Why Atishi was AAP choice to Delhi CM: ईडीने मनी लाँडरिंग प्रकरणात अटक केल्यानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना नुकताच जामीन मिळाला. पाच महिन्यांनी दिल्ली विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे निवडणुकीपर्यंत आपण मुख्यमंत्रीपदावर राहणार नाही. त्यानंतर जनतेची इच्छा असेल तर ते पुन्हा निवडून देतील, अशी घोषणा करून अरविंद केजरीवाल यांनी मुख्यमंत्रीपद सोडण्याची इच्छा दोन दिवसांपूर्वी व्यक्त केली होती. त्याप्रमाणे आज त्यांनी मुख्यंमत्रीपदासाठी दिल्लीच्या शिक्षण मंत्री आणि ‘आप’च्या फायर ब्रँड नेत्या आतिशी मार्लेना सिंह यांच्या नावाची घोषणा केली. मात्र पक्षात अनेक वरिष्ठ नेते असताना आतिशी मार्लेना यांचीच निवड का झाली? त्यामागे कोणती कारणे आहेत? अशी चर्चा आता दिल्लीच्या राजकीय वर्तुळात सुरू आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आम आदमी पक्षाचे नेते गोपाल राय यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, आतिशी यांच्याकडे पक्षाने दोन प्रमुख जबाबदाऱ्या दिल्या आहेत. एक म्हणजे, दिल्लीच्या जनतेसाठी पक्षाने सुरू केलेले काम चालू ठेवणे. दुसरे म्हणजे, दिल्ली सरकारच्या धोरणांना भाजपाकडून नख लावण्याचा प्रयत्न केला जात आहे. हे प्रयत्न हाणून पाडण्याचीही जबाबदारी त्यांच्यावर आहे. आतिशी यांच्याकडे सध्या वित्त, शिक्षण आणि सार्वजनिक बांधकाम अशी प्रमुख खाती आहेत.

हे वाचा >> दिल्लीचा कारभार आतिशी यांच्या हाती; ‘या’ १६ महिला मुख्यमंत्र्यांनी केलंय विविध राज्यांचं नेतृत्व

गोपाल राय आणि कैलाश गेहलोत यासारखे वरिष्ठ नेते मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असतानाही पक्षाने आतिशी यांच्यानावावर का शिक्कामोर्तब केले? यावर आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. टाइम्स नाऊने दिलेल्या बातमीनुसार, अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल आणि विधानसभेचे अध्यक्ष राम निवास गोयल हेदेखील प्रमुख दावेदार समजले जात होते.

आतिशी यांची निवड पक्षाने का केली असावी?

घराणेशाहीला बगल देऊन गुणवत्तेवर निवड: केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल यांची मुख्यमंत्रीपदासाठी निवड केली जाणार अशी अटकळ बांधली जात असतानाच अरविंद केजरीवाल यांना धक्कातंत्राचा अवलंब करत आतिशी यांची निवड केली. यामुळे घराणेशाहीच्या आरोपांना त्यांनी बगल दिलीच, त्याशिवाय गुणवत्तेवर आधारित लोकशाही मार्गाने निवड केल्याचा संदेश दिला.

महिला सक्षमीकरणाचा संदेश: राज्यसभेच्या खासदार आणि ‘आप’च्या माजी नेत्या स्वाती मालिवाल यांना केजरीवाल यांच्या बिभव कुमार या खासगी सचिवाने मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणाचा राजकीय लाभ भाजपाने उचलला आणि केजरीवाल यांच्यावर टीका केली होती. आतिशी यांना आता मुख्यमंत्रीपद देऊन पक्षाने महिलांची सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न केला आहे, असे सांगितले जाते. महिलांची सुरक्षितता, सबलीकरण आणि त्यांच्या हक्कांसाठी ‘आप’ कार्यरत असण्याचा संदेश यातून देण्यात येत आहे. त्याचप्रमाणे आतिशी या केजरीवाल आणि माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या विश्वासू सहकारी असल्याचे मानले जाते.

हे वाचा >> Who is Atishi: दिल्लीच्या मुख्यमंत्री म्हणून निवड झालेल्या आतिशी कोण आहेत?

भाजपाच्या ३३ टक्के महिला आरक्षणाला प्रत्युत्तर: महिलांना विधानसभेत ३३ टक्के आरक्षण देण्यासाठी भाजपाचे प्रयत्न आहेत. या प्रयत्नांना राजकीय उत्तर आणि त्याहीपुढे जाऊन आम आदमी पक्षाने थेट महिलेकडेच मुख्यमंत्री पद दिले आहे. भाजपावर कुरघोडी करण्याची यानिमित्ताने ‘आप’ने संधी साधली, असा दावा करण्यात येत आहे.

कॅबिनेटमधील वजनदार खाती: ‘आप’चे ज्येष्ठ नेते मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन यांना कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागल्यानंतर मार्च २०२३ मध्ये आतिशी मार्लेना यांचा समावेश मंत्रिमंडळात करण्यात आला होता. वित्त, शिक्षण, सार्वजनिक बांधकाम, ऊर्जा, पर्यटन अशा १४ महत्त्वाच्या खात्यांचा भार त्यांच्याकडे आहे. त्यामुळे कॅबिनेटमधील वजनदार मंत्र्याकडे मुख्यमंत्रीपद देण्यात आले आहे.

स्वच्छ प्रतिमा: आम आदमी पक्षाचे मंत्री, नेते आणि स्वतः संयोजक अरविंद केजरीवाल यांना विविध आरोपांखाली तुरूंगवास भोगावा लागला आहे. त्यामुळे निवडणुकीत विरोधकांच्या प्रचाराची धार कमी करण्यासाठी स्वच्छ प्रतिमा आणि कोणतेही भ्रष्टाचाराचे आरोप नसलेल्या नेत्याची निवड आतिशी यांच्या रुपाने करण्यात आली आहे.

आतिशी नावापुढे आडनाव का लावत नाहीत? काय घडलं होतं २०१८ मध्ये? वाचा काय आहे पूर्ण नाव…

दिल्लीच्या शिक्षण मॉडेलच्या रचनाकार: दिल्ली विद्यापीठाच्या सेंट स्टीफन महाविद्यालयातून आतिशी यांनी शिक्षण घेतलेले आहे. तसेच ऑक्सफर्ड विद्यापीठातून त्यांनी उच्च शिक्षण घेतले होते. दिल्लीतील शिक्षण व्यवस्थेत आमूलाग्र बदल घडवून आणण्यासाठी त्यांनी महत्त्वाचे योगदान दिले, असे सांगितले जाते. माजी शिक्षण मंत्री मनीष सिसोदिया यांच्या सल्लागार म्हणून त्यांनी २०१८ पर्यंत काम केले होते. त्या सल्लागार असताना दिल्ली सरकारच्या शासकीय शाळांमध्ये आनंददायी अभ्यासक्रम आणि उद्योजक मानसिकता अभ्यासक्रम राबवविला गेला होता. ज्यामुळे विद्यार्थ्यांच्या मानसिक स्वास्थ्याबरोबरच त्यांच्यात कौशल्य निर्माण करण्यास मदत झाली.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why arvind kejriwal chose atishi marlena singh as new chief minister of delhi know facts and politics kvg