Read about IPS B Sumathi and her viral undercover safety mission for women’s protection : तेलंगणातील बस स्टॉपवर एकटी उभी असलेल्या एका महिलेबरोबर तब्बल ४० पुरुषांनी गैरवर्तन केल्याचा व्हिडिओ नुकताच समोर आला होता. या व्हिडिओतील संबंधित महिला कोणी सामान्य महिला नसून आयपीएस अधिकारी होती. बी. सुमती असं त्यांचं नाव असून त्यांना रात्रीच्या काळात होत असलेल्या गैरकृत्याबाबत फॅक्ट चेक करायचे होते. त्यामुळे बी. सुमती यांच्या या कृत्याचे कौतुक होत असून त्यांनी स्वतः जमिनीवरून उतरून परिस्थिती अनुभवली आहे. त्यामुळे त्या नेमक्या कोण आहेत? याची चर्चा सुरू झाली आहे.

बी सुमती या मूळच्या तेलंगणातील कलुगोटला या छोट्याशा गावातील आहेत. इथं संसाधनं मर्यादित असली तरीही जिद्द अफाट आहे. त्यांचे वडील गावचे सरपंच होतं, त्यामुळे त्यांना तेथूनच समाजसेवेची गोडी लागली. पण ग्रामीण भागात युपीएससीचं स्वप्न पाहणं सोपं नव्हतं. मर्यादित संधी आणि सामाजिक अपेक्षा असतानाही त्यांनी हार मानली नाही. त्यांनी कृषी विज्ञानाचा अभ्यास केला. उस्मानिया विद्यापीठातून एमबीए केलं. त्यानंतल नाल्सारमधून सुर्कषा आणि संरक्षण कायद्यात मास्टर डिग्री मिळवली.

वयाच्या २५ व्या वर्षी त्यांनी ‘ग्रुप १’ ची परीक्षा उत्तीर्ण केली आणि त्या अविभाजित आंध्र प्रदेशातील पहिल्या महिला डीवायएसपी (DySP) बनल्या. २००६ मध्ये त्यांनी आयपीएस (IPS) केडरमध्ये प्रवेश केला. फायलींपेक्षा मैदानात काम करणाऱ्या अधिकारी सुमती यांनी नेहमीच कठीण आव्हाने स्वीकारली. विशेष गुप्तचर विभाग असो किंवा नक्षलवादविरोधी मोहिमा, त्या नेहमीच मैदानावर सक्रिय राहिल्या. त्यांच्या कारकिर्दीतील सर्वात मोठे यश म्हणजे त्यांनी शेकडो नक्षलवाद्यांचे मनपरिवर्तन करून त्यांना मुख्य प्रवाहात आणले. त्यांच्या आणि त्यांच्या पथकाच्या प्रयत्नांमुळे सुमारे ५९१ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केल्याचे सांगितले जाते.

मध्यरात्र, बस स्टॉप आणि वास्तवाची जाणीव

मे २०२६ मध्ये मलकाजगिरीच्या पहिल्या महिला आयुक्त बनल्यानंतर, सुमती यांनी जमिनीवरील वास्तव स्वतः पाहण्याचे ठरवले. एका रात्री सुमारे साडेबारा वाजता, त्या साध्या कपड्यांत बाहेर पडल्या. कोणताही ताफा नाही, कोणतीही सुरक्षा नाही. केवळ एक साधा सलवार सूट आणि हातात मोबाईल. त्या दिलसुखनगरमधील एका गजबजलेल्या बस स्टॉपवर एकट्या उभ्या राहिल्या. काही मिनिटांतच पुरुष त्यांच्या जवळ येऊ लागले. कोणी बोलण्याचा प्रयत्न करत होते, तर कोणी आजूबाजूला घोटाळत होते. तासाभराच्या आत परिस्थिती बिकट झाली. जवळपास ४० पुरुषांनी त्यांच्याशी गैरवर्तन करण्याचा किंवा त्यांना घेरण्याचा प्रयत्न केला. साध्या वेशात असलेले पोलीस पथक जवळूनच हे सर्व पाहत होते आणि मर्यादा ओलांडणाऱ्यांना ताब्यात घेत होते. सुमारे तीन तास ही मोहीम चालली.

ही गोष्ट मनाला का भिडते?

सुमती यांची ही धाडसी कृती व्हायरल होण्याचे कारण म्हणजे त्यातले सत्य. अनेक महिलांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया दिली की, रात्री एकट्या बाहेर पडल्यावर त्यांना नेमका हाच अनुभव येतो. फरक इतकाच की, त्यांच्याकडे मदतीसाठी बॅकअप टीम नसते. वरिष्ठ अधिकारी सहसा वास्तवापासून दूर एसी केबिनमध्ये असतात, अशा काळात सुमती यांनी स्वतः जमिनीवर उतरून परिस्थिती अनुभवली, हे कौतुकास्पद ठरले. केवळ एक रात्र नाही, तर एक वेगळा दृष्टिकोनही केवळ एक रात्रीची मोहीम नव्हती, तर त्यांच्या कामाच्या पद्धतीचा एक भाग होता. सुमती यांनी गुन्हेगारी रोखण्यासाठी ‘एआय’ (AI) आणि डेटा सिस्टिमसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यावर भर दिला आहे. धोरण आणि प्रत्यक्ष मैदानी काम या दोन्ही बाजू त्यांनी समर्थपणे सांभाळल्या आहेत.

त्यांचा प्रवास महत्त्वाचा का आहे?

यूपीएससीची तयारी करणाऱ्या मुलांसाठी, विशेषतः ग्रामीण भागातील मुलींसाठी सुमती यांची कथा प्रेरणादायी आहे. त्या कोणत्याही विशेषाधिकारासह (Privilege) मोठ्या झाल्या नाहीत. नक्षलवाद्यांशी वाटाघाटी करण्यापासून ते महिलांच्या सुरक्षिततेसाठी मध्यरात्री रस्त्यावर उभे राहण्यापर्यंत, त्यांनी हे सिद्ध केले की हे पद केवळ सत्तेसाठी नाही, तर लोकांच्या सेवेसाठी आहे. काहीवेळा समाजाची सुरक्षा करण्यासाठी त्याच असुरक्षित जागांवर उभे राहावे लागते, जिथून सामान्य नागरिक रोज प्रवास करतात.