Rahmanullah Lakanwal White House Shooting Suspect: अमेरिकेतील वॉशिंग्टन, डी.सी. मध्ये व्हाईट हाऊसबाहेर नॅशनल गार्ड्सवर गोळीबार करणाऱ्या संशयिताची ओळख पटली असून, त्याचे नाव रहमानउल्लाह लकनवाल असे आहे. हा २९ वर्षीय आरोपी अफगाणिस्तानचा नागरिक आहे. तो २०२१ मध्ये ‘ऑपरेशन अ‍ॅलीज वेलकम’ अंतर्गत अमेरिकेत गेला होता. सीएनएनच्या वृत्तानुसार, हल्लेखोर रहमानउल्लाह लकनवालाच्या व्हिसाची मुदत संपली होती आणि हल्ल्याच्या वेळी तो बेकायदेशीरपणे अमेरिकेत होता.

अमेरिकन अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, या हल्ल्याची चौकशी दहशतवादी कृत्य म्हणून केली जात आहे.

हल्लेखोर लकनवाल कोण आहे?

अमेरिकेने अफगाणिस्तानातून माघार घेतल्यानंतर, बायडेन प्रशासनाने सुरू केलेल्या ‘ऑपरेशन अ‍ॅलीज वेलकम’चा भाग म्हणून लकनवाल वॉशिंग्टनमधील बेलिंगहॅम येथे गेला होता. अधिकाऱ्यांच्या मते, लकनवाल याने हे कृत्य एकट्यानेच केले असून, या हल्ल्यामागे त्याचा काय हेतू होता हे अद्याप समोर आलेले नाही.

बुधवारी दुपारी (अमेरिकन वेळेनुसार) व्हाईट हाऊसजवळ ही गोळीबाराची घटना घडली. त्यावेळी सशस्त्र नॅशनल गार्ड सैनिक परिसरात गस्त घालत होते.

पोलीस अधिकाऱ्यांनी सीएनएनला सांगितले की, स्थानिक वेळेनुसार दुपारी २:१५ वाजता हल्ला करण्यापूर्वी लकनवाल फारागुट वेस्ट मेट्रो स्टेशनजवळ थांबला होता. त्याने कोपऱ्यात जाऊन प्रथम एका महिला नॅशनल गार्डच्या छातीवर आणि नंतर तिच्या डोक्यात गोळी झाडली. त्यानंतर त्याने दुसऱ्या गार्डवर गोळीबार केला. तेव्हा जवळच असलेल्या तिसऱ्या गार्डने हल्लेखोराला खाली पाडले. तोपर्यंत त्याने अनेक गोळ्या झाडल्या होत्या.

नॅशनल गार्ड सैनिकांवर झालेल्या या हल्ल्यानंतर, यूएस सिटीझनशिप अँड इमिग्रेशन सर्व्हिसेसने अफगाण नागरिकांशी संबंधित सर्व इमिग्रेशन प्रक्रिया अनिश्चित काळासाठी स्थगित केल्या आहेत.

प्रत्येक अफगाण नागरिकाची चौकशी होणार

या हल्ल्यानंतर प्रतिक्रिया देताना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले की, हा हल्ला अमेरिकेसमोरील सर्वात मोठा राष्ट्रीय सुरक्षेचा धोका आहे. यावेळी त्यांनी बायडेन प्रशासनावर टीका करताना म्हटले की, “मागील प्रशासनाने जगभरातील २ कोटी अज्ञात व्यक्तींना पडताळणी न करता देशात प्रवेश दिला आहे.”

यावेळी ट्रम्प यांनी घोषणा केली की, अफगाणिस्तानातून येणाऱ्या प्रत्येकाची आता पुन्हा तपासणी केली जाईल आणि अमेरिकेसाठी फायदेशीर नसलेल्या किंवा आपल्या देशावर प्रेम न करणाऱ्या सर्व परदेशी नागरिकांना हद्दपार करण्यासाठी पावले उचलली जातील. ते म्हणाले की, “अमेरिका कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही.”