Who is Sidharth Babu? : दिल्लीत नुकतीच १८ वी ‘ब्रिक्स शिखर परिषद’ पार पडली. या ‘ब्रिक्स’ परिषदेसाठी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन, चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग, इराणचे अध्यक्ष पेझेश्कियान यांच्यासह अनेक देशांचे प्रमुख सहभागी झाले होते. या परिषदेत विविध जागतिक विषयांवर चर्चा झाली. नवी दिल्लीत पार पडलेल्या ब्रिक्स परिषदेमधील एका खास फोटोची जगभरात मोठी चर्चा झाली.

या फोटोत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग हे होते. मात्र, याच फोटोमध्ये असलेल्या एका भारतीय अधिकाऱ्याची देखील आता मोठी चर्चा होत आहे. सिद्धार्थ बाबू असं त्यांचं नाव असून ते इंडियन फॉरेन सर्व्हिस (IFS) अधिकारी आहेत. ‘ब्रिक्स’ परिषदेदरम्यान मोदी, पुतिन आणि जिनपिंग यांच्या एका फोटोत ते देखील दिसून आले आहेत. त्यामुळे त्यांची मोठी चर्चा होत आहे. या संदर्भातील वृत्त मिंटने दिलं आहे.

सिद्धार्थ बाबू कोण आहेत?

सिद्धार्थ बाबू हे इंडियन फॉरेन सर्व्हिस अर्थात IFS अधिकारी आहेत. ते सध्या परराष्ट्र मंत्रालयाच्या (MEA) पूर्व आशिया विभागात उपसचिव म्हणून कार्यरत आहेत. त्यांची भूमिका आणि त्यांना अवगत असलेली ‘मँडरिन’ (चिनी) भाषा आणि चीनमधील कामाचा अनुभव असल्यामुळे ते अनेक उच्च-स्तरीय मुत्सद्दी घडामोडींमध्ये महत्त्वाच्या ठिकाणी सहभागी असल्याचं दिसून येतं.

सिद्धार्थ बाबू हे इंडियन फॉरेन सर्व्हिसच्या २०१७ च्या बॅचचे अधिकारी आहेत. त्यांनी आंतरराष्ट्रीय संबंध, विशेषतः भारताचे पूर्व आशियासोबतचे संबंध या क्षेत्रांत काम केलेलं आहे. सिद्धार्थ बाबू हे मूळचे केरळमधील कोची येथील आहेत. त्यांच्या ‘लिंक्डइन’ प्रोफाईलनुसार त्यांनी २००८ ते २०१२ या काळात मेकॅनिकल इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण केलेलं आहे.

मेकॅनिकल इंजिनिअरिंग ते IFS अधिकारी

नागरी सेवा परीक्षेच्या पहिल्या प्रयत्नात सिद्धार्थ बाबू यांची निवड झाली नाही. त्यानंतरच्या वर्षी त्यांनी पुन्हा परीक्षा दिली आणि सिद्धार्थ बाबू यांनी ऑल इंडिया रँक १५ मिळवला. अखेरीस त्यांनी ‘इंडियन फॉरेन सर्व्हिस’ची निवड केली. त्यांनी डिसेंबर २०१७ मध्ये नवी दिल्ली येथे प्रशिक्षणार्थी अधिकारी म्हणून कारकिर्दीची सुरुवात केली. त्यांची पहिली परदेशातील नियुक्ती त्यांच्या पुढील कारकिर्दीसाठी महत्त्वाची ठरली.

सिद्धार्थ बाबू ऑगस्ट २०१८ मध्ये तृतीय सचिव म्हणून बीजिंगला गेले आणि नंतर त्यांची द्वितीय सचिवपदी पदोन्नती झाली. जिथे त्यांनी जुलै २०२२ पर्यंत सेवा बजावली. चीनमधील चार वर्षांच्या नियुक्तीमुळे त्यांना देशाचा आणि तेथील राजकीय व राजनैतिक वातावरणाचा प्रत्यक्ष अनुभव मिळाला. तसेच त्यांच्या मँडरिन भाषेच्या कौशल्यातही सुधारणा झाली.

सिद्धार्थ बाबू हे चीननंतर अमेरिकेत गेले. ऑगस्ट २०२२ ते जून २०२४ या काळात त्यांनी कॅलिफोर्नियातील मॉन्टेरी काउंटीमध्ये वाणिज्यदूत म्हणून काम केलं. याच काळात त्यांनी मॉन्टेरी येथील मिडलबरी इन्स्टिट्यूट ऑफ इंटरनॅशनल स्टडीजमधून भाषा दुभाषी आणि अनुवाद या विषयात मास्टर ऑफ आर्ट्सचं शिक्षण घेतलं. त्यानंतर ते नवी दिल्लीला परतले. जानेवारी २०२५ मध्ये ते पूर्व आशिया विभागात उपसचिव झाले, हेच पद ते सध्या भूषवत आहेत.