Pulkit Mani PM Modi Mimicry Controversy: काँग्रेस नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या उपस्थितीत इंदूर येथे आयोजित ‘छात्रों की गूंज’ या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नक्कल केल्यामुळे स्टँडअप कॉमेडियन पुलकित मणी वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. या घटनेनंतर भाजपा आणि काँग्रेसमध्ये जोरदार राजकीय वाद पेटला असून भाजपाने काँग्रेसवर तीव्र शब्दांत टीका केली आहे. काँग्रेस आता राजकीय पक्ष न राहता “विदुषकांची टोळी” आणि सर्कस बनली आहे, असा टोला भाजपाने लगावला; तर दुसरीकडे राहुल गांधींचा ‘असंस्कृत नाराज फुफा’ असा उल्लेख करत भाजपा नेत्यांनी टीकास्त्र सोडले.
नेमका वाद काय?
काँग्रेसच्या वतीने शनिवारी (१९ सप्टेंबर) इंदूरमध्ये ‘छात्रों की गूंज’ या विद्यार्थी संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमादरम्यान राहुल गांधींबरोबर मंचावर पुलकित मणी याने पूर्वी केलेल्या एका रिलमधील मिमिक्री करून दाखवली. काँग्रेसने ‘एक्स’वर शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये पुलकित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शैलीची नक्कल करताना दिसतो. हीच नक्कल त्याने यापूर्वी त्याच्या रिलमध्ये केली होती. हे रिल नंतर सोशल मीडियावरून हटविण्यात आले होते.
काँग्रेसच्या कार्यक्रमात पुलकित हसत मंचावर येतो आणि राहुल गांधींना आलिंगन देतो. “माय फ्रेंड, कसे आहात?” अशी विचारणा तो करतो. त्यावर राहुल गांधी, “मी मजेत आहे; मोदीजी, तुम्ही कसे आहात?” असा प्रश्न विचारतात. यावर पुलकित, “ग्रेट हॅरेसमेंट” असे उत्तर देत पुन्हा ‘माय फ्रेंड’ म्हणत हसू लागतो. त्यानंतर राहुल गांधी “तुम्हाला भेटून छान वाटले, पुढे सांगा” असे म्हणतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जागतिक नेत्यांना भेटल्यावर कसे वागतात, याचा संदर्भ पुलकित देत असल्याचे सोशल मीडियावर सांगितले जाते.
भाजपकडून संतप्त प्रतिक्रिया
या प्रकरणावर केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी ‘एक्स’वर पोस्ट करत राहुल गांधींवर टीका केली. “असंस्कृत नाराज फुफा! मंचावर येऊन प्रत्येक वेळी पंतप्रधान मोदींच्या नावाचा वापर करण्याची काँग्रेसची सवय जुनी आहे. राहुल गांधींनी स्वतःला आरशात पाहिले पाहिजे,” असा टोला गोयल यांनी लगावला.
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनीही काँग्रेसवर सडकून टीका केली. “जवळपास सहा दशके देशावर राज्य करणारा पक्ष अशा सर्कसमध्ये रूपांतरित होईल, याची कल्पनाही केली नव्हती. स्वतःच्या कमी होणाऱ्या समर्थकांचे मनोरंजन करण्यातच काँग्रेस सध्या व्यस्त आहे. पंतप्रधान मोदी हे जगातील सर्वाधिक लोकप्रिय नेते आहेत, याचा प्रत्येक भारतीयाला अभिमान आहे. काँग्रेस आता कॉमेडियन्स आणि विदुषकांचा पक्ष बनली आहे,” अशा शब्दांत रिजिजू यांनी संताप व्यक्त केला.
पुलकित मणी नेमका कोण?
पुलकित मणी हा एक स्टँडअप कॉमेडियन असून राजकीय उपहास, सार्वजनिक क्षेत्रातील व्यक्तींची नक्कल आणि दैनंदिन जीवनावरील विनोदांसाठी ओळखला जातो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या देहबोलीची हुबेहूब नक्कल केल्यामुळे तो समाजमाध्यमांवर विशेष चर्चेत आला.
२०२१ पासून स्टँडअप कॉमेडी क्षेत्रात कार्यरत
इन्स्टाग्रामवर ‘@hunnywhoisfunny’ या नावाने पुलकितचे खाते असून त्याचे सुमारे ६ लाख १० हजारांहून अधिक फॉलोअर्स आहेत. त्याचा ‘रॉ हनी’ हा अर्ध्या तासाचा पहिला स्टँडअप शो फेब्रुवारी २०२६ मध्ये यूट्यूबवर प्रदर्शित झाला होता. कॉमेडियन होण्यापूर्वी पुलकितने नोएडातील एका शाळेत फ्रेंच भाषेचा शिक्षक म्हणून काम केले होते. तसेच तो भाषांतराची कामेही करत होता.

राजकीय वाद पेटताच शो रद्द
या वादानंतर पुलकित मणीने रविवारी इन्स्टाग्रामवर स्टोरी पोस्ट करून उत्तर प्रदेशातील त्याचे सर्व नियोजित शो रद्द झाल्याची माहिती दिली. नोएडा, लखनौ आणि कानपूर येथील त्याचे कार्यक्रम आता होणार नाहीत.
“अपरिहार्य कारणांमुळे माझा नोएडामधील शो रद्द करावा लागत आहे, याबद्दल मी दिलगीर आहे. प्रेक्षकांनी सहकार्य करावे ही विनंती.” मात्र, त्यानंतर काही वेळातच दुसऱ्या एका निवेदनात त्याने स्पष्ट केले, “काही गुंड प्रवृत्तीच्या कार्यकर्त्यांकडून सातत्याने मिळणाऱ्या धमक्यांमुळे मला लखनौ आणि कानपूर येथील शो रद्द करावे लागत आहेत.”
