Ayatollah Ali Khamenei Death अमेरिका आणि इस्रायलने केलेल्या संयुक्त कारवाईत इराणचे बडे नेते अयातुल्ला खामेनी यांचा मृत्यू झाला आहे. इराणचे सात टॉप कमांडरही या कारवाईत मारले गेले. खामेनी यांनी तीन दशकांहून अधिक काळ इराणचं नेतृत्व केलं. आता त्यांच्यानंतर इराणचा नवा नेता कोण असेल याची चर्चाही इराणमध्ये रंगली आहे.
नव्या नेत्याची घोषणा होईपर्यंत देशाचा कारभार कसा चालणार?
इराणचे सर्वात वरिष्ठ नेते खामेनी यांच्या मृत्यूनंतर आता इराणच्या संविधानातील अनुच्छेद १११ नुसार देशाचा कारभार पुढचा नेता निवडला जाईपर्यंत सुरु राहिल. इराणमध्ये नवे सर्वोच्च नेते निवडण्याची प्रक्रिया होईपर्यंत एक लीडरशिप काऊन्सिल तयार करण्यात आली आहे. यामध्ये राष्ट्रपती मसूद पेजेशकियन, सरन्यायाधीश गुलाम हुसैन मोहसेनी यांच्यासह इतरांचा समावेश आहे.
अयातुल्ला खामेनींच्या मुलाकडे इराणची सूत्रं जाणार?
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अयातुल्ला खामेनी यांचा मुलगा इराणचा नवा सर्वोच्च नेता असू शकतो. तसंच मोहसेन कोमी आणि अलीरेजा अराफी या दोन नावांचीही चर्चा आहे. सर्वोच नेत्याच्या निवडीचा अंतिम निर्णय असेंबली ऑफ एक्सपर्ट्स घेतात. असेंबली ऑफ एक्स्पर्ट्स ही ८८ मौलवींचा समावेश असलेली एक संस्था आहे. ही संस्था लवकरच नव्या सर्वोच्च नेत्याची नियुक्ती करणार आहे. एनडीटीव्हीने हे वृत्त दिलं आहे.
इराणच्या वृत्तसंस्थेनेही खामेनी यांच्या मृत्यूच्या बातमीला दिला दुजोरा
डोनाल्ड ट्रम्प आणि नेत्यानाहू यांनी सर्वात आधी अयातुल्ला खामेनी यांच्या मृत्यूबाबत पोस्ट केली होती. त्यानंतर इराणची सरकारी वृत्तसंस्था IRNA आणि प्रमुख वृत्त वाहिनी प्रेस टीव्ही यांनीही खामेनी यांच्या मृत्यूचं वृत्त दिलं. ज्यावेळी त्यांच्या कार्यालयावर क्षेपणास्त्रं डागण्यात आली तेव्हा खामेनी आपल्या कार्यालयातच उपस्थित होते. अयातुल्ला खामेनी अमेरिका आणि इस्रायलने केलेल्या संयुक्त कारवाईत ठार झाले आहेत अशी बातमी या दोहोंनी दिली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी घोषणा करत इतिहासातील सर्वात क्रूर व्यक्तीचा अंत झाला असं म्हणत पोस्ट लिहिली होती. तर आम्ही इराणच्या सर्वोच्च नेत्याला ठार केलं आहे असा दावा नेत्यानाहू यांनी केला.
इराणमध्ये ४० दिवसांचा दुखवटा
अयातुल्ला खामेनी यांच्या मृत्यूची बातमी आल्यानंतर इराण सरकारने ४० दिवसांचा दुखवटा जाहीर केला आहे. इस्रायल आणि अमेरिका यांनी संयुक्त कारवाई केली. इराणमध्ये खामेनी ज्या कार्यालयात होते त्यावर क्षेपणास्त्रांचा मारा केला. शिवाय त्यांच्या घरावरही हल्ला करण्यात आला. खामेनी यांच्या कार्यालयात ते बसले होते. क्षेपणास्त्र हल्ल्यात खामेनी मारले गेले. यानंतर इस्लामी रिवोल्युशनरी गार्ड कॉर्प्सचं वक्तव्य समोर आलं आहे. आम्ही एक महान नेता गमावला आहे असं IRGC ने म्हटलं आहे.
