S. Keerthana TVK Minister and Shivakasi MLA details in Joseph Vijay government : तमिळनाडुच्या मुख्यमंत्रीपदावर टीव्हीके पक्षाचे प्रमुख जोसेफ विजय विराजमान झाले आहेत. आज चेन्नई येथे पार पडलेल्या सोहळ्यात त्यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यांच्याबरोबरच इतर नऊ नेत्यांनीदेखील मंत्रीपदाची शपथ घेतली.

या सर्वांमध्ये सहा दशकांहून अधिक काळ टिकलेले पुरुषांचे वर्चस्व मोडीत काढत, शिवकाशी मतदारसंघातून निवडून आलेल्या २९ वर्षीय टीव्हीके आमदार एस. कीर्तना या सध्या चांगल्याच चर्चेत आहेत. या मतदारसंघातून विजयी होणाऱ्या त्या पहिल्या महिला आमदार ठरल्या आहेत.

निवडणुकीत जिंकल्यानंतर एस. कीर्तना यांनी हिंदीतून संवाद साधला होता ज्यामुळे त्यांच्याकडे सर्वांचे लक्ष्य वेधले गेले होते. आपल्या नेत्याचा संदेश जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावा आणि त्यांना तो समजावा, यासाठी आपण हिंदी भाषेची निवड केल्याचे त्यांनी सांगितले. तमिळनाडूमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून हिंदी लादली जाण्यावरून राजकीय वाद पेटलेला असताना त्यांची ही कृती विशेष ठरली होती.

कोण आहेत एस. कीर्तना?

भारताची ‘फटाक्यांची राजधानी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिवकाशी मतदारसंघातून निवडून आलेल्या एस. कीर्तना संपत या तमिळगा वेत्री कळघमच्या नवनिर्वाचित आमदार आहेत. त्यांनी पूर्वी एक पॉलिटिकल कन्सल्टंट म्हणून काम केले असून त्यांचे पदव्युत्तर शिक्षण झाले आहे. त्यांनी यापूर्वी तमिळनाडूचे माजी मुख्यमंत्री एम. के. स्टालिन यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांसोबत काम केले आहे.

टीव्हीके प्रमुख सी. जोसेफ विजय यांच्या समर्थक असलेल्या एस. कीर्तना यांना एकापेक्षा जास्त भाषा अवगत आहेत. तमिळ माध्यमातील सरकारी शाळेत शिकलेल्या कीर्तना यांनी पुढे इतर भाषांवर प्रभुत्व मिळवले. शिवकाशी मतदारसंघात गेल्या सात दशकांपासून असलेल्या पुरुषांचे वर्चस्व संपवत त्या तिथल्या पहिल्या महिला आमदार झाल्या आहेत.

निवडणूक प्रचारावेळी एस. कीर्तना यांनी विरुधुनगर जिल्ह्यातील शिवकाशीमधील विकास हा केंद्रस्थानी ठेवला होता. त्यांनी सुरक्षितता आणि आरोग्यासंबंधी पायाभूत सुविधांच्या समस्यांवर विशेष लक्ष केंद्रित केले. तसेच त्यांनी फटाक्याची राजधानी असलेल्या मतदारसंघात फक्त एकच अग्निशामक केंद्र असल्याचा मुद्दा अधोरेखित केला, ज्यामुळे आपत्कालीन परिस्थितीसाठीच्या तयारीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. यावेळी त्यांनी सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेतील त्रुटीही अधोरेखित केल्या, त्यांनी सरकारी रुग्णालयात विशेष वैद्यकीय सुविधांचा अभाव असल्याचे निदर्शनास आणून दिले.

कीर्तना यांनी निवडणूक प्रचारादरम्यान फटाका उद्योगात काम करणाऱ्या कामगारांसाठी सर्वसमावेशक कल्याणकारी उपाययोजना लागू करण्याचे आश्वासन दिले. ज्यामध्ये विमा संरक्षण, महिलांना समान वेतन, नियमित आरोग्य तपासणी आणि घातक रसायनांच्या संपर्कात येणाऱ्या कामगारांसाठी चांगल्या उपचारांच्या सुविधा अशी आश्वासने दिली होती. तसेच निवडणुकीतील विजयानंतर पत्रकारांशी बोलताना कीर्तना यांनी प्रचारादरम्यान दिलेली सर्व आश्वासने पूर्ण करणार असल्याचे सांगितले.