Asaduddin Owaisi statement India vs Pakistan cricket controversy: महिला आशिया चषक २०२६ च्या अंतिम सामन्यात श्रीलंकेवर ७२ धावांनी विजय मिळवत भारतीय महिला क्रिकेट संघाने जेतेपदावर नाव कोरले. मात्र सामन्यानंतर झालेल्या पारितोषिक वितरण सोहळ्यात पुन्हा एकदा राजकीय वाद पाहायला मिळाला. आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्या हस्ते विजयी चषक स्वीकारण्यास भारतीय महिला संघाने नकार दिला. २०२५ च्या पुरुष आशिया चषकादरम्यान भारताने घेतलेल्या भूमिकेचीच ही पुनरावृत्ती ठरली. या नाट्यमय घडामोडींनंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट संबंधांवरून देशात पुन्हा एकदा राजकीय वादंग उठले. यावर आता एमआयएमचे पक्षाचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे.
पाकिस्तानशी क्रिकेट सामने कशासाठी?
सीमेपलीकडून होणारा दहशतवाद आणि सुरक्षेचा प्रश्न अद्याप प्रलंबित असताना पाकिस्तानशी क्रिकेट खेळणे सुरू ठेवण्याच्या केंद्र सरकारच्या दुटप्पी भूमिकेवर ओवैसी यांनी ताशेरे ओढले. भारताची आंतरराष्ट्रीय मुत्सद्देगिरी आणि क्रीडा क्षेत्रातील धोरण यात विरोधाभास असू नये, अशी स्पष्ट भूमिका त्यांनी मांडली.
एएनआय वृत्तसंस्थेशी बोलत असताना ओवैसी म्हणाले, “जर भारत सरकारने सिंधू जल करार स्थगित केला आहे, तर मग पाकिस्तानबरोबर सामने कशासाठी खेळवले जात आहेत? आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या नियमांचे बंधन केवळ एकाच बाजूने का पाळले जाते? बीसीसीआयला टीव्ही प्रसारणाच्या हक्कांमधून हजारो कोटी रुपये कमवायचे आहेत. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यात आपल्या जवळच्या लोकांना गमावलेल्या निष्पाप कुटुंबांविषयी सरकारला जराही सहानुभूती राहिलेली नाही का?”
“बीसीसीआय देशातील नागरिकांना मूर्ख बनवत आहे. तुम्ही पैशांसाठी त्यांच्याशी क्रिकेट खेळता आणि नंतर म्हणता आम्ही हस्तांदोलन करणार नाही आणि त्यांच्याकडून चषक स्वीकारणार नाही. तुम्ही त्यांच्याबरोबरच खेळलातच का?”, असा प्रश्न त्यांनी विचारला.
लाल किल्ल्याबाहेर पाकिस्तानकडून स्फोट
पाकिस्तान आजही दहशतवादाला खतपाणी घालत असल्याचा आरोप करत ओवैसी यांनी लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटाचाही संदर्भही दिला. काही महिन्यांपूर्वी दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ आत्मघाती स्फोट झाला होता. हा स्फोटही पाकिस्तान पुरस्कृत संघटनांकडून करण्यात आल्या होता, असे ओवैसी म्हणाले. पाकिस्तानमधील संघटनांनी या स्फोटात सहभागी असलेल्यांना मदत केली होती. तरीही आपण त्यांच्याबरोबर क्रिकेट का खेळत आहोत. क्रिकेट खेळलो नाही तर आकाश कोसळणार नाही, असेही ते म्हणाले.
नेमका वाद काय?
महिला आशिया चषकाच्या अंतिम सामन्यात हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने श्रीलंकेचा पराभव केला. मात्र, पारितोषिक वितरण सोहळ्यात विजेतेपदाची ट्रॉफी मोहसीन नक्वी यांच्या हस्ते देण्यात येणार होती. नक्वी हे एसीसीच्या अध्यक्षपदासह पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे प्रमुख तसेच पाकिस्तानचे गृहमंत्रीदेखील आहेत.
नक्वी यांच्या हस्ते चषक स्वीकारण्यास बीसीसीआयने अंतिम सामन्यापूर्वीच स्पष्ट नकार दिला होता. त्यामुळे भारतीय खेळाडूंनी अधिकृत सोहळ्यात सहभाग न घेता मैदानावर चषकाशिवायच विजयोत्सव साजरा केला. या संपूर्ण प्रकरणावर भारतीय महिला संघाचे मुख्य प्रशिक्षक अमोल मुझुमदार यांनी स्पष्टीकरण देताना म्हटले की, बीसीसीआयच्या निर्णयाशी संघ सहमत आहे. तर राजकीय आणि सुरक्षेच्या पार्श्वभूमीचा विचार करूनच हा निर्णय घेण्यात आल्याचे बीसीसीआयचे सचिव देवजित सैकिया यांनी स्पष्ट केले.
