Who was Twisha Sharma : भोपाळमधील कटारा हिल्स भागात ३३ वर्षीय त्विशा शर्मा हिने गळफास घेत आत्महत्या केली. तिच्या पती आणि सासूने तिला रुग्णालयात नेले, तिथंच तिला मत घोषित करण्यात आलं. त्विषा हुंडाबळी ठरली असं सुरुवातीला वाटत असतानाच या प्रकरणाला आता वेगळं वळण लागलं आहे. त्विषा अंमली पदार्थांचं सेवन करत होती, तिला मानसिक आजार होते, असे अनेकविध आरोप तिच्या सासूने केले आहेत. तिची सासू ही माजी सेवानिवृत्त न्यायाधीश आहे. त्यामुळे या प्रकरणी अधिक चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, त्विशा कोण? हे जाणून घेऊयात.
त्विशा शर्मा कोण?
त्विशा शर्मा ही मूळची नोएडाची असून तिने २००९ ते २०१२ दरम्यान मॉडलिंग क्षेत्रात प्रेवश केला. कठोर परिश्रम, ग्रुमिंग आणि चिकाटीच्या जोरावर तिने मिस पुणे सौंदर्य स्पर्धेचे विजेतेपद पटकावले होते. हा तिच्या आयुष्यातील सर्वांत मोठा टर्निंग पाँइंट होता. कारण, यानंतरच तिच्यासाठी जाहिरात, मॉडलिंग आणि अभिनयाची दारे खुली झाली. त्विशाने व्यावसायिक जाहिरांतीमध्येही काम केलं आहे. तसंच तेलगू चित्रपटांतूनही ती झळकली. ‘मुग्गुरु मोनागल्लू’हा तिचा पहिला तेलगू चित्रपट होता. तर, २०१८ मध्ये तिने ‘जरा संभल के’ (Zara Sambhal Ke) नावाच्या लघुपटातही काम केले होते. तिच्याबरोबर काम करणाऱ्या अनेक सहकलाकारांनी तिच्या कामाचं कौतुकच केलं आहे. ती अत्यंत सर्जनशील, अभिव्यक्त आणि अत्यंत महत्त्वाकांक्षी व्यक्ती होती, असं सहकलाकारांनी म्हटलंय.
तिच्या नावाचं एक लिंक्डइन प्रोफाइलही सापडलं आहे. ते तिचं अधिकृत प्रोफाईल आहे की नाही याबाबत माहिती मिळू शकलेली नाही. मात्र, या प्रोफाईलनुसार, त्विशाने स्वतःचं वर्णन रेस्टॉरंट उद्योगातील मार्केटिंग व्यवस्थापनाचा अनुभव असलेली एक डायनॅमिक प्रोफेशनल म्हणून केले होते. या प्रोफाइलमध्ये तिच्या अभिनय आणि चित्रपट निर्मितीमधील आवडीचाही उल्लेख आहे. या प्रोफाइलनुसार, तिने जुलै २०१४ ते एप्रिल २०२० या काळात मुंबईतील ‘फ्लेव्हर पॉट फूड्स’मध्ये मार्केटिंग मॅनेजर म्हणून आणि त्यानंतर ‘जर्मन अकॅडमी ऑफ डिजिटल एज्युकेशन’ (DADB) मध्ये कम्युनिकेशन आणि ऑनबोर्डिंग मॅनेजर म्हणून काम केले होते. तिने २०१४ मध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून बीबीए आणि २०२४ मध्ये एनएमआयएमएस (NMIMS) मधून डिस्टन्स लर्निंगद्वारे एमबीए पूर्ण केले होते. याशिवाय ती एक प्रमाणित योग प्रशिक्षक आणि विपश्यना साधना करणारी होती. ती सध्या डीएडीबी जर्मनीच्या दिल्ली कार्यालयात कम्युनिकेशन आणि ऑनबोर्डिंग मॅनेजर म्हणून कार्यरत होती.
सहकलाकारांनी काय सांगितलं?
त्विशाच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त करताना, तिचा मुग्गुरु मोनागल्लू सहकलाकार धीक्षित शेट्टी म्हणाला, “ही खूप धक्कादायक बातमी आहे. ती एक समर्पित, मेहनती मुलगी होती. तिला ती जे काही करत होती त्याबद्दल प्रचंड आवड होती. ती खूप उत्साही होती आणि तिने आत्महत्या केली हे जाणून धक्का बसला आहे,” असे त्याने हिंदुस्तान टाइम्सला सांगितले. त्यांच्या चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर ते संपर्कात राहू शकले नाहीत, असे सांगून धीक्षितने खुलासा केला की, तिचे लग्न झाले आहे हे त्याला माहीतही नव्हते.
“आम्ही त्या एका चित्रपटावर काम केलं आणि मग ती तिच्या घरी परत गेली. तिने मला सांगितलं की तिला पदव्युत्तर पदवी करायची होती आणि अभिनय तिच्या अपेक्षेप्रमाणे नव्हता. तिच्या लक्षात आलं की हे क्षेत्र तिच्यासाठी नाही. त्यामुळे तिला फक्त परत जाऊन तिच्या कुटुंबासोबत स्थायिक व्हायचं होतं”, असंही त्याने पुढे सांगितलं.
लग्न झालं अन्…
त्विशाची एका डेटिंग अॅपद्वारे २०२४ मध्ये समर्थबरोबर ओळख झाली होती. या ओळखीचं रुपांतर त्यांनी लग्नात केलं. त्यांच्या लग्नाला दोन्ही कुटुंबातील सदस्यांनी होकार दिला. त्यानुसार, डिसेंबर २०२५ मध्ये त्विशा आणि समर्थ विवाहबद्ध झाले. मात्र, पाच महिन्यांतच त्विशाने स्वतःचं आयुष्य संपवलं. लग्नानंतर त्विशाला सतत छळाला सामोरे जावे लागत असल्याचा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे. लग्नाच्या सुरुवातीपासूनच तिच्यावर हुंड्यासाठी दबाव आणला जात होता.
वडिलांचा आरोप काय?
त्विशाचे वडील नवनिधी शर्मा यांनी असा आरोप केला आहे की, लग्नाच्या वेळी वराकडच्या मंडळींनी पैशांची तडजोड न झाल्यास लग्न मोडण्याची धमकी दिली होती. लग्नानंतर लगेचच हा छळ वाढला. हनिमून दरम्यान विमानाला उशीर झाल्याने समर्थने त्विशाला धक्का दिला होता. त्यांनी समर्थवर अंमली पदार्थांच्या सेवनाचा आरोप केला असून, याच कारणामुळे त्याला विधी महाविद्यालयातून (लॉ कॉलेज) काढून टाकण्यात आले होते, असंही म्हटले आहे.
त्विशाला सतत मानसिक छळ करून तिला निरुपयोगी आणि अक्षम असल्याची जाणीव करून दिली जात होती, असंही कुटुंबीयांनी सांगितले. त्विशाच्या कुटुंबीयांच्या आंदोलनानंतर, भोपाळ पोलिसांनी तिचा पती समर्थ सिंग आणि सासू गिरिबाला सिंग (सेवानिवृत्त जिल्हा न्यायाधीश) यांच्याविरुद्ध हुंडाबळी आणि छळाचा गुन्हा (FIR) दाखल केला आहे. सध्या समर्थ फरार असून, त्याच्या आईला अटकपूर्व जामीन मंजूर झाला आहे.
त्विशाचा भाऊ, मेजर हर्षित शर्मा यांनी सांगितलं की, मृत्यूच्या काही वेळ आधी तिने तिच्या आईशी फोनवर संवाद साधला होता आणि सासरच्या छळाविषयी सांगितले होते. याशिवाय, तिच्यावर गर्भपात करण्यासाठी आणि सुमारे २० लाख रुपयांचे शेअर्स व गुंतवणूक पती आणि सासरच्या नावावर करण्यासाठी दबाव आणला जात असल्याचा आरोपही कुटुंबीयांनी केला आहे. शवविच्छेदन (पोस्टामॉर्टम) अहवालानुसार, मृत्यूचे कारण फासामुळे झालेला मृत्यू (antemortem hanging by ligature) असे दर्शवण्यात आले आहे. तसेच तिच्या शरीरावर वेगवेगळ्या ठिकाणी मृत्यूपूर्व जखमांच्या खुणा आढळून आल्या आहेत. पोलिसांनी फॉरेन्सिक आणि डीएनए तपासणीसाठी व्हिसेरा, रक्त आणि नखांचे नमुने जतन केले असून घटनास्थळावरील इतर साहित्य जप्त केले आहे.
सासरच्या मंडळींचे प्रतिआरोप
त्विशाची सासू (सेवानिवृत्त न्यायाधीश) गिरीबाला सिंग यांनी असा दावा केला आहे की, त्विशा अंमली पदार्थांच्या आहारी गेली होती आणि भोपाळमध्ये तिच्यावर मानसोपचार सुरू होते. जामीन अर्जात असा दावा करण्यात आला आहे की, ड्रग्स न मिळाल्यास त्विशाला शारीरिक अस्वस्थता आणि थरथराट जाणवायचा आणि नोएडा येथे तिला अंमली पदार्थ सहज उपलब्ध होत असत. त्यांनी पुढे असाही आरोप केला की, गरोदरपणानंतर तिच्या वर्तनात बदल झाला होता आणि नोएडाहून परतल्यानंतर तिने गांजाचे सेवन केले होते. जास्त प्रमाणात ड्रग्ज घेतल्यामुळे (ओव्हरडोज) तिचा गर्भपात झाला होता आणि तिचे सासरचे लोक तिच्यावर मानसोपचार करत होते, असेही या अर्जात नमूद करण्यात आले आहे.
