उन्हाळ्याच्या कडकडाटात घराला थंड ठेवणारा तुमचा लाडका AC (एसी) आता जीवघेणा ठरू लागला आहे. दिल्ली-NCR मध्ये अवघ्या ३ आठवड्यांत AC ब्लास्ट आणि शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या ३ भीषण आगींनी संपूर्ण देश हादरला आहे.
हौझ खास भागात राहणारे माजी आयएएस अधिकारी धनेंद्र कुमार यांचा त्यांच्याच घरातील एसीचा इनडोअर युनिट फुटल्याने आणि घरात धूर कोंडल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. यापूर्वी गाझियाबाद आणि विवेक विहार येथील आगीच्या घटनांमध्येही एसीचा ब्लास्ट कारणीभूत असल्याचा संशय आहे. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, या अपघातांमध्ये लोकांचा मृत्यू आगीत होरपळून नाही, तर एसीमधून निघणाऱ्या अत्यंत विषारी धुरामुळे गुदमरून झाला आहे.
एसीचे स्फोट वाढण्यामागची ही आहेत मुख्य कारणे –
सध्या देशात तापमान ४५ अंशांच्या पार गेले आहे. यामुळे एसीचे कॉम्प्रेसर आणि सर्किट्सवर प्रचंड ताण येत आहे आणि ते ओव्हरहीट होऊन फुटत आहेत. उष्णतेपासून वाचण्यासाठी लोक सलग १२ ते १८ तास एसी सुरू ठेवत आहेत. यंत्राला विश्रांती न मिळाल्यामुळे ते निकामी होत आहेत. वर्षानुवर्षे एसीची सर्व्हिसिंग न केल्याने त्यात धूळ जमा होते, ज्यामुळे हवा खेळती राहत नाही. गॅस लीक किंवा वायरिंग खराब झाल्याचे वेळेवर समजत नाही. एसी खूप जास्त वीज खेचतो. अनेकदा घरात जुने वायरिंग असते किंवा एसी थेट एक्स्टेंशन बॉक्सला जोडला जातो, ज्यामुळे शॉर्ट सर्किटचा धोका वाढतो.
स्वतःचा बचाव कसा करायचा? खालील या ८ गोष्टी नेहमी लक्षात ठेवा –
१. उन्हाळा सुरू होण्यापूर्वी तज्ज्ञ मेकॅनिक कडून एसीची गॅस लेव्हल, फिल्टर आणि कॉम्प्रेसर तपासून घ्या.
२. एसीसाठी नेहमी स्वतंत्र जड वायरिंग आणि योग्य क्षमतेचा MCB वापरा. कधीही एक्स्टेंशन कॉर्ड वापरू नका.
३. तुमचे घर जुने असेल तर उन्हाळ्यापूर्वी घरातील वीज पुरवठ्याची तपासणी करून घ्या.
४. एसीमधून विचित्र आवाज येणे, जळल्याचा वास येणे, वारंवार ट्रिप किंवा कुलिंग कमी होणे, ही धोक्याची घंटा आहे. असे झाल्यास एसी लगेच बंद करा.
५. रात्रीच्या वेळी आग लागल्यास स्मोक डिटेक्टर अलार्म वाजवून तुमचा जीव वाचवू शकतात.
६. घरात एक छोटे फायर एक्स्टिंग्विशर नक्की ठेवा, जेणेकरून सुरुवातीलाच आग विझवता येईल.
७. इमारतीचे जिने, गॅलरी किंवा टेरेसचे दरवाजे कधीही लॉक किंवा ब्लॉक करून ठेवू नका, जेणेकरून आपत्कालीन स्थितीत बाहेर पडता येईल.
८. घर बंद करून बाहेर जाताना किंवा दीर्घकाळ खोलीत नसताना एसी सुरू ठेवण्याची चूक करू नका.
