Who is Muhoozi Kainerugaba : युगांडाचे लष्करप्रमुख जनरल मुहूजी कैनेरुगाबा यांच्या एका वक्तव्यामुळे तुर्किये आणि युगांडा या दोन देशांत तणाव वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मुहूजी कैनेरुगाबा हे युगांडाचे लष्करप्रमुख आहेत. एवढ्या मोठ्या पदावर असतानाही कैनेरुगाबा यांनी तुर्कियेकडे एक अजब मागणी केल्याने ते वादात अडकले आहेत.’एक अब्ज डॉलर्स आणि एक सर्वात सुंदर वधू पत्नी म्हणून द्या’, अशी विचित्र मागणी कैनेरुगाबा यांनी तुर्कियेकडे केली आहे.
याबाबत कैनेरुगाबा यांनी एक्सवर (ट्विटर) पोस्ट शेअर केली होती. मात्र, त्यांच्या वक्तव्याने वाद निर्माण झाल्यानंतर त्यांनी ही पोस्ट सोशल मीडियावरून हटवली. दरम्यान, तुर्कियेकडे सर्वात सुंदर वधूची मागणी करणारे युगांडाचे लष्करप्रमुख नेमकं कोण आहेत? मुहूजी कैनेरुगाबा यांनी तुर्कियेला ३० दिवसांचा नेमकं काय अल्टिमेटम दिला? तसेच कैनेरुगाबा यांनी याआधीही अशा प्रकारचे वादग्रस्त कोणते वक्तव्य केले होते का? याबाबत जाणून घेऊयात.
युगांडाच्या लष्करप्रमुखांनी तुर्कियेकडे कोणत्या मागण्या केल्या?
मुहूजी कैनेरुगाबा यांनी एक्सवर एक पोस्ट शेअर करत तुर्कियेकडे दोन मागण्या केल्या. त्यांची पहिली मागणी अशी की, सोमालिया या देशातील अतिरेक्यांच्या विरुद्धच्या लढ्यात युगांडाने दिलेल्या दीर्घकालीन लष्करी योगदानाबद्दल तुर्कियेने त्यांना नुकसान भरपाई म्हणून १ अब्ज डॉलर्स दिले पाहिजेत.
तसेच मुहूजी कैनेरुगाबा यांनी दुसरी मागणी अशी केली की, तुर्कियेने त्यांच्या देशातील सर्वात सुंदर वधू पत्नी म्हणून द्यावी, जिच्याशी ते लग्न करू शकतील, अशी अजब मागणी कैनेरुगाबा यांनी केली. त्यांच्या या मागणीवरून जगभरातून त्यांच्यावर जोरदार टीकेची झोड उठली आहे. त्यानंतर अखेर त्यांनी एक्सवरून ही पोस्ट तातडीने हटवली. मात्र, तोपर्यंत ही व्हायरल झाली.

कैनेरुगाबा यांनी याआधीही केले होते अजब वक्तव्य
मुहूजी कैनेरुगाबा यांना याआधीही अनेकदा त्यांच्या वक्तव्यामुळे टीकेला सामोरं जावं लागलं होतं. २०२२ मध्ये कैनेरुगाबा यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत म्हटलं होतं की, युगांडा केनियावर आक्रमण करेल आणि दोन आठवड्यांत नैरोबी शहर ताब्यात घेईल. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजनैतिक तणाव निर्माण झाला होता. मात्र, त्या घटनेनंतर युगांडा सरकारने जाहीर माफी मागितली होती. त्या वादानंतर कैनेरुगाबा यांना पदावरून तात्पुरतं हटवण्यात आलं होतं.
या बरोबरच मुहूजी कैनेरुगाबा यांनी याआधी विदेशी नेत्यांबद्दलही अशा प्रकारची वादग्रस्त वक्तव्य केली होती. आणखी एका घटनेत कैनेरुगाबा यांनी इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांना थेट लग्नाचा प्रस्ताव दिला होता आणि त्या बदल्यात इटलीला १०० गाई देऊ केल्या होत्या. त्यांच्या या वक्तव्यावरूनही वाद निर्माण झाला होता.
कैनेरुगाबांच्या वक्तव्याने वाद? तुर्कियेला कोणता अल्टिमेटम दिला?
युगांडाचे लष्करप्रमुख मुहूजी कैनेरुगाबा यांच्या सोशल मीडियावरील पोस्टनंतर राजनैतिक चर्चा सुरू झाल्या आहेत. कैनेरुगाबा यांनी सोमालियामधील युगांडाच्या दीर्घकालीन लष्करी तैनातीचा संबंध थेट तुर्कियेच्या आर्थिक प्रकल्पांशी जोडला. या बदल्यात थेट १ अब्ज डॉलर्सच्या सुरक्षा लाभ देण्याची मागणी कैनेरुगाबा यांनी केली. तसेच ही मागणी ३० दिवसांच्या आत पूर्ण न केल्यास राजनैतिक संबंध संपवण्याचा इशारा दिला.
मुहूझी कैनेरुगाबा कोण आहेत?
मुहूजी कैनेरुगाबा हे सध्याचे युगांडाचे लष्करप्रमुख आहेत. तसेच युगांडाचे राष्ट्राध्यक्ष योवेरी मुसेवेनी यांचे सुपुत्र आहेत. कैनेरुगाबा हे त्यांच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे आणि वक्तव्यामुळे अनेकदा जागतिक स्तरावर चर्चेत आले आहेत. परराष्ट्र धोरण आणि प्रादेशिक सुरक्षेवरील त्यांच्या वक्तव्यांमुळे ते याआधीही अनेकदा वाद निर्माण झाला आहे.

युगांडा-तुर्की संबंध आणि सोमालियाचा संदर्भ का दिला?
तुर्कीने सोमालियाबरोबर मजबूत संबंध निर्माण केले आहेत. त्यांनी पायाभूत सुविधा प्रकल्प आणि लष्करी प्रशिक्षणात गुंतवणूक केलेली आहे. तसेच ते मोगादिशूमध्ये बंदर आणि विमानतळ सुविधा चालवतात. युगांडाने अल-शबाब अतिरेक्यांविरुद्धच्या मोहिमेचा भाग म्हणून सोमालियामध्ये सैन्य तैनात केलेलं आहे. युगांडाने प्रादेशिक सुरक्षा कारवायांमध्ये दीर्घकाळ भूमिका बजावलेली आहे. मात्र, युगांडाच्या लष्करप्रमुखांच्या वक्तव्यांमुळे राजनैतिक संबंधांविषयी चिंता वाढली असून विश्लेषकांच्या मते या मुद्द्याचा प्रादेशिक सहकार्यावर परिणाम होऊ शकतो. या वक्तव्यांमुळे राजनैतिक संबंध आणि लष्करी संवादाबाबत पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.
मुहूजी कैनेरुगाबा यांच्या अल्टिमेटमनंतर पुढे काय होणार?
युगांडाचे लष्करप्रमुख मुहूजी कैनेरुगाबा यांनी तुर्कीयेला ३० दिवसांचा अल्टिमेटम दिला. तसेच ३० दिवसांनंतर औपचारिक किंवा राजनैतिक कारवाई केली जाईल की नाही? याबाबत आता कोणतीही स्पष्टता नाही. मात्र, ही परिस्थिती सरकारच्या अधिकृत निवेदनांवर आणि राजनैतिक चर्चेवर अवलंबून राहण्याची शक्यता आहे. असं असलं तरी सध्याच्या परिस्थितीत मुहूजी कैनेरुगाबा यांचं हे वक्तव्य मोठा चर्चेचा विषय ठरत आहे.
