Gitanjali Angmo Sonam Wangchuk wife biography : “जर सोनम वांगचुक मोर्चात सामील होऊ शकले नाहीत, तर मी त्यांचं प्रतिनिधित्व करेन आणि त्या मोर्चाचं नेतृत्व करेन”, असं पर्यावरणवादी कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली आंग्मो यांनी शनिवारी सांगितलं. सोनम वांगचुक यांना उपोषणाच्या २१ व्या दिवशी दिल्ली पोलिसांनी बळजबरीने जंतर मंतरवरून हलवून सफदरजंग रुग्णालयात दाखल केलं. त्यांच्यावर आता तिथे उपचार सुरू आहेत. या काळात सोनम वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली आंग्मो बऱ्याच प्रकाशझोतात आल्या.
वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली आंग्मो कोण आहेत?
गीतांजली या वांगचुक यांच्या दुसऱ्या पत्नी आहेत. ‘३ इडियट्स’ चित्रपटातील आमीर खानच्या पात्रासाठी प्रेरणास्थान मानल्या जाणाऱ्या वांगचुक यांचं पहिलं लग्न रेबेका नॉर्मन या अमेरिकेच्या महिलेशी झालं होतं. मात्र, नंतर त्यांचा घटस्फोट झाला. वांगचुक हे वारंवार सरकारच्या निशाण्यावर आले असले, तरी गीतांजली यांनी नेहमीच प्रसिद्धीपासून दूर राहणं पसंत केलं आहे. एक सामाजिक उद्योजक आणि शिक्षणतज्ज्ञ असलेल्या गीतांजली या लडाखमधील ‘हिमालयन इन्स्टिट्यूट ऑफ अल्टरनेटिव्ह्ज’च्या (HIAL) सह-संस्थापक म्हणून ओळखल्या जातात. ही संस्था प्रामुख्याने लडाखच्या अत्यंत थंड हवामानात राहणाऱ्या समुदायांना भेडसावणाऱ्या वास्तविक समस्या सोडवण्यावर लक्ष केंद्रित करते.
ओडिशाच्या बालासोरमधील एका पंजाबी कुटुंबात जन्मलेल्या गीतांजली यांनी फकीर मोहन विद्यापीठातून भौतिकशास्त्रात पदवी पूर्ण केली. त्यानंतर त्यांनी भुवनेश्वरच्या झेविअर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटमधून एमबीए केलं. एमबीए पूर्ण केल्यानंतर त्यांनी कॉर्पोरेट क्षेत्रात १५ वर्षे काम केलं, त्यातील बहुतांश काळ त्यांनी डेन्मार्कमध्ये घालवला. भारतात परतल्यानंतर त्यांनी आपल्या उद्योजकीय प्रवासावर लक्ष केंद्रित केलं. त्यांनी ‘पुशन’ आणि ‘शांघाय पॉवर प्रोजेक्ट्स लिमिटेड’ असे स्वतःचे व्यवसाय सुरू केले, तसंच ‘हेलिओस बुक्स’ नावाची प्रकाशन संस्था स्थापन केली. २०१७ मध्ये त्यांनी सोनम वांगचुक यांच्यासोबत मिळून HIAL ची स्थापना केली.
नेहमी शांत राहणाऱ्या आंग्मो यांनी २०२५ मध्ये ‘ब्रुट’ला दिलेल्या मुलाखतीत आपल्या लग्नाविषयी सांगितलं होतं. त्यांची आणि वांगचुक यांची भेट एका शिक्षण परिषदेत झाली होती. “आम्ही एकमेकांची वाक्ये पूर्ण करत होतो हे पाहणं रंजक होतं. आम्हाला शिक्षणात ज्या प्रकारे काम करायचं होतं आणि एकंदरीत आयुष्याकडे पाहण्याचा आमचा दृष्टिकोन यात खूप साम्य होतं”, असं आंग्मो म्हणाल्या.
केंद्र सरकारकडून पुरस्कार प्राप्त
आंग्मो या अष्टपैलू महिला आहेत. त्यांच्या लिंक्डइन प्रोफाइलनुसार, त्या कराटेमध्ये ब्लॅक बेल्ट आहेत आणि एक कुशल ओडिसी तसंच रशियन बॅले नृत्यांगना आहेत. ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या शिव्हनिंग स्कॉलर असलेल्या आंग्मो यांना केंद्र सरकारकडून वुमन ट्रान्सफॉर्मिंग इंडिया पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलं आहे. आपल्या लिंक्डइन बायोमध्ये त्यांनी स्वतःला भारतीय अध्यात्मात खोल रस असणारी आध्यात्मिक साधक म्हटलं आहे.
अटकेच्या काळात भक्कम पाठिंबा
गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये कडक राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत वांगचुक यांना ताब्यात घेण्यात आलं, तेव्हा गीतांजली यांनी त्यांना दिलेल्या खंबीर पाठिंब्यामुळे त्या पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणावर प्रकाशझोतात आल्या. वांगचुक यांना जोधपूर सेंट्रल जेलमध्ये ठेवण्यात आलं होतं. लडाखला राज्याचा दर्जा देणं आणि संविधानाच्या सहाव्या अनुसूचीमध्ये समाविष्ट करणं या मागण्यांसाठी लडाखमध्ये झालेल्या हिंसक आंदोलनात चार जणांचा मृत्यू झाला होता आणि ५० हून अधिक जण जखमी झाले होते, त्यानंतर वांगचुक यांना ताब्यात घेण्यात आलं होतं.
वांगचुक यांच्या अटकेच्या काळात गीतांजली त्यांचा सर्वात मोठा आधारस्तंभ बनून समोर आल्या. वांगचुक यांच्या दीर्घकालीन अटकेला आव्हान देत त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली, यामुळेच १७० दिवसांच्या कोठडीनंतर सरकारने वांगचुक यांची सुटका केली, असं मानलं जातं. त्यांनी राष्ट्रपतींनाही पत्र लिहून हस्तक्षेप करण्याची मागणी केली होती. वांगचुक यांच्या सुटकेनंतर गीतांजली यांनी एक्सवर एक भावुक संदेश लिहिला होता, ज्यामध्ये त्यांनी कुटुंबाला सहन कराव्या लागलेल्या त्रासाचं वर्णन केलं होतं. “गेल्या पाच महिन्यांत केवळ ६० मिनिटांच्या भेटीसाठी दर आठवड्याला दोन फेऱ्या मारण्याचा माझा हा त्रास अखेर संपला आहे”, असं त्यांनी लिहिलं होतं.
जंतर-मंतरवरील आंदोलनात वांगचुक यांना पाठिंबा
दरम्यान, २८ जूनपासून सोनम वांगचुक यांनी नीट पेपरफुटीच्या प्रकरणावरून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करण्याकरता जंतर मंतरवर बेमुदत उपोषण सुरू केले. या काळात गीतांजली आंगमे आंदोलनस्थळापासून दूर राहिल्या. परंतु, या काळात त्यांनी वर्तमान पत्रात लेख लिहिणं सुरू ठेवलं होतं. उपोषणाच्या २० व्या दिवशी वांगचुक यांची प्रकृती खालावल्याने गीतांजली यांनी शुक्रवारी त्यांची भेट घेतली आणि त्यांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली. मात्र, वांगचुक यांनी माघार घेतली नाही. परंतु, उपोषणाच्या २१ व्या दिवशी सोनम वांगचुक यांना बळजबरीने रुग्णालयात नेण्यात आलं. तेव्हापासून गीतांजली चर्चेत आल्या.
‘संसदेवर निघणाऱ्या मोर्चाचं नेतृत्व करणार’
दिल्ली उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार दिल्ली पोलिसांनी कारवाई केली असल्याचं सांगण्यात येतंय. मात्र, संमतीशिवाय सोनम वांगचुक यांना कोणतेही पदार्थ खायला देऊ नये, अशी भूमिका त्यांनी जाहीर केली. तसंच, सरकारी रुग्णालयात करण्यात आलेल्या सोनम वांगचुक यांच्या रक्ताच्या चाचण्यांच्या अहवालांवरही त्यांनी विश्वास दाखवला नाही. त्यामुळे त्यांनी खासगी रुग्णालयात चाचण्या करण्याची मागणी केली. मात्र, ही मागणी फेटाळण्यात आली. त्यामुळे त्यांनी लागलीच उच्च न्यायालयात दाद मागितली.
दरम्यान, उद्यापासून संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू होतंय. या पहिल्याच दिवशी कॉकरोच जनता पार्टीने संसदेवर मोर्चाचं आयोजन केलं आहे. या मोर्चात सोनम वांगचुकही सहभागी होणार होते. परंतु, आता ते रुग्णालयात असल्याने त्यांच्या जागी गीतांजली आंग्मो सहभागी होणार असून मोर्चाचं नेतृत्व करणार आहेत. रस्त्यावर उतरून त्या वांगचुक यांचा आवाज बनू शकतील का? हे आपल्याला २० जुलैलाच समजेल.
