IPS Kalpana Verma Suspended: छत्तीसगडच्या दंतेवाडा जिल्ह्यात नियुक्तीवर असणाऱ्या डीएसपी अर्थात पोलीस उपअधीक्षक कल्पना वर्मा यांच्यावर अखेर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून कल्पना वर्मा चर्चेत होत्या. पण राज्याच्या पोलीस दलात उच्च पदावर असणाऱ्या कल्पना वर्मा यांचे एका प्रथितयश व्यावसायिकासोबतचे व्हॉट्सअप चॅट्स तपासात समोर आले असून त्या आधारावर त्यांच्याविरोधात उच्चस्तरीय चौकशीचे आदेश जारी करण्यात आले आहेत. दंतेवाडासारख्या संवेदनशील जिल्ह्यामध्ये कल्पना वर्मा या नियुक्तीवर होत्या. या पार्श्वभूमीवर राज्यातील पोलीस दलात खळबळ उडाली आहे. इंडिया टुडेनं यासंदर्भात सविस्तर वृत्त दिलं आहे.
कोण आहेत कल्पना वर्मा?
कल्पना वर्मा या भारतीय पोलीस सेवेतील (IPS) उच्चपदस्थ अधिकारी आहेत. हे सगळं प्रकरण घडलं तेव्हा त्या दंतेवाडा जिल्ह्याच्या पोलीस उपअधीक्षकपदी नियुक्त होत्या. याआधीही त्यांनी छत्तीसगडमधील इतरही काही जिल्ह्यांमध्ये जबाबदारी सांभाळली आहे. विशेष म्हणजे त्यांनी दहशतवादविरोधी पथकातदेखील काम केलं आहे. २०२१ साली त्यांची रायपूरमधील धनाढ्य व्यावसायिक दीपक टंडन यांच्याशी भेट झाली. त्या दोघांमध्ये जवळचे संबंध असल्याचेही दावे करण्यात आले आहेत. याचदरम्यान, कल्पना वर्मा यांनी कोट्यवधींची खंडणी, महागड्या वस्तू आणि इतर गोष्टींची मागणी टंडन यांच्याकडे केल्याचा आरोप टंडन यांनी डिसेंबर २०२५ मध्ये केला. तेव्हापासून या प्रकरणाची व्यापक चर्चा सुरू झाली.
कल्पना वर्मा यांच्या निलंबन पत्रात काय?
कल्पना वर्मा यांच्या निलंबनाचे आदेश जारी करण्यात आल्यानंतर त्यांचं निलंबन पत्रही सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागलं आहे. या पत्रानुसार, प्राथमिक तपासात कल्पना वर्मा यांनी बेहिशेबी आर्थिक व्यवहार, त्यांच्या जबाबात विसंगती आणि उद्योगपतींशी व्हॉट्सअप चॅटदेखील आढळून आले आहेत. कल्पना वर्मा यांनी त्यांच्या प्रशासकीय पदाचा वैयक्तिक लाभासाठी गैरवापर केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. त्याशिवाय, या माध्यमातून त्यांनी बेकायदेशीरपणे आर्थिक लाभ पदरात पाडून घेतले असून मोठ्या प्रमाणावर बेहिशेबी मालमत्ता जमा केल्याचाही आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
दीपक टंडन यांची कल्पना वर्मांविरोधात तक्रार
दीपक टंडन व कल्पना वर्मा यांच्यातील कथित व्हॉट्सअप चॅटमध्ये पोलीस दलाशी संबंधित अतिशय संवेदनशील माहिती कल्पना वर्मा यांनी दिल्याचं आढळून आलं आहे. याआधी टंडन यांनी कल्पना वर्मा यांच्यावर २.५ कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप केला होता. त्यांना प्रेमाच्या जाळ्यात ओढून नंतर त्यांच्याकडे पैशांची मागणी केल्याचा दावा त्यांनी केला होता. या खंडणीत २ कोटी रोख, एक आलिशान कार, एक १२ लाखांची डायमंड रिंग, ५ लाखांचे सोन्याचे दागिने आणि इतर महागड्या भेटवस्तूंचा समावेश आहे. तसेच, वारंवार तक्रार करूनदेखील या वस्तू परत मिळाल्या नसल्याचंही टंडन यांनी तक्रारीत म्हटलं होतं.

