गुयानाच्या संसदेत एक खास गोष्ट पाहण्यास मिळाली. विकास रामकिशुन या भारतीय वंशाच्या खासदाराने एका विरोधी पक्षनेत्याला चक्क हिंदीतून आव्हान दिलं. त्या नेत्याने विकास यांच्या हिंदी भाषेवर प्रश्न उपस्थित करत हा दावा केला की त्याला हिंदी भाषा समजत नाही. यानंतर उत्तर देताना विकास रामकिशुन यांनी पुन्हा एकदा फक्त हिंदीतून भाषण केलं. गुयानाच्या संसदेत घडलेल्या या घटनेने सगळेच चकित झाले.
विकास रामकिशुन यांनी काय केलं?
विकास रामकिशुन यांनी स्पीकरची संमती घेतली आणि विरोधी पक्षाच्या सदस्याचं नाव घेत त्यांना थेट हिंदीतून आव्हान दिलं. त्यांनी थेटपणे हे स्पष्ट केलं की ते कधीही कुठल्याही विषयावर आणि कुठल्याही वृत्तवाहिनीवर त्यांच्याशी वाद-विवाद करायला तयार आहेत. पण ही सगळी चर्चा हिंदीतच झाली पाहिजे.
विकास रामकिशुन यांनी असं का केलं?
विकास रामकिशुन यांनी हिंदीतून हे आव्हान विरोधी खासदाराला दिलं. याचं कारण विरोधी पक्षाचे खासदार विष्णु पांडे यांनी हा आरोप केला होता की विकास रामकिशुन यांना हिंदी भाषा येत नाही. यानंतर विकास रामकिशुन यांनी हिंदीतूनच खासदार विष्णु पांडेंना आव्हान दिलं आणि म्हणाले मी कुठलाही कागद न घेता येतो. तुम्ही म्हणाल त्या वृत्तवाहिनीवर आपण हिंदीत वाद विवाद करु. हिंदी भाषेसाठी आग्रही असलेले हे विकास रामकिशुन कोण आहेत आपण जाणून घेऊ.
कोण आहेत विकास रामकिशुन?
विकास रामकिशुन यांना गुयाना मध्ये २०२५ मध्ये कृषि मंत्रालयात राज्यमंत्री म्हणून नियुक्त करण्यात आलं. गुयानातील हिंदी भाषिकांचा जो समुदाय आहे त्याचे ते प्रतिनिधी आहेत. विकास रामकिशुन यांनी दिल्ली विद्यापीठातून वाणिज्य शाखेची पदवी घेतली आहे. तर अर्थ या विषयावर मास्टर्स केलं आहे. त्यांचा हिंदीमध्ये आव्हान देणारा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला ज्यानंतर गुयानाच्या या खासदाराचं सोशल मीडियावरही कौतुक होतं आहे. सप्टेंबर २०२५ मध्ये विकास रामकिशुन यांनी गुयानाचे कृषी राज्यमंत्री म्हणून पदभार सांभाळला. विकास रामकिशुन हे तेव्हापासूनच भारत आणि गुयाना या दोन देशांमधले परस्पर सांस्कृतिक संबंध दृढ कसे होतील याकडे विशेष लक्ष देत आहेत. गुयाना या ठिकाणी भारतीय वंशाचे अनेक लोक राहतात, गुयानामध्ये हिंदी फक्त भाषा नाही तर त्यांची ओळख आहे. हिंदी भाषिकांचं प्रतिनिधित्व करणारे खासदार म्हणून विकास रामकिशुन यांना ओळख मिळालेली आहे.
विकास रामकिशुन यांचं सोशल मीडियावर कौतुक
विकास रामकिशुन यांचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर त्यांचं कौतुक होतं आहे. अनेकांना गुयानाच्या कृषी राज्यमंत्र्यांचा हा अंदाज आवडला आहे. गुयाना हा असा देश आहे ज्या ठिकाणी हिंदी भाषिकांची लोकसंख्या ही ३१ टक्के आहे.

