Sara Khalifa Death Penalty Egypt TV Presenter Drug Case: अमली पदार्थांच्या आरोपाखाली इजिप्तमधील एका न्यायालयाने टीव्ही निवेदिका सारा खलीफा आणि ११ जणांना दोषी ठरवून फाशीची शिक्षा सुनावली आहे. अमली पदार्थांच्या निर्मितीसाठी लागणारे साहित्य मिळवून त्यांची तस्करी करण्याच्या उद्देशाने संघटित गुन्हेगारी टोळी स्थापन केल्याबद्दल १२ आरोपींना दोषी ठरविण्यात आले. त्यानंतर कैरो येथील फौजदारी न्यायालयाने त्यांना फाशीची शिक्षा सुनावली, असे वृत्त इजिप्तची सरकारी वृत्तसंस्था अल-अहरामने शनिवारी दिले. युरो न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, खलिफाचे वकील वरच्या न्यायालयात अपील करणार आहेत. कायदेतज्ज्ञांच्या मते हे प्रकरण संपलेले नाही.
३९ वर्षीय सारा खलीफा इजिप्तमधील खासगी वृत्तवाहिनी अल-मेहवारवरील लोकप्रिय क्राइम शो ‘मिशन इम्पॉसिबल’ची प्रेझेंटर होती. इन्स्टाग्रामवर तिचे २५ लाखाहून अधिक फॉलोअर्स आहेत. वृत्त निवेदनाबरोबरच ती व्यावसायिक म्हणूनही परिचित होती. खलीफा एक कॉस्मेटिक सर्जरी क्लिनिक आणि एक इव्हेंट प्लॅनिंग कंपनीही चालवते.
या प्रकरणाचे वृत्त आंतरराष्ट्रीय माध्यमात प्रकाशित झालेले आहे. एका निवासी घरातून ७५० किलोहून अधिक अमली पदार्थांचा साठा जप्त करण्यात आला होता. या प्रकरणात न्यायालयाने नऊ सह आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तर इतर सात जणांची निर्दोष मुक्तता केली आहे.
दरम्यान खलिफाने तिच्यावरील आरोप नाकारले आहेत. तिने तपास अधिकाऱ्यांना सांगितले की, मी आयुष्यात कधीही सिगारेट ओढलेली नाही. मी निर्दोष आहे. इजिप्तमधील माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, सुनावणीदरम्यान खलीफा न्यायालयात रडत होती आणि तिने न्यायालयाकडे दयेची मागणी केली. “कृपया माझे म्हणणे ऐका. माझ्या आई-वडिलांनी मला चांगले संस्कार दिले आहेत. ते श्रद्धाळू लोक आहेत. मला अमली पदार्थातून मिळणाऱ्या पैशांचा लोभ नाही”, असे आर्जव सारा खलीफाने केले.
सरकारी वकिलांनी न्यायालयात सांगितले की, सदर टोळी विदेशातून कच्चा माल आयात करून त्यापासून सिंथेटिक ड्रग्ज तयार करून घरात त्याची साठवणूक करत असे. तपास यंत्रणेने सांगितले की, टोळीचे सदस्य उत्पादन आणि वितरण या कामांची विभागणी करत होते. अमली पदार्थांबरोबरच परवाना नसलेली शस्त्रे आणि दारुगोळा जप्त करण्यात आला.
सरकारी वकिलांनी पुढे म्हटले की, अमली पदार्थ उत्पादित करण्यासाठी आणि त्याची साठवणूक करण्यासाठी एका निवासी मालमत्तेचा वापर करत होते.
खलिफावर कोणते आरोप?
सरकारी वकिलांनी केलेल्या दाव्यानुसार, खलिफाने अमली पदार्थांच्या काही कारवायांसाठी निधी पुरवला होता. तसेच रॅकेटशी संबंधित वरिष्ठ सदस्यांची भेट घेण्यासाठी विदेशात प्रवास केला आणि त्यांच्या इजिप्तमधील हस्तकांमध्ये दुवा म्हणून काम केले. सारा खलिफाचा भाऊ मोहम्मद खलीफा हादेखील अमली पदार्थांची निर्मिती आणि चाचणीमध्ये सहभागी असलेल्यांपैकी एक होता, असे सांगितले जाते. त्यालाही फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
