Tabacco Businessman Son Lamborghini Accident: श्रीमंतांच्या मुलांनी महागड्या, आलिशान गाड्या बेदरकारपणे चालवून रस्त्यांवर सामान्यांना चिरडल्याच्या अनेक घटना आजवर घडल्या आहेत. रविवारी यात कानपूरचीही भर पडली. कानपूरच्या व्हीआयपी रस्त्यावर प्रसिद्ध तंबाखू व्यापारी केके मिश्रा यांच्या मुलाने बेदरकारपणे गाडी चालवून सहा जणांना उडवले. शिवम मिश्रा असे या मुलाचे नाव असून तो नशेत असल्याची माहिती आता समोर आली आहे.

रविवारी दुपारी ३.१५ वाजण्याच्या सुमारास शिवम मिश्रा आलिशान लॅम्बोर्गिनी गाडी भरधाव वेगाने चालवत ग्वाल्टोली परिसरातील रेव्ह – ३ मॉलजवळ आला. तिथे त्याने एका ऑटो-रिक्षाला धडक दिली. तसेच रस्त्यांवर उभ्या असलेल्या दुचाकी आणि पादचाऱ्यांना उडवत तो पुढे निघून गेला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यावेळी गाडी शिवम मिश्राच चालवत होता.

पोलीस उपायुक्त अतुल कुमार श्रीवास्तव यांनी या प्रकरणावर माहिती देताना सांगितले की, रविवारी दुपारी ही दुर्घटना घडली. शिवम मिश्रा गाडी चालवत असताना त्याचे नियंत्रण सुटले आणि रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या अनेक गाड्यांना, दुचाकींना आणि पादचाऱ्यांना त्याने धडक दिली. यामुळे या परिसरात काही काळ दहशतीचे वातावरण होते.

कोण आहे शिवम मिश्रा?

शिवम हा उत्तर प्रदेशचे प्रसिद्ध तंबाखू व्यावसायिक केके मिश्रा यांचा मुलगा आहे. शिवम मिश्राची ही पहिलीच वेळ नाही, ज्यामुळे तो चर्चेत आहे. २०२४ मध्ये प्राप्तीकर विभागाने बंशीधर एक्सपोर्ट्स प्रा.लि. ची चौकशी सुरू केल्यानंतर शिवम मिश्रा चर्चेत आला होता. हा तपास पुढे पूर्ण राज्यभर आणि नंतर कानपूर, मुंबई, दिल्ली आणि गुजरातच्या कार्यालयापर्यंत गेला.

बंशीधर कंपनीने त्यांचे वार्षिक उत्पन्न २० ते २५ कोटी असल्याचे जाहीर केले होते. मात्र कंपनीची प्रत्यक्ष उलाढाल १०० ते १५० कोटींच्या घरात असल्याची माहिती समोर आली होती. प्राप्तिकर विभागाच्या धाडीत कार्यालयातून सुरुवातीला ४.५ कोटी रुपयांची रोकड मिळाली होती. त्यानंतर पुन्हा इतरत्र मारलेल्या धाडीत ७ कोटींची रोकड, सोन्या-चांदीचे दागिने ज्याची किंमत २.५ कोटी रुपये असल्याचे सांगितले गेले.

आलिशान गाड्यांचा संग्रह

एनडीटीव्हीच्या वृत्तानुसार, शिवम मिश्रा दिल्लीच्या वसंत विहार येथे आलिशान जीवनशैली जगतो. त्याच्याकडे तब्बल ५० कोटींच्या विविध आलिशान गाड्या आहेत. या सर्व गाड्यांना ४०१८ असा एकसारखाच नंबर आहे.