलं आहे. तसेच अमेरिकेच्या लष्कराचे सचिव डॅनियल ड्रिस्कॉल (Daniel Driscoll) यांच्या जॉर्ज हे जवळचे मानले जात होते. तसेच डॅनियल ड्रिस्कॉल आणि रँडी जॉर्ज या दोघांनी मिळून अमेरिकेच्या लष्कराच्या शस्त्र विकासाच्या आणि खर्च कमी करण्याच्या मोहिमेत संरक्षण क्षेत्रातील मोठ्या कंपन्यांना आव्हान देण्यासाठी एकत्र काम केलेलं आहे.
लष्करप्रमुख म्हणून जॉर्ज यांची नियुक्ती कधी झाली होती?
अमेरिकेचे लष्करप्रमुख म्हणून २०२३ मध्ये जॉर्ज यांची नियुक्ती झाली होती. या पदाचा कार्यकाळ साधारणपणे चार वर्षांचा असतो. मात्र, लष्करप्रमुख म्हणून त्यांचा कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच रँडी जॉर्ज यांना लष्कराच्या प्रमुख पदावरून तडकाफडकी हटवण्यात आलं आहे.
जॉर्ज यांच्या जागी कोणाची नियुक्ती?
समोर आलेल्या माहितीनुसार, अमेरिकेच्या लष्कराचे उपप्रमुख (Vice Chief of Staff of the Army) जनरल क्रिस्टोफर लॅनेव्ह हे रँडी जॉर्ज यांच्याकडून पदभार घेण्याची शक्यता आहे, म्हणजे जॉर्ज यांच्या जागी आता क्रिस्टोफर लॅनेव्ह यांची नियुक्ती होण्याची शक्यता आहे. याआधी क्रिस्टोफर लॅनेव्ह यांनी २०२५ ते २०२६ या काळात अमेरिकेचे संरक्षण सचिव पीट हेगसेथ यांचे वरिष्ठ लष्करी सहाय्यक म्हणून काम पाहिलं होतं. त्यांची आता फेब्रुवारीमध्ये लष्कराच्या उपप्रमुखपदी नियुक्त करण्यात आली होती.

क्रिस्टोफर लॅनेव्ह हे ॲरिझोना (University of Arizona) विद्यापीठाच्या आर्मी रिझर्व्ह ऑफिसर्स ट्रेनिंग कॉर्प्सचे पदवीधर आहेत.क्रिस्टोफर लॅनेव्ह यांनीही जॉर्ज यांच्याप्रमाणेच इराक युद्ध आणि अफगाणिस्तान युद्ध या दोन्ही युद्धात सेवा बजावलेली आहे. २०२२ ते २०२३ या काळात ते ८२ व्या एअरबोर्न डिव्हिजनचे कमांडिंग जनरलही राहिलेले आहेत.
रँडी जॉर्ज यांच्या हकालपट्टीमागची संभाव्य कारणं काय?
अमेरिकेचे संरक्षणमंत्री पीटर हेगसेथ यांनी जनरल जॉर्ज यांना हटवण्याचे कोणतेही अधिकृत कारण दिलेले नाही. मात्र, अनेकांनी त्यांच्या हकालपट्टीबाबत तर्कवितर्क करण्यास सुरुवात केली आहे. काहींच्या मते, डोनाल्ड ट्रम्प यांना लष्करप्रमुखपदी केवळ त्यांनीच राबवलेल्या धोरणांची प्रभावी अंमलबजावणी करणारी व्यक्ती हवी होती. जनरल जॉर्ज यांची नियुक्ती जो बायडेन यांच्या कार्यकाळात झाल्याने ते ट्रम्प यांच्या बऱ्याच आदेशांकडे दुर्लक्ष करीत होते. त्यामुळेच ट्रम्प यांच्या आदेशावरून पीटर हेगसेथ यांना पदावरून हटवण्यात आल्याची चर्चा आहे. यापूर्वीही हेगसेथ यांनी अमेरिकन सैन्यदलातील अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांवर टीका केली होती. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या विचारसरणीशी सुसंगत नसलेल्या अधिकाऱ्यांची पदोन्नती रोखणे किंवा त्यांना पदावरून हटवणे, असा सपाटा त्यांनी लावला होता. त्यांच्या या भूमिकेमुळे जनरल जॉर्ज यांनी उघडपणे नाराजीही बोलून दाखवली होती.
अमेरिका-इराण युद्ध कधी संपणार? युद्धाबाबत साशंकता कायम
अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यात युद्धाची ठिगणी पडल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी महत्त्वाचं विधान केलं होतं. इराणबरोबरचा आमचा संघर्ष चार ते पाच आठवडे सुरू राहणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं. यादरम्यान युद्धाला पाच आठवडे पूर्ण होण्यास अवघ्या दोन दिवसांचा अवधी उरला आहे. या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी अमेरिकेला उद्धेशून केलेल्या भाषणात म्हटलं की, अमेरिकेची लष्करी उद्दिष्टे लवकरच पूर्ण होण्याच्या मार्गावर आहेत. पुढील दोन ते तीन आठवड्यांत अमेरिकेकडून इराणवर आणखीन तीव्र हल्ले केले जातील. त्यांच्या या विधानामुळे पश्चिम आशियात भडकलेलं हे युद्ध सुमारे आठ आठवड्यांपर्यंत चालू राहण्याची शक्यता आहे.

याचाच अर्थ इराण आणि संपूर्ण जगाला एका दीर्घकालीन संघर्षासाठी तयार राहावं लागणार आहे. या युद्धाची ठिणगी पडल्यानंतर हा संघर्ष दीर्घकाळ चालणार, अशी अपेक्षा कोणीही केली नव्हती. सध्याच्या युद्धाचा कालावधी किती कमी आहे हे पटवून देण्यासाठी ट्रम्प यांनी अमेरिकेने भूतकाळात लढलेल्या मोठ्या युद्धांचा दाखला आपल्या भाषणाच्या दरम्यान दिला. त्यामुळे ट्रम्प यांनी पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धाच्या कालावधीचीही या युद्धाशी तुलना केली आहे.
