Vijeta Dahiya : कॉक्रोच जनता पार्टीने (CJP) विजेता दहिया या त्यांच्या प्रवक्त्याची हकालपट्टी केली आहे. कॉक्रोच जनता पार्टीचं देशातल्या तरुणांना न्याय देण्यासाठी आंदोलन सुरु आहे. जंतरमंतर या ठिकाणी हे आंदोलन सुरु असतानाच विजेता दहिया CJP च्या प्रवक्त्याचा बर्गर खात असतानाचा व्हिडीओ समोर आला. विजेता दहियाचं हे वर्तन योग्य नाही असं म्हणत पक्षाने त्याला प्रवक्ते पदावरुन हटवलं. कोण आहे विजेता दहिया आपण जाणून घेऊ.

विजेता दहियाबाबत कॉक्रोच जनता पार्टीने काय म्हटलं आहे?

“विजेता दहियाच्या असंवेदनशील कृतीचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो. पोलिसांकडून होणाऱ्या लाठीचार्जचा आंदोलक आणि टीममधील लोक सामना करत होते, त्यावेळीचा विजेता दहियाचा बर्गर खातानाचा व्हिडीओ समोर आला आहे. हे त्याचे वर्तन अमान्य आहे. दहियाची कृती आमच्या चळवळीच्या मूल्यांशी व तत्त्वांशी पूर्णपणे विसंगत आहे”, असे कॉक्रोच जनता पार्टीने एक्सवरुन प्रसिद्ध केलेल्या एका निवेदनात म्हणत कॉक्रोच जनता पार्टीने विजेता दहियाला पदावरुन हटवलं आहे.

कोण आहे विजेता दहिया?

कॉक्रोच जनता पार्टीने मागच्या महिन्यात विजेता दहियाचं नाव प्रवक्ता म्हणून जाहीर केलं होतं. विजेता दहिया राजकीय प्रकरणांचा अभ्यासक आहे तसंच रणनीती विश्लेषक आहे असं सीजेपीने सांगितलं होतं.

विजेता दहिया हा कंटेट क्रिएटर, लेखक आणि फिल्म निर्माता आहे. त्याने अनेक युट्यूबर्ससाठी रिसर्च केला आहे. त्यांना त्यांचे एपिसोड तयार करण्यासाठी मोलाचं सहकार्य केलं आहे.

विजेता दहियाने पॉवर ऑफ युनिव्हर्स, टू हेल विथ दॅट जॉब अशी बेस्ट सेलर्स पुस्तकं लिहिली आहेत. डीटीयू मधून त्याने शिक्षण घेतलं आहे.

विजेता दहियाने दरारें आणि ओपरी पराई असे दोन हरियाणवी चित्रपट लिहिले आहेत आणि दिग्दर्शितही केले आहेत.

विजेता दहिया हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर चालणारा तरुण आहे. त्याने त्याच्या एक्स आणि इन्स्टाग्राम प्रोफाइलमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं लोकशाहीबाबतचं वाक्य लिहिलं आहे.

ध्रुव राठीसह विजेता दहियाने केलं आहे काम

विजेता दहियाने सांगितलं होतं की त्याने ध्रुव राठीसह काम केलं आहे. तसंच करिअरच्या सुरुवातीला त्याने रॅनबॅक्सी या कंपनीत काम केलं आहे. नोकरी करुन काही पैसे जमा केल्यावर विजेता दहिया मुंबईत आला. मुंबईत आल्यावर तो विविध गोष्टी करु लागला. त्याने एका मुलाखतीत सांगितलं होतं की मुंबईत आल्यावर फिल्म वर्कशॉप केलं आणि त्यानंतर मला दरारे या चित्रपटाची कथा सुचली जी मी लिहिली होती. ध्रुव राठीने मला कॉक्रोच जनता पार्टीत जा असं सांगितलं होतं असंही विजेता दहिया म्हणाला होता.

बर्गर वादावर काय म्हणाला विजेता दहिया?

मी एक बर्गर खाल्ला त्यात एवढा वाद होण्यासारखं काय आहे? आज त्याचा एवढा मोठा मुद्दा का तयार केला गेला? एखादा माणूस बर्गर का खातो? दोनच कारणं असतात एकतर त्याला भूक लागलेली असते किंवा दुसरी बाब म्हणजे त्याला बर्गर आवडत असतो. विषय संपला असं म्हणत विजेता दहियाने बर्गर खातच प्रतिक्रिया दिली आहे. एवढंच नाही तर पुढे विजेता म्हणतो तुम्ही काय मला निवडून दिलंय का? आंदोलक ही काय नोकरी आहे का? असा प्रश्न विचारत विजेता दहियाने प्रतिक्रिया दिली आहे.