माजी लष्करप्रमुख एम. एम. नरवणे यांच्या फोर स्टार्स ऑफ डेस्टिनी या पुस्तकावरुन चांगलाच वाद निर्माण झाला आहे. दरम्यान याबाबत आता माजी लष्कर प्रमुखांची प्रतिक्रियाही समोर आली आहे. मात्र विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी घाबरले आहेत त्यामुळेच ते संसदेत समोर येत नाहीत अशी बोचरी टीका राहुल गांधींनी केली आहे.
काय म्हटलं आहे राहुल गांधींनी?
“माझं मत हे आहे की सरकार उत्तर द्यायला घाबरतं आहे. त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत येणं टाळलं आहे. आम्ही जे काही बोलू त्याला ते घाबरले आहेत. माझा अंदाज आहे की अर्थसंकल्पावरची चर्चाही त्यांना नीट सांभाळता येत नाही. मी जेव्हा नरवणेंच्या पुस्तकाचा उल्लेख केला तेव्हा मला सांगण्यात आलं की यावर चर्चा करायची नाही. हे पुस्तक छापून आलेलं नाही त्यामुळे मी त्यातला संदर्भ देऊ शकत नाही हे त्यांनी मला सांगितलं. मग मी म्हटलं मी मासिकातला उल्लेख वाचतो, तर ते म्हणाले नाही तुम्हाला मासिकाचा उल्लेखही करता येणार नाही. मग मी त्यांना सांगितलं की ठीक आहे मी याबाबत बोलतो, तर मला त्यांनी (ओम बिर्ला) सांगितलं की नाही तुम्ही बोलूही शकत नाही.” असं राहुल गांधींनी सांगितलं.
सत्ताधारी हवं ते बोलू शकतात मग…
पुढे राहुल गांधी म्हणाले, “संरक्षण मंत्र्यांनी सांगितलं की पुस्तक प्रकाशित झालेलं नाही. पण त्यांना हे बहुदा ठाऊक नाही की पुस्तक प्रकाशित झालं आहे. सरकार विरोधी पक्ष नेता आणि विरोधातल्या नेत्यांना बोलू दिलं जात नाही. तसंच सत्ताधारी पक्षातला एक नेता विविध पुस्तकांचे संदर्भ देऊन बोलला, त्याला कुणीही काहीही बोललं नाही. सत्ताधाऱ्यांना जे बोलायचं आहे तसं ते बोलू शकतात मग आम्ही का नाही? तसंच आमच्या आठ खासदारांचं निलंबन कऱण्यात आलं हे काही योग्य नाही. पंतप्रधान घाबरले आहेत. पुस्तकांना घाबरतात, चर्चांना घाबरतात आणि वास्तवाला घाबरतात.” असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.
काय आहे एम. एम. नरवणे यांची पोस्ट?
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असलेल्या एक्सवर नरवणे यांनी पेंग्विनची नोट पोस्ट केली आहे. त्यात नरवणे म्हणाले की सध्या आत्मचरित्राची स्थिती अशी आहे. एका ओळीत त्यांनी हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे की त्यांचं आत्मचरित्र अद्याप प्रकाशित झालेलं नाही. तसंच या पुस्तकाची कुठलीही अधिकृत प्रत सार्वजनिक वाचकांसाठी उपलब्ध करण्यात आलेली नाही.
पेंग्विनतर्फे काय सांगण्यात आलं आहे?
पेंग्विनच्या पोस्टमध्ये हे स्पष्ट करण्यात आलं आहे की जो पर्यंत हे पुस्तक प्रकाशित होत नाही आणि वाचकांच्या हाती येत नाही तोपर्यंत हे प्रकाशित झालं आहे असं म्हणता येणार नाही. प्री ऑर्डर, लिस्टिंग आणि प्रकाशन असे तीन टप्पे असतात. प्री ऑर्डर लिंक आली याचा अर्थ पुस्तक प्रकाशित झालं आहे असा होत नाही. असं पेंग्विनने म्हटलं आहे.

