Kerala Election Who will be Chief Minister: केरळ विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी एलडीएफ आघाडीचा पराभव होत असून काँग्रेसप्रणीत आघाडी यूडीएफ स्पष्ट बहुमत मिळवणार हे आता स्पष्ट झाले आहे. काँग्रेसने सर्वाधिक ६४ जागांवर आघाडी घेतली आहे. तर त्यांचा मित्र पक्ष इंडियन युनियन मुस्लिम लीगला २२ जागांवर आघाडी प्राप्त झाली आहे. दोन्ही पक्ष मिळून सत्ता स्थापन करतील. यामुळे केरळचा पुढचा मुख्यमंत्री कोण असेल? यावर चर्चा सुरू झाली आहे.
केरळ विधानसभेसाठी ९ एप्रिल रोजी मतदान झाले होते. यंदाच्या निवडणुकीत काँग्रेसप्रणीत आघाडीला चांगले यश मिळत आहे. याबाबत काँग्रेसचे नेते शशी थरूर यांनी माहिती दिली. ते म्हणाले, या विजयाची अनेक कारणे आहेत. दहा वर्षांपासून डाव्या पक्षांच्या सरकारला लोक कंटाळले होते. त्यामुळे सरकारविरोधातील नाराजी हे एक मोठे कारण होते.
एएनआय वृत्तसंस्थेशी संवाद साधत असताना शशी थरूर म्हणाले, आता भूतकाळातील झालेल्या गोष्टी विसरून आम्ही केरळच्या विकासाचा विचार करणार आहोत. केरळमधील युवकांना रोजगार मिळत नाही, त्यामुळे ते राज्य सोडून इतर ठिकाणी नोकरी करण्यास जातात. आम्ही राज्यात पुन्हा गुंतवणूक आणू शकलो, तर राज्यातच रोजगार प्राप्ती होईल.
केरळमध्ये गेल्या दशकात अतिशय वाईट राजकारण झाले. लोकांना या राजकारणाचा कंटाळा आला होता. त्यांना बदल हवा होता. काँग्रेस आणि यूडीएफने राज्याच्या प्रगतीचा विचार मांडला. जनतेशी संवाद साधत आम्ही आमचा विचार मांडला, ज्याला जनतेने पाठिंबा दिल्याचे दिसत आहे, असेही शशी थरूर म्हणाले.
एनडीटीव्हीशी बोलत असताना शशी थरूर पुढे म्हणाले, “एलडीएफ आघाडीचे नेते, मुख्यमंत्री पिनराई विजयन आणि त्यांचे आमदार लोकप्रिय असूनही लोकांनी त्यांना नाकारले. लोकांनी अतिशय चांगली परिपक्वता दाखवत मतदान केले आहे. आम्ही सहजपणे सरकार बनवत आहोत.”
मुख्यमंत्री कोण होणार?
एनडीटीव्हीशी बोलत असताना शशी थरूर यांना मुख्यमंत्री कोण होणार? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर थरूर म्हणाले, मला याबाबत काहीच कल्पना नाही. काँग्रेस पक्षाची कार्यपद्धती अशी आहे की, जिंकून आलेल्या आमदारांशी चर्चा केली जाते. त्यानंतर काँग्रेस अध्यक्षांना प्रस्ताव दिला जातो. त्यानंतर अंतिम निर्णय घेतला जातो.
थरूर पुढे म्हणाले की, यंदा केरळमध्ये यूडीएफ आघाडीला अभूतपूर्व यश मिळाले आहे. आम्ही ९९ जागांवर आघाडी घेतली आहे. अशी कामगिरी यापूर्वी कधीही झाली नव्हती.
कुणाची नावे चर्चेत?
व्हीडी सतीशन
मुख्यमंत्रीपदासाठी सतीशन, रमेश चेन्निथला आणि के. सी. वेणुगोपाल यांची नावे शर्यतीत आहेत. केरळमधील यूडीएफ आघाडीतील मित्रपक्ष असलेल्या इंडियन युनियन मुस्लीम लीगने (IUML) मुख्यमंत्रिपदासाठी थेट विधानसभेतील विरोधी पक्षनेते व्ही. डी. सतीशन यांच्या नावाला पाठिंबा जाहीर केला होता. काही सर्वेक्षणांमध्ये सतीशन हे काँग्रेसकडून मुख्यमंत्रिपदासाठी सर्वाधिक पसंतीचे उमेदवार असल्याचे समोर आले होते.
केसी वेणूगोपाल
व्हीडी सतीशन यांच्याशिवाय केसी वेणूगोपाल यांचे नावही चर्चेत आहे. अलाप्पुझा लोकसभा मतदारसंघातून त्यांनी विजय मिळवला होता. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तारिक अन्वर म्हणाले की, पक्षाचे सरचिटणीस केसी वेणूगोपाल यांना जर मुख्यमंत्री होण्याची इच्छा असेल तर त्यांना पक्षाच्या प्रक्रियेतून जावे लागेल.
रमेश चेन्नीथला
महाराष्ट्राचे प्रभारी राहिलेले रमेश चेन्नीथला यांचेही नाव मुख्यमंत्रीपदासाठी चर्चेत आहे. पिनराई विजयन यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या पहिल्या कार्यकाळात रमेश चेन्नीथला यांनी विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी सांभाळली होती. केरळच्या हरीपद विधानसभा मतदारसंघातून रमेश चेन्नीथला यांनी मोठा विजय प्राप्त केला आहे. त्यांना ६८,१८४ मते मिळाली आहेत. तर २३,३७७ च्या मताधिक्याने त्यांचा विजय झाला आहे.
