Shantanu Naidu Ratan Tata Friendship: उद्योगपती रतन टाटा यांचं निधन झालं आहे. त्यांच्या निधनानंतर त्यांचा कमी वयाचा जवळचा मित्र शांतनू नायडू याने भावनिक पोस्ट केली आहे. रतन टाटा यांच्या जाण्याने जी पोकळी निर्माण झाली आहे, ती भरून काढण्याचा आयुष्यभर प्रयत्न करेन, असं शांतनूने म्हटलंय. ३० वर्षांचा शांतनू व रतन टाटा खूप जवळचे मित्र होते. त्या दोघांची पहिली भेट कशी झाली आणि मैत्री कशी झाली, याचा किस्सा खुद्द शांतनूने एका मुलाखतीत सांगितला होता.
रतन टाटा यांनी स्वतः फोन करून शांतनूला सोबत काम करण्याची ऑफर दिली होती. ‘ह्युमन्स ऑफ बॉम्बे’ने शांतनूचा प्रवास एका पोस्टमधून सांगितला होता. रतन टाटांशी भेट कशी झाली आणि शांतून काय करतो याबद्दल त्यानेच या पोस्टमध्ये माहिती दिली होती. कोण आहे शांतनू नायडू? त्याची आणि रतन टाटा यांच्या भेटीची कहाणी जाणून घेऊयात.
कोण आहे शांतनू नायडू?
Who is Shantanu Naidu? शांतनू नायडूचा जन्म १९९३ मध्ये पुण्यातील एका तेलुगू कुटुंबात झाला. शांतनूने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून अभियांत्रिकी पदवी आणि कॉर्नेल जॉन्सन ग्रॅज्युएट स्कूल ऑफ मॅनेजमेंटमधून एमबीए केले आहे. टाटा एल्क्सीमध्ये ऑटोमोबाईल डिझाईन इंजिनिअर म्हणून त्याने करिअरची सुरुवात केली. त्याने भटक्या श्वानांसाठी बनवलेल्या एका डिव्हाईसमुळे त्याची अन् रतन टाटा यांची भेट झाली होती.
श्वानांवरचं प्रेम
श्वानांबद्दल असलेल्या प्रेमामुळे रतन टाटा यांच्याशी भेट झाली, असं शांतनूने सांगितलं होतं. “२०१४ मध्ये मी पदवीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर टाटा ग्रुपमध्ये काम करु लागलो. सगळं काही छान सुरू होतं. मात्र एकेदिवशी ऑफिसमधून घरी जाताना मला एका कुत्र्याचा मृतदेह रस्त्याच्या मधोमध पडलेला दिसता. मला कुत्र्यांची खूप आवड आहे. मी अनेकदा कुत्र्यांना वाचवलं होतं. त्यामुळे तो मृतदेह पाहून मला खूप दु:ख झालं. मी तो मृतदेह रस्त्यावरुन बाजूला घेण्याचा विचार करत होतो आणि तितक्यात एक गाडी त्या मृतदेहाला चिरडून निघून गेली, त्यावेळी मला अगदी कसंतरी वाटलं. याबद्दल काहीतरी करायला हवं अशी जाणीव मला झाली. मग मी माझ्या काही मित्रांना फोन करून ‘कॉलर रिफलेक्टर’ तयार केला. जेणेकरून रिफलेक्टर गळ्यात असणारे कुत्रे वाहन चालकांना दुरूनही दिसतील,” असं शांतनूने सांगितलं होतं.
हेही वाचा – रतन टाटा यांच्या निधनानंतर सिमी गरेवाल यांची भावनिक पोस्ट; म्हणाल्या, “तुमचं जाणं सहन करणं…”
शांतनू आणि रतन टाटा यांची भेट
पुढे तो म्हणाला, “हे रिफलेक्टर काम करेल की नाही याची मला कल्पना नव्हती. पण दुसऱ्याच दिवशी मला फोन आला आणि यामुळे एका कुत्र्याचा जीव वाचल्याचं मला कळालं. मला खूप आनंद झाला. माझ्या कामाची खूप चर्चा झाली आणि माझ्या कामाची दखल घेतली गेली. अनेकांना या रिफलेक्टर कॉलर विकत घ्यायच्या होत्या मात्र आमच्याकडे त्या तयार करण्यासाठी पैसे नव्हते. त्यावेळी माझ्या वडिलांनी मला एक सल्ला दिला. टाटा ग्रुपचे अध्यक्ष रतन टाटा यांनाही कुत्र्यांबद्दल भरपूर प्रेम आहे त्यांना तू पत्र लिहून याबद्दल कळव असं त्यांनी मला सुचवलं. आधी मी नकार दिला, नंतर मी रतन टाटा यांना एक पत्र पाठवलं. काही दिवसांनी मी त्या पत्राबद्दल विसरलो. त्यानंतर अचानक एकदा मुंबईतील ऑफिसमध्ये ते मला भेटले आणि “तुझ्या कामाने मी प्रभावित झालो आहे” असं सांगितलं. आजही तो प्रसंग सांगताना माझ्या अंगावर काटा येतो. त्यानंतर ते मला त्यांच्या घरी घेऊन गेले आणि आमच्या मैत्रीला सुरुवात झाली. नंतर त्यांनी रिफेलक्टर कॉलरच्या मोहिमेला आर्थिक मदत केली.”
हेही वाचा – एकेकाळी रतन टाटा होते ‘या’ बॉलीवूड अभिनेत्रीच्या प्रेमात, पण होऊ शकलं नाही लग्न
शिक्षणासाठी नोकरी सोडण्याचा निर्णय
काही काळाने शांतनूने टाटामधील नोकरी सोडून परदेशात शिक्षणासाठी जायचं ठरवलं, तेव्हा त्याने रतन टाटा यांना एक वचन दिलं होतं. “मी शिक्षणासाठी परदेशात गेलो. मात्र शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मी माझं संपूर्ण आयुष्य टाटा ट्रस्टमध्ये काम करेन, असं आश्वासन मी रतन टाटांना दिलं. त्यांनी मला हसत हसत होकार दिला,” असं शांतनूने सांगितलं.
…अन् रतन टाटा यांनी फोन करून दिली ऑफर
शांतनू भारतात परतल्यावर रतन टाटा यांनी फोन करून त्याला कामाची ऑफर दिली. “मी शिक्षण पूर्ण करुन भारतात परतल्यावर त्यांनी मला फोन केला. ‘माझ्या ऑफिसमध्ये बरंच काम आहे. तू माझा असिस्टंट होशील का?’ असं त्यांनी थेट विचारलं. काय बोलावं मला सूचत नव्हतं. अकेर मी त्यांना होकार दिला,” असं शांतनू म्हणाला होता.
रतन टाटा नावाचे सुपर ह्युमन
“चांगला मित्र, चांगला मार्गदर्शक आणि चांगला बॉस मिळावा म्हणून माझ्या वयाचे तरुण झटताना दिसतात. त्यावेळी मला माझ्या नशिबावर विश्वास बसत नाही. कारण हे सगळं मला रतन टाटा नावाच्या एका सुपर ह्युमनमध्ये मिळालं आहे. लोक त्यांना बॉस म्हणतात पण मी त्यांना मिलेनियल डंबलडोर असं म्हणतो,” असं शांतनूने ह्युमन्स ऑफ बॉम्बेशी २०१८ मध्ये बोलताना सांगितलं होतं.
© IE Online Media Services (P) Ltd