Nila Vikhe Patil Sweden Parliament news updates: स्वीडनच्या संसदेत स्टॉकहोम सिटी मतदारसंघातून ग्रीन पार्टीच्या नेत्या आणि महाराष्ट्रातील भाजपा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुतणी नीला विखे पाटील यांची निवड झाली आहे. १३ सप्टेंबर रोजी झालेल्या स्वीडनच्या राष्ट्रीय निवडणुकीत ४१ वर्षीय नीला विखे पाटील यांनी विजय मिळवला. आता त्या स्वीडनच्या संसदेतील ३४९ सदस्यांपैकी एक असतील.

पीटीआय या वृत्तसंस्थेशी बोलताना नीला म्हणाल्या, “३४९ सदस्यांच्या संसदेचा एक भाग होणं खूप छान वाटत आहे. शहर आणि देशासाठी माझं योगदान देण्यास मी उत्सुक आहे.” ज्या लोकांना मतदान करता येत नाही त्यांचं प्रतिनिधित्व करण्याची आणि मुलांसाठी चांगल्या संधी निर्माण करण्याची आपली इच्छा असल्याचं त्यांनी सांगितलं. “ज्यांना मतदानाचा अधिकार नाही, त्यांच्यासाठी मला आवाज बनायचं आहे. ज्या समाजात प्रत्येक मुलाला चांगल्या भविष्याची संधी मिळेल, अशा समाजात मला माझे योगदान द्यायचे आहे. आपल्याला स्वच्छ पाणी, जिवंत निसर्ग आणि मानवनिर्मित नैसर्गिक आपत्ती नसलेला एक राहण्यायोग्य ग्रह हवा आहे,” असेही त्या पुढे म्हणाल्या.

नीला विखे पाटील कोण आहेत?

नीला विखे पाटील यांचा जन्म स्वीडनमध्ये झाला असून त्यांचं बालपण महाराष्ट्रातील अहिल्यानगर येथे गेले. महाराष्ट्रात शैक्षणिक संस्था चालवणाऱ्या ‘विखे पाटील फाउंडेशन’चे अध्यक्ष आणि शिक्षणतज्ज्ञ अशोक विखे पाटील यांच्या त्या कन्या आहेत. माजी केंद्रीय मंत्री बाळासाहेब विखे पाटील यांच्या त्या नात, तर आशियातील पहिल्या सहकारी साखर कारखान्याची स्थापना करणारे विठ्ठलराव विखे पाटील यांच्या त्या पणती आहेत.

नीला विखे पाटील यांचं शिक्षण किती?

नीला विखे यांचा जन्म हा स्वीडनमध्ये झाला असला तरी प्राथमिक शिक्षण त्यांनी काही काळ नगरमध्ये घेतले. महाविद्यालयीन शिक्षण त्यांनी स्वीडन, स्पेन व युरोपात घेतले. त्यांना स्पॅनिश, स्वीडिश व इंग्लिश भाषा अवगत आहेत. गॉथेनबर्ग स्कूल ऑफ बिझनेसमधून अर्थशास्त्र व कायद्याची पदवी त्यांनी मिळविली. माद्रिदमधील दी कम्प्ल्युटन्स विद्यापीठातून एमबीएचे शिक्षण केले. त्यांना अनेक सुवर्णपदकेही मिळाली.

नीला विखे पाटील यांचं राजकीय करिअर कसं आहे?

वयाच्या सोळाव्या वर्षी त्यांनी सोशल डेमोक्रॅटिक पार्टीचे सदस्यत्व स्वीकारले. काही वर्षांपूर्वीच त्या पंतप्रधानांच्या सल्लागार झाल्या होत्या. मात्र या वेळी त्यांच्यावर बांधकाम, अर्थ, अर्थसंकल्प, विपणन, समाजशास्त्र, वित्तीय बाजार, करप्रणाली, आदी जबाबदाऱ्या टाकण्यात आल्या. त्या स्टॉकहोम पालिकेवरही निवडून आल्या आहेत. २०१९ मध्ये त्यांची पंतप्रधानांचे पूर्णवेळ सल्लागार म्हणून निवड झाली होती.

भारतासोबत असलेल्या आपल्या निरंतर बंधांबद्दल बोलताना त्या म्हणाल्या, “माझं भारतावर मनापासून प्रेम आहे आणि मी भारताशी खूप जोडलेली आहे. माझे अनेक जवळचे भारतीय मित्र आहेत. मला माझ्या आजोबांची खूप आठवण येते. त्यांच्या आयुष्याच्या शेवटच्या वर्षांत ते मला दर आठवड्याला फोन करायचे.”