Who is Raj Kushwah Co-accused with Sonam Raghuvanshi: राजा रघुवंशी हत्या प्रकरणात दिवसेंदिवस नवनवे खुलासे समोर येताना दिसत आहेत. ८ जून रोजी रात्री सोनम रघुवंशीला उत्तर प्रदेशमधील गाझीपूरमधून पोलिसांनी अटक केली. मिझोराममध्ये पती राजा रघुवंशीसोबत बेपत्ता झालेली सोनम थेट दीड हजार किलोमीटर लांब गाझीपूरपर्यंत कशी पोहोचली? यासंदर्भात गूढ वाढू लागलं आहे. त्यातच सोनम व राजा रघुवंशीसोबत या प्रकरणात आता तिसरं एक नाव समोर येत आहे. राजाच्या हत्येसाठी सोनमसोबत २१ वर्षांच्या राज कुशवाह याने कट रचल्याचा दावा पोलिसांनी केला असून त्यालाच प्रकरणातील प्रमुख आरोपी करण्यात आलं आहे. नक्की कोण आहे राज कुशवाह?
नेमकं प्रकरण काय?
११ मे रोजी सोनमचा इंदोरमध्ये राजा रघुवंशीसोबत विवाह झाला. २० मे रोजी हे दोघे फिरायला शिलाँगला जाण्यासाठी निघाले. आधी गुवाहाटीला कामाख्या मंदिरात दर्शन घेतलं. २२ मे रोजी कुटुंबीयांना आपण शिलाँगला जात असल्याचं त्यांनी कळवलं. पण २३ मे पासून दोघेही बेपत्ता झाले. नातेवाईकांनी पोलिसांत तक्रार केली. शोध सुरू झाला. पुढचे ९ दिवस पोलिसांसह अनेक तपास पथकं दोघांचा शोध घेत होते. शेवटी २ जून रोजी राजा रघुवंशीचा मृतदेह मेघालयमध्ये एका मोठ्या खड्ड्यात सापडला. मृतदेहाशेजारी धारदार दाव देखील सापडला.
यानंतर सोनमच्या कुटुंबीयांनी तिचं अपहरण झालं असून तिला बांग्लादेशला नेण्यात आल्याचा आरोप केला. पोलिसांनी शोध सुरू केला. ८ जून रोजी पोलिसांना सोनमचा चुलत भाऊ गोविंदचा फोन आला की सोनम उत्तर प्रदेशच्या गाझीपूरमध्ये एका ढाब्यावर आहे. पोलिसांनी सोनमला तिथून अटक केली. तिच्यावर राजा रघुवंशीच्या हत्येचा आरोप ठेवण्यात आला. आधी सोनमनंच राजाच्या हत्येची सुपारी देऊन हे घडवून आणल्याचं पोलिसांनी सांगितलं. आता या प्रकरणात सोनमला साथ देणाऱ्या राज कुशवाहचंही नाव समोर येऊ लागलं आहे.
कोण आहे राज कुशवाह?
राज कुशवाह हा सोनमचा प्रियकर असल्याचा पोलिसांना संशय असून त्या दोघांमध्ये राजा रघुवंशीच्या हत्येच्या आधी या दोघांमध्ये अनेकदा फोनवर चर्चा झाल्याचीही माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. राज कुशवाहनंच सोनमच्या मदतीने राजा रघुवंशीच्या हत्येचा कट रचला, मारेकऱ्यांना सुपारी दिली आणि शिलाँगमध्ये त्या दोघांच्या ठावठिकाण्याची माहिती मारेकऱ्यांपर्यंत पोहोचवल्याचा दावा पोलिसांकडून करण्यात येत आहे.
राज कुशवाह एका प्लायवूड कंपनीत कामाला आहे. ही कंपनी सोनमच्या कुटुंबीयांच्या मालकीची आहे. सोनम या कंपनीत एचआर विभागात कामाला होती. दोन वर्षांपूर्वी राज कुशवाह आणि सोनम रघुवंशीची ओळख झाली. ओळखीचं रुपांतर मैत्रीत व नंतर प्रेमात झाल्याची माहिती उत्तर प्रदेश क्राईम ब्रांचच्या एका अधिकाऱ्याने दिली.
कुशवाह सोनमच्या घराजवळच राहात होता. पण हल्लीच तो नंदबाग नावाच्या भागात राहायला गेला होता. राजा रघुवंशीची हत्या करणारे मारेकरी याच परिसरात राहात होते. कुशवाहनं विशाल चौहान, आकाश राजपूत व आनंद कुर्मी या मारेकऱ्यांना इथेच हत्येची सुपारी दिल्याचंही क्राईम ब्रांचच्या या अधिकाऱ्याने सांगितल्याचं इंडियन एक्स्प्रेसनं दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे.
सोनमच्या हाताखाली काम करत होता राज कुशवाह!
दरम्यान, राज कुशवाहबाबत राजा रघुवंशीचा चुलत भाऊ विपीन रघुवंशीनं दिलेली माहिती अधिकच रंजक ठरली आहे. “राज कुशवाह सोनमच्या हाताखाली काम करत होता. ते सतत फोनवर बोलत असायचे. मी राज कुशवाहला कधीच पाहिलेलं नाही. मी फक्त त्याचं नाव ऐकलंयय. खरंतर सोनम आणि राजा हे फक्त कामाख्या देवीच्या मंदिरात जाणार होते. पण तिथून आपण शिलाँगला जात असल्याचं त्यांनी सांगितलं. आम्हाला हे माहिती नाही की त्या दोघांपैकी नेमकं कुणी मेघालयला जाण्याचं नियोजन केलं. त्यांनी परतीची तिकिटंही बुक केली नव्हती”, अशी माहिती विपीन रघुवंशीनं दिली आहे.
इस्ट खासी हिल्सचे पोलीस अधीक्षक विवेक सियेम यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज कुशवाह याचे सोनम रघुवंशीशी प्रेमाचे संबंध असल्याची शक्यता आहे. राज कुशवाहनं सोनमसाठी मारेकऱ्यांशी संपर्क साधला आणि त्यांना सुपारी दिली. राज कधीच स्वत: मेघालयमध्ये गेला नव्हता, असंही विवेक सियेम यांनी सांगितलं. या संपूर्ण हत्या प्रकरणात सोनमही सहभागी असल्याची दाट शक्यता आहे असं ते म्हणाले.
सोनम रघुवंशी व राज कुशवाह यांच्यात काय नातं?
दरम्यान, सियेम यांना माध्यमांनी सोनम व राज यांच्यातील प्रेमाचे संबंध या हत्येसाठी कारणीभूत आहेत का? अशी विचारणा केली असता त्यावर सियेम यांनी होकारार्थी उत्तर दिलं. “जर आपण या घटनेसंदर्भात आत्तापर्यंत समोर आलेले पैलू जोडून पाहिले, तर या दाव्यात तथ्य दिसू शकतं. कारण आम्ही जेव्हा हे केलं, तेव्हा सोनम आणि राज कुशवाह यांच्याशी ते सगळे पैलू जोडले गेलेले दिसले. जेव्हा त्या दोघांची चौकशी केली जाईल, तेव्हा त्यावर खात्रीशीर भाष्य करता येईल”, असं सियेम यांनी नमूद केलं.