Wing Commander Namansh Syal died in Tejas jet crash: दुबई एअर शो २०२५ मध्ये शुक्रवारी भारतीय बनावटीच्या विमानाच्या हवाई कसरती सुरू असताना तेजस लढाऊ विमानाचा अपघात होऊन विंग कमांडर नमांश सियाल (वय ३४) शहीद झाले. या बातमीनंतर हिमाचल प्रदेशमधील कांगडा जिल्ह्यातील नगरोटा बागवान गावावर शोककळा पसरली. शुक्रवारी स्थानिक वेळेनुसार दुपारी २.१० वाजता तेजस विमान कोसळले.
नगरोटा बागवान गावातील लोकांनी माध्यमांना सांगितल्यानुसार, विंग कमांडर सियाल हे त्यांच्या शिस्त आणि नम्रतेसाठी ओळखले जात होते. त्यांचे शालेय शिक्षण हमीरपूर जिल्ह्यातील सैनिकी शाळेत झाले. त्यांच्या पश्चात वृद्ध आई-वडील, भारतीय हवाई दलात अधिकारी असलेल्या पत्नी आणि सहा वर्षांची मुलगी असा परिवार आहे.
वडील सैन्यदलातून निवृत्त, पत्नी हवाई दलातील अधिकारी
नमांश सियाल यांचे वडील जगन नाथ सैन्य दलातून निवृत्त झाले आहेत. निवृत्तीनंतर त्यांनी हिमाचल प्रदेशच्या शिक्षण विभागात मुख्याध्यापक म्हणून काम केले होते. नमांश यांच्या आई बिना देवी या अपघातावेळी हैदराबाद येथे मुलगा आणि सून यांना भेटायला गेल्या होत्या. नमांश यांच्या पत्नी अफसान यादेखील हवाई दलात अधिकारी असून लवकरच त्याही विंग कमांडर होणार असल्याची माहिती समोर येत आहे.
तेजस विमानाच्या अपघातात नमांश सियाल यांचा मृत्यू झाल्याची बातमी कांगडा जिल्ह्यात पसरल्यानंतर ग्रामस्थ सियाल यांच्या घराजवळ येऊन थांबले. रात्री कुडकुडत्या थंडीतही अनेकांनी सियाल कुटुंबाच्या घराबाहेर थांबण्याचा निर्णय घेतला. सियाल यांच्या चांगुलपणाबद्दल गावकरी चर्चा करत होते.
नमांश सियाल यांचे मेहुणे रमेश कुमार यांनी एएनआयशी बोलताना सांगितले की, तो फक्त ३४ वर्षांचा होता. त्याला लवकरच बढती मिळणार होती. तो आता स्वाड्रन लीडरच्या पदावर पोहोचला होता. तो खूप नम्र व्यक्ती होता. त्याच्या जाण्याने संपूर्ण गावाला धक्का बसला आहे.
नमांश सयाल यांच्या दुर्दैवी मृत्यूनंतर संपूर्ण देशातून हळहळ व्यक्त होत आहे. हिमाचल प्रदेशचे नेते आणि केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनीही एक्सवर पोस्ट शेअर करत दुःख व्यक्त केले.
हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुखू यांनीही त्यांना श्रद्धांजली व्यक्त केली.
