Donald Trump Iran Threat and intent of total destruction: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराण युद्ध सुरू झाल्यानंतर अनेकदा इराणला धमक्या दिलेल्या आहेत. मात्र मागच्या काही दिवसांपासून त्यांनी अधिक आक्रमक पवित्रा घेतल्याचे दिसून येते. होर्मुझ सामुद्रधुनी खुली करण्यासाठी ट्रम्प यांनी इराणला ४८ तासांची मुदत दिली होती. ही मुदत काही तासांत संपुष्टात येत आहे. दिवसभरात ट्रम्प यांनी इराणला अनेक इशारे दिले. मात्र काही वेळापूर्वी त्यांनी निर्वाणीचा इशारा दिला असून आज रात्री मोठा विनाश होणार असल्याचे सूतोवाच केले आहे. आजच्या रात्री इराणची संपूर्ण संस्कृती नष्ट होऊ शकते, असा दावा ट्रम्प यांनी केला आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी काही वेळेपूर्वी ट्रुथ या सोशल मीडिया साईटवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्यांनी या धमकीचा इशारा दिला. ते म्हणाले, आज रात्री एक संपूर्ण संस्कृती नष्ट होईल. जी पुन्हा परत कधीही आणता येणार नाही. असे व्हावे, अशी माझी बिलकुल इच्छा नाही. पण कदाचित ते होईलच.

“तथापि, आता पूर्ण सत्तापालट होत आहे. जिथे वेगळे, हुशार आणि कमी कट्टरतावादी विचारांच्या लोकांचे वर्चस्व असेल. ते कदाचित काहीतरी क्रांतिकारक अद्भुत असे घडवू शकतील, हे कुणालाही ठाऊक नाही. जगाच्या प्रदीर्घ आणि गुंतागुंतीच्या इतिहासातील आजच्या सर्वात महत्त्वाच्या रात्रीच ते कळू शकेल. ४७ वर्षांची लूटमार, भ्रष्टाचार आणि मृत्यूचे तांडव अखेर संपुष्टात येईल”, असेही ट्रम्प पुढे म्हणाले आहेत.

whole civilization will die tonight by trump
ट्रुथ पोस्टवरून डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला धमकी.

‘इराणच्या महान लोकांवर देवाचा आशीर्वाद असो’, असेही वाक्य या पोस्टच्या शेवटची ट्रम्प यांनी म्हटले आहे. यावरून ट्रम्प नेमके काय सूचित करू इच्छितात, याचा मात्र अंदाज नाही.

२८ फेब्रुवारी रोजी अमेरिका आणि इस्रायलने इराणवर हल्ले सुरू केले. यानंतर इराणने होर्मुझ सामुद्रधुनीचा मार्ग शत्रू राष्ट्र आणि त्यांच्या मित्र राष्ट्रांसाठी बंद केला. जगाला ऊर्जा पुरवठा होणारा हा महत्त्वाचा जलमार्ग पुन्हा खुला करण्यासाठी ट्रम्प यांनी ४८ तासांची मुदत इराणला दिली होती. ही मुदत संपण्यासाठी अवघे काही तास शिल्लक आहेत. या मुदतीत इराणने भूमिका न घेतल्यास मोठी लष्करी कारवाई करू, असा इशारा ट्रम्प यांनी दिला होता.

विशेष म्हणजे ट्रम्प यांनी यापूर्वीही इराणला अनेकदा मुदतवाढ दिली होती. यापूर्वी त्यांनी पहिल्यांदा इराणला पाच दिवसांची मुदत दिली होती. त्यानंतर मार्च अखेरीस आणखी १० दिवसांची भर त्यात घातली होती. ही मुदतवाढ सोमवारी संपल्यानंतर त्यांनी त्यात ४८ तासांची आणखी भर घातली होती. इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, ट्रम्प यांनी आतापर्यंत एकूण ४०८ तासांपर्यंत मुदत वाढवलेली आहे.

दरम्यान इस्रायलच्या हवाई दलाने इराणच्या हवाई सुरक्षा प्रणालीवर जोरदार हल्ला केला असल्याचा दाव करत त्याचा व्हिडीओ जाहीर केला आहे.

आज घडलेल्या मोठ्या घडामोडी

  • खार्ग बेटावर हल्ला: अमेरिका आणि इस्रायलने इराणच्या तेल निर्यातीमधील सर्वात महत्त्वाचे केंद्र असलेल्या खार्ग बेटावर मोठा हल्ला केला आहे. १० मार्च नंतर पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणात हल्ला झाला.
  • रेल्वेच्या जाळ्यावर हल्ले: इराणच्या रेल्वे पायाभूत सुविधांवर तीन ठिकाणी मोठे हल्ले झाले आहेत.
  • पायाभूत सुविधांना लक्ष्य करण्याची धमकी: ट्रम्प यांनी इराणमधील महत्त्वाचे पूल, वीज प्रकल्प यासारख्या पायाभूत सुविधा प्रकल्पांना लक्ष्य करण्याची धमकी दिली.
  • युद्धविराम प्रस्ताव फेटाळला: इराणने ४५ दिवसांचा युद्धविराम प्रस्ताव फेटाळला आहे. यापेक्षा कायमचा संघर्ष थांबवा, अशी मागणी त्यांनी केली आहे.