Jannat Bishnoi Rahul Gandhi protest News: निवडणूक प्रक्रियेतील कथित गैरप्रकारांविरोधात सोमवारी विरोधी पक्षांच्या ‘इंडिया’ आघाडीने सर्वोच्च न्यायालयावर धडक मोर्चा काढला. मध्य दिल्लीतील रस्त्यांवर हजारो आंदोलक उतरले असताना काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या लगत सतत दिसणाऱ्या एका तरुण चेहऱ्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. राहुल गांधी, प्रियांका गांधी आणि नेहा बोरा यांच्या समवेत ठामपणे चालणारी आणि घोषणाबाजी करणारी ही तरुणी म्हणजेच जन्नत बिश्नोई. कॉक्रोच जनता पार्टीमुळे जेन-झींची चलती असताना काँग्रेसकडूनही आता जेन-झी तरुणांना पुढे आणण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे.

कोण आहे जन्नत बिश्नोई?

जन्नत बिश्नोई ही दिल्ली विद्यापीठातील विद्यार्थी संघटनेची कार्यकारी परिषद सदस्य आहे. याशिवाय ती काँग्रेसची विद्यार्थी संघटना ‘नॅशनल स्टूडंट्स युनियन ऑफ इंडिया’ची सक्रिय पदाधिकारी आहे. सध्या ती दिल्ली विद्यापीठाच्या श्यामा प्रसाद मुखर्जी महाविद्यालयात कला शाखेच्या दुसऱ्या वर्षात शिक्षण घेत आहे.

मूळची राजस्थानची असणारी जन्नत गेल्या काही काळापासून दिल्लीतील कॅम्पस राजकारण आणि विद्यार्थी चळवळींमध्ये सातत्याने आघाडीवर राहिली आहे.

सोमवारी सर्वोच्च न्यायालयाकडे निघालेल्या मोर्चात लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी, प्रियांका गांधी आणि नेहा बोरा एका उघड्या ट्रकमधून मोर्चाचे नेतृत्व करताना दिसले. त्यांच्या समवेत जन्नतही उपस्थित होती. राहुल गांधी यांच्या शेजारी उभी राहून जन्नत आक्रमकपणे घोषणाबाजी करताना दिसून आली.

महिला सुरक्षा आणि पर्यावरण चळवळीत सक्रिय

विद्यापीठ परिसरात महिला सुरक्षेसाठी जन्नतने सातत्याने पाठपुरावा केला आहे. कॅम्पसमध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे जाळे उभारणे आणि ‘पिंक पोलीस बूथ’ स्थापन करणे या प्रमुख मागण्यांसाठी तिने आंदोलने केली आहेत. याव्यतिरिक्त राजस्थानमधील ‘वृक्ष संरक्षण विधेयक’ यांसारख्या पर्यावरणविषयक मोहिमांमध्येही तिने सहभाग घेतला आहे.

काही दिवसांपूर्वी दिल्लीतील कालकाजी परिसरात अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेनंतर दिल्ली-एनसीआरमध्ये तीव्र निदर्शने झाली होती. त्यावेळी “Smash the patriarchy” असा फलक हातात धरून महिलांचे नेतृत्व करतानाचे आणि घोषणाबाजी करतानाचे तिचे व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत आले होते.

मोर्चात नेमके काय घडले?

मतदार याद्यांमधील कथित गैरप्रकार आणि ‘मतचोरी’च्या मुद्द्यावरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी विरोधकांनी सोमवारी सर्वोच्च न्यायालयावर मोर्चा काढला. विरोधकांच्या कायदेशीर पथकाने या प्रकरणी न्यायालयात याचिका दाखल केली आहे. काही अंतर पार पडल्यानंतर पोलिसांनी मोर्चा अडवला. त्यानंतर राहुल गांधी यांनी मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) प्रक्रियेला स्थगिती देण्याची मागणी करत सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली.

Live Updates