Sonia Sehrawat CRPF Assistant Commandant Viral Story: दंगल किंवा अनियंत्रित जमाव नियंत्रणात आणण्यासाठी आरएएफ अर्थात रॅपिड ॲक्शन फोर्सच्या जवानांना तैनात केले जाते. दिल्लीतील जंतर-मंतर येथील विद्यार्थ्यांचे आंदोलन आटोक्यात आणण्यासाठी दिल्ली पोलीस आणि आरएएफच्या अनेक तुकड्या उतरल्या होत्या. २० जुलै रोजी संसदेवर निघालेल्या मोर्चातील विद्यार्थ्यांना या दोन्ही दलांकडून अमानुष मारहाण करण्यात आली. या मारहाणीनंतर असिस्टंट कमांडंट सोनिया सेहरावत यांची एक मुलाखत सोशल मीडियावर व्हायरल झाली. ज्यात त्या लाठीचार्जचे समर्थन करत होत्या. रिलस्टार असलेल्या सोनिया सेहरावत या मुलाखतीनंतर आता चर्चेत आहेत.

२० जुलै रोजी विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जनंतर सोनिया सेहरावत यांनी एका युट्यूब वाहिनीला मुलाखत दिली होती. यात त्यांनी लाठीचार्जचे समर्थन केले. तसेच विद्यार्थी हिंसक झाल्यानंतर चेंगराचेंगरी होऊ नये म्हणून आम्ही कारवाई केली, असे त्या म्हणाल्या. तसेच या कारवाईबाबत इतर काही प्रश्न विचारल्यानंतर राजकीय प्रश्नांना उत्तर देणार नाही, असेही त्यांनी म्हटले. यामुळे इंटरनेटवर त्यांच्या नावाची चर्चा होऊ लागली.

यानंतर सोनिया सेहरावत यांनी आपल्या इन्स्टाग्राम हँडलवर कॉक्रोच जनता पार्टीच्या विरोधात स्टोरी पोस्ट केली होती. घरात जमिनीवर उलटा पडलेल्या एका झुरळाचा व्हिडीओ त्यांनी पोस्ट केला होता. झुरळ उपडे झाल्यामुळे स्वतःहून सरळ होत नव्हते. या व्हिडीओला लिहिलेल्या कॅप्शनमध्ये सोनिया सेहरावत म्हणाल्या, “हे स्वतःला सांभाळू शकत नाहीत आणि देश सांभाळायला निघाले आहेत.”

इन्स्टाग्रामवर सहा लाखांहून अधिक फॉलोअर्स असलेल्या सोनिया सेहरावत यांनी ही स्टोरी पोस्ट करताच त्याचे पडसादही लगेच उमटले. त्यांची स्टोरी सोशल मीडियावर व्हायरल झाली. ज्यावरून त्यांना ट्रोलिंगचा सामना करावा लागला. या ट्रोलिंगनंतर सोनिया सेहरावत यांनी स्टोरी डिलीट केली.

सीजेपीचा पलटवार

सेहरावत यांच्या पोस्टनंतर कॉक्रोच जनता पार्टीने याचा समाचार घेतला. “हे खूपच धक्कादायक आहे. आरएएफच्या या जवानांना शांततापूर्ण पद्धतीने आंदोलन करणारे विद्यार्थी झुरळ वाटतात. म्हणूनच ते विद्यार्थ्यांविरोधातील अमानुष मारहाणीचे समर्थन करत आहेत”, असा टोला सीजेपीने लगावला.

पण आम्ही झुरळ आहोत आणि झुरळ कधी मरत नाहीत, असेही सीजेपीने सुनावले.

सेहरावत यांच्या स्टोरीमुळे खळबळ

द प्रिंटला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरएएफ आणि सीआरपीएफमधील अधिकारी आणि जवानांमध्ये या स्टोरीवरून चर्चा सुरू आहे. या स्टोरीमुळे आरएएफची बदनामी होत असल्याचे बोलले जात आहे. आरएएफ हे एक प्रोफेशनल युनिट असून जमाव नियंत्रण आणि दंगल नियंत्रण करण्याची महत्त्वाची जबाबदारी आमच्यावर असते.

सुरक्षा दलात कार्यरत असलेल्या जवानांना आपल्या गणवेषात रिल्स बनविणे किंवा हे फोटो सोशल मीडियावर टाकण्यास मनाई असते. सेवा नियमातील अटींनुसार त्यांनी सोशल मीडियावरील प्रसिद्धीपासून दूर राहणे अपेक्षित असते. मात्र सोनिया सेहरावत यांच्या इन्स्टाग्रामवर गणवेषात अनेक रिल्स आणि फोटो दिसत आहेत.

Sonia Sehrawat controversy
सोनिया सेहरावत यांच्या इन्स्टा स्टोरीनंतर त्यांच्यावर टीका होत आहे.

कोण आहेत सोनिया सेहरावत?

मूळच्या हरियाणाच्या असलेल्या सोनिया सेहरावात या सीआरपीएफ (केंद्रीय सुरक्षा दल) मध्ये असिस्टंट कमांडंट असून त्या सध्या शीघ्र कृती दलात (RAF) काम करत आहेत. यासह त्या सोशल मीडियावर फिटनेस, डान्स, ट्रेंडिंगशी निगडित रिल्स बनवतात.

शिक्षण घेत असताना त्यांनी एनसीसीमध्ये भाग घेतला. सुरक्षा दलात सामील होण्यासाठी त्या प्रयत्नशील होत्या.