TMC Split Ritabrata Banerjee : विधानसभेच्या निवडणुकीनंतर पश्चिम बंगालमध्ये मोठ्या राजकीय घडामोडी घडत असल्याचं दिसून येत आहे. विशेषतः ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस पक्षात मोठी फूट पडल्याचं पाहायला मिळत आहे. ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांच्यावर तृणमूल काँग्रेसमधील अनेक नेते नाराज असल्याच्या चर्चा आहेत. या चर्चा असतानाच तृणमूल काँग्रेसच्या ५९ बंडखोर आमदारांच्या गटाला विधानसभेत मान्यता मिळाली असल्याने ममता बॅनर्जींना मोठा धक्का बसला आहे.
तृणमूल काँग्रेसमधील काही आमदार बंडखोरी करण्याच्या हालचाली समजताच ममता बॅनर्जी यांनी आमदार ऋतब्रता बॅनर्जी आणि आमदार संदीपान साहा यांची पक्षातून हकालपट्टी केली. मात्र, तृणमूल काँग्रेसच्या ५९ आमदारांनी ऋतब्रता बॅनर्जी यांना पाठिंबा दिल्याचं पाहायला मिळालं. ऋतब्रता बॅनर्जी यांनी आपल्याला विधानसभेत ५० पेक्षा जास्त आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा केला होता. एवढंच नाही तर तृणमूल काँग्रेस पक्षाचे नेते आपणच असल्याचा दावा करत विधानसभेतील विरोधी पक्षनेते पद आपल्याला मिळावं अशी मागणी ऋतब्रता बॅनर्जी यांनी केली होती.
५९ आमदारांचा पाठिंबा असल्याचं पत्र आमदार ऋतब्रता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगाल विधानसभेच्या अध्यक्षांना दिलं, त्यांच्या या पत्रानंतर विधानसभेच्या अध्यक्षांनी ५९ बंडखोर आमदारांच्या गटाला विधानसभेत मंजुरी देत ऋतब्रता बॅनर्जी यांना विरोधी पक्षनेते म्हणून मान्यता दिली. त्यामुळे ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसमध्ये मोठी फूट पडल्याचं स्पष्ट झालं. त्यामुळे ममता बॅनर्जी यांना मोठा धक्का बसला. दरम्यान, ममता बॅनर्जी यांचा पक्षात फूट पाडणारे ऋतब्रता बॅनर्जी नेमकं कोण आहेत? याची चर्चा आता रंगली आहे. या पार्श्वभूमीवर ऋतब्रता बॅनर्जी यांच्याबाबत थोडक्यात जाणून घेऊयात.
ऋतब्रता बॅनर्जी कोण आहेत?
पश्चिम बंगालमधील उलुबेरिया-पूर्वा विधानसभेचे आमदार ऋतब्रता बॅनर्जी हे तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यापूर्वी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्यसभेचे खासदार होते. नुकत्याच लागलेल्या विधानसभेच्या निकालानंतर त्यांनी तृणमूल काँग्रेसवर जोरदार टीका केली होती. “पक्षाने आपला पराभव स्वीकारलेला नाही. आम्ही जेव्हा निकालानंतर बैठकीला उपस्थित राहण्यासाठी गेलो तेव्हा आम्हाला अभिषेक बॅनर्जी यांच्या कामगिरीसाठी उभे राहून वंदन करण्यास सांगितलं गेलं”, अशी टीका ऋतब्रता बॅनर्जी यांनी केली होती.

दरम्यान, ममता बॅनर्जी यांच्या टीएमसी पक्षात फूट पाडणारे ऋतब्रता बॅनर्जी यांनी आपल्या विद्यार्थी राजकीय कारकिर्दीची सुरुवात डाव्या विचारसरणीच्या एसएफआय संघटनेतून केली होती. त्यानंतर २०२० मध्ये ते टीएमसीमध्ये सामील झाले होते. तसेच ते टीएमसी कामगार संघटनेचे प्रदेशाध्यक्षही होते. २०१४ मध्ये ते राज्यसभेवर निवडून आले होते आणि २०२४ मध्ये ते दुसऱ्यांदा राज्यसभेचे खासदार झाले. आता २०२६ च्या विधानसभा निवडणुकीत ते उलुबेरिया पूर्वा विधानसभा मतदारसंघातून निवडून आले असून आमदार झाले आहेत. तसेच आता ऋतब्रता बॅनर्जी हे टीएमसीच्या ५९ बंडखोर आमदारांच्या गटाचं नेतृत्व करत आहेत.
‘आजही आमच्या नेत्या ममता बॅनर्जीच’ : ऋतब्रता बॅनर्जी
ऋतब्रता बॅनर्जी यांनी ममता बॅनर्जी या आपल्या नेत्या आणि मार्गदर्शक असल्याचं म्हटलं आहे. मात्र, हे बोलताना ऋतब्रता बॅनर्जी यांनी ममता बॅनर्जी यांचे भाचे तथा खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्या विरोधात टोकाची भूमिका घेतल्याचं दिसत आहे. माध्यमांशी संवाद साधताना ऋतब्रता बॅनर्जी यांनी म्हटलं की, “मला हे अगदी स्पष्ट आणि निःसंदिग्धपणे सांगायचं की आजही आमच्या नेत्या केवळ आणि केवळ ममता बॅनर्जी याच आहेत. त्या आमच्या मार्गदर्शक, पालक आणि सल्लागार म्हणून कायम राहाव्यात, अशी आमची मनापासून इच्छा आहे. त्यांनी त्यांच्या अनुभवातून पक्षाला मार्ग दाखवावा, जो या पक्षाचा पाया आहे. मात्र, अभिषेक बॅनर्जी यांचा या विधानसभेशी काहीही संबंध राहिलेला नाही”, असं ऋतब्रता बॅनर्जी यांनी म्हटलं आहे.
ऋतब्रता बॅनर्जी यांनी आपली ताकद कशी दाखवली?
ममता बॅनर्जी यांच्या सभांपासून दूर राहणाऱ्या आमदारांची संख्या सातत्याने वाढत असल्याचं गेल्या काही दिवसांत पाहायला मिळालं. यातच आता ५९ आमदार फुटले आणि त्यांच्या गटाला विधानसभेत मान्यता देखील मिळाली. तसेच ऋतब्रता बॅनर्जी यांनी आता असाही दावा केला आहे की, दोन दिवसांत आणखी दोन टीएमसी आमदार ममता बॅनर्जी यांचा गट सोडून ५९ आमदारांच्या गटात सामील होणार आहेत. त्यामुळे या गटाची संख्या आणखी वाढेल.
तसेच आम्ही सभागृहात सरकारच्या चुकीच्या धोरणांना अत्यंत आक्रमकपणे विरोध करू आणि तृणमूल काँग्रेसच्या जनतेच्या हक्कांसाठी एका जबाबदार आणि खंबीर विरोधी पक्षाची भूमिका आम्ही निभावणार आहोत, असंही ऋतब्रता बॅनर्जी यांनी म्हटलं आहे.

शिंदे पॅटर्नची का होतेय चर्चा?
ऋतब्रता बॅनर्जी यांनी ममता बॅनर्जी यांचा तृणमूल काँग्रेस पक्ष फोडत तब्बल ५९ आमदार गळाला लावले आहेत. तसेच ऋतब्रता बॅनर्जी यांच्या गटाला विधानसभेतही मान्यता मिळाली आहे. तृणमूल काँग्रेस पक्ष फोडल्यानंतर ऋतब्रता बॅनर्जी यांनी ममता बॅनर्जी या आजही आमच्या नेत्या असल्याचं म्हटलं आहे. मात्र, त्यांचे भाचे अभिषेक बॅनर्जी यांच्यावर टीका केली आहे. त्यामुळे पश्चिम बंगालच्या या राजकीय घडामोडींवरून महाराष्ट्रातील शिंदे पॅटर्नची चर्चा होत आहे. या चर्चांचं कारण म्हणजे शिवसेना जशा प्रकारे फुटली होती, अगदी तीच पद्धत पश्चिम बंगालमध्ये देखील पाहायला मिळत असल्याच्या चर्चा सुरू आहेत.
