Who is Hamam al-Hammami Flydubai co-pilot stabbed Indian Captain Smit Machchhar : फ्लायदुबईच्या तेल अवीवला जाणाऱ्या विमानातील भारतीय कॅप्टन स्मित मच्छार यांच्यावर हल्ला केल्याचा आरोप असलेल्या ओमानी सहवैमानिकाची ओळख पटली असून त्याचं नाव हमाम अल-हमामी असं आहे. CNNने दिलेल्या वृत्तानुसार, एका इस्रायली अधिकाऱ्याने तसंच सौदी अरेबियाच्या सरकारी माध्यमांनीही त्याच्या नावाला दुजोरा दिला आहे. सध्या तो यूएईमध्ये असून त्याच्याविरोधात तपास सुरू आहे. दरम्यान, या हमामविषयी इंडियन एक्स्प्रेसने आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध वृत्तसंस्थांच्या हवाल्याने सविस्तर वृत्त दिलं आहे.
या घटनेनंतर अनेक वृत्तसंस्थांनी हमाम अल-हमामीच्या पार्श्वभूमीची माहिती समोर आणली आहे. ‘द वॉल स्ट्रीट जर्नल’ने संबंधित प्रकरणाची माहिती असलेल्या सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, हमामने अतिरेकी विचार स्वीकारल्याचा संशय होता, त्यामुळे त्याच्यावर विमान उड्डाण करण्यास बंदी घातली होती. मात्र, त्यानंतरही फ्लायदुबईने त्याला नोकरी दिल्याचं वृत्त आहे. असोसिएटेड प्रेसनेही ओमानमधील बंदी आणि त्यानंतर झालेल्या नियुक्तीबाबत अशीच माहिती दिली आहे.
हमाम अल-हमामीच्या ‘अतिरेकी विचारां’चा खुलासा कसा झाला?
हमाम अल-हमामीने ओमान एअरमध्ये जवळपास सात वर्षे काम केलं. मात्र, २०२४ मध्ये सहवैमानिक म्हणून प्रशिक्षण घेत असताना त्याच्याकडे अतिरेकी स्वरूपाचे साहित्य आढळल्यानंतर त्याच्या कट्टर विचारसरणीचा खुलासा झाला, असं ABC Newsने गुप्तचर आणि कायदा अंमलबजावणी अधिकाऱ्यांच्या हवाल्याने म्हटलं आहे. CNNने हमामच्या नोकरीचा इतिहास, शिक्षण आणि त्याच्याशी संबंधित सोशल मीडिया खात्यांची माहिती तपासली आहे.
हमाम अल-हमामी कोण आहे?
CNNच्या वृत्तानुसार, हमाम अल-हमामी हा ओमानी नागरिक असून त्याचा जन्म यूएईमध्ये झाला. त्याचे वडील ओमानी, तर आई सीरियन आहे. ‘अल अरेबिया इंग्लिश’च्या वृत्तानुसार, त्याने बराच काळ ओमानबाहेर, विशेषतः सीरियामध्ये घालवला. याच काळात तो अतिरेकी विचारांनी प्रभावित झाल्याचं सांगितलं जात आहे. हमामच्या नावाने असलेलं त्याचं LinkedIn प्रोफाइल समोर आलं आहे. त्यानुसार, त्याने ओमान एअरमध्ये सात वर्षे काम केलं आणि फेब्रुवारी २०२५ मध्ये नोकरी सोडली. त्यानंतर जून २०२५ मध्ये तो Royal Air Maroc मध्ये रुजू झाला आणि जानेवारी २०२६ मध्ये तेथून बाहेर पडला. CNNच्या एका सूत्राने हे प्रोफाइल हमामचंच असल्याचं स्पष्ट केलं आहे. परंतु, आता हे अकाऊंट हटवण्यात आलं आहे.
एका इस्रायली अधिकाऱ्याने CNNला दिलेल्या माहितीनुसार, हमामने फ्लायदुबईमध्ये केवळ आठ महिने काम केलं होतं. त्याच्या LinkedIn प्रोफाइलनुसार, त्याने इंग्लंडमधील Buckinghamshire New University येथे शिक्षण घेतलं. CNNच्या माहितीनुसार, विद्यापीठाने त्याच नावाच्या व्यक्तीने तीन वर्षांचा दूरस्थ शिक्षण अभ्यासक्रम पूर्ण करून २०२३ मध्ये एव्हिएशन मॅनेजमेंटची पदवी मिळवल्याचं निश्चित केलं आहे. ‘द जेरुसलेम पोस्ट’ने तपासाशी संबंधित सूत्रांच्या हवाल्याने हमामकडे दुसरं कोणतंही नागरिकत्व नसल्याचं म्हटलं आहे.
ओमानने हमामवर उड्डाणाची बंदी का घातली?
या प्रकरणाबाबत विविध वृत्तसंस्थांनी काही वेगवेगळी माहिती दिली आहे. APच्या सूत्रानुसार, हमामने अतिरेकी विचार स्वीकारल्याची भीती असल्याने ओमान एअरने त्याला विमान उड्डाण करण्यास बंदी घातली होती. मात्र, फ्लायदुबईने त्याची नियुक्ती करताना त्याची कितपत सखोल तपासणी केली होती, हे स्पष्ट झालेलं नाही. ओमान एअरने त्याच्यावर कारवाई केल्याचं वृत्त सर्वप्रथम ‘द वॉल स्ट्रीट जर्नल’ने दिलं होतं. ‘वॉल स्ट्रीट जर्नल’च्या वृत्तानुसार, ओमानने उड्डाणावर बंदी घातल्यानंतरही फ्लायदुबईने हमामला नोकरी दिली. त्यामुळे त्याला यूएई आणि इस्रायलदरम्यानच्या संवेदनशील मार्गावर विमान उड्डाण करण्याची संधी मिळाली.
ABC Newsच्या वृत्तानुसार, २०२४ मध्ये ओमान एअरमध्ये सहवैमानिकाचे प्रशिक्षण घेत असताना हमामकडे अतिरेकी स्वरूपाचं साहित्य आढळलं होतं. त्यानंतरही त्याला प्रशासकीय पदावर ठेवण्यात आलं होतं. CNNनेही त्याला कट्टर विचारसरणीबाबतच्या चिंतेमुळे विमान उड्डाणाच्या प्रशिक्षणातून हटवण्यात आल्याचं म्हटलं आहे. मात्र, त्याच्याकडून नेमके कोणते साहित्य जप्त करण्यात आले किंवा त्याचे नेमके कोणते विचार होते, याबाबत या वृत्तसंस्थांनी कोणतीही माहिती दिलेली नाही. तसेच हे साहित्य नेमके कोणत्या वर्षी आढळले, याबाबतही वृत्तांमध्ये फरक आहे. ABC Newsने २०२४ हे वर्ष सांगितले आहे, तर CNNच्या वृत्तातील माहिती आणि LinkedIn प्रोफाइलवरील तारखा २०२५ कडे निर्देश करतात.
तपास यंत्रणा कोणत्या बाबी तपासत आहेत?
ABC Newsच्या वृत्तानुसार, सौदी अरेबियाने गुरुवारी हमामला यूएईच्या ताब्यात दिलं. सूत्रांच्या माहितीनुसार, तो तपासात सहकार्य करत असून, विमान इस्रायलमध्ये कोसळवण्याचा आपला हेतू असल्याचं त्याने सांगितलं आहे. CNNने यूएईच्या सरकारी वृत्तसंस्था WAMच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, या हल्ल्याचा संबंध ‘दहशतवादी कारवायांशी’ होता का, याचा तपास करण्यासाठी यूएईच्या अॅटर्नी जनरलने चौकशी सुरू केली आहे.
इस्रायलच्या शिन बेट आणि मोसाद यांसारख्या गुप्तचर यंत्रणाही या प्रकरणाचा तपास करत आहेत. दरम्यान हमाम विमानाच्या क्रूचा भाग कसा बनला, याचा शोध घेतला जात आहे. इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू यांनी हमाम ‘इस्लामिक कट्टरतावादाच्या प्रभावाखाली’ गेल्याचं म्हटलं आहे. तसंच त्याला या हल्ल्यासाठी कोणी पाठवले होते का, याचाही तपास इस्रायल करत आहे. तपास सुरू असल्याने या प्रकरणावर भाष्य करता येणार नसल्याचं फ्लायदुबईने CNNला सांगितलं आहे. दरम्यान, ABC Newsच्या वृत्तानुसार, फ्लायदुबईने पुढील सूचना मिळेपर्यंत तेल अवीवसाठीची उड्डाणे स्थगित केली आहेत.
