Iran Qatar Gas Plant Attack impact on India: कतारच्या सर्वात मोठ्या द्रवीकृत नैसर्गिक वायू (एलएनजी) प्रकल्प असलेल्या रास लफानवर इराणने क्षेपणास्त्र हल्ला केल्यानंतर जगावर ऊर्जा संकट अधिक गडद होण्याचा धोका निर्माण झाला आहे. जगातील सर्वात मोठ्या एलएनजी प्रकल्पावर हल्ला झाल्यामुळे आता या ठिकाणचे उत्पादन थांबविण्यात आले आहे. २८ फेब्रुवारी रोजी सुरू झालेले युद्ध आता २० दिवसांनी तेल युद्धात बदलले आहे. मागच्या २४ तासांत इराण आणि इस्रायलने जीवश्म इंधन ऊर्जेच्या उत्पादनाशी संबंधित प्रकल्पावर प्रथमच हल्ले सुरू केले आहेत. ज्यामुळे आता जागतिक पातळीवर ऊर्जा संकट उभे राहण्याची शक्यता आहे. त्यातही भारतावर याचा वाईट परिणाम होऊ शकतो असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
भारतासाठी वाईट बातमी का?
भारत ८८ टक्क्यांपेक्षा जास्त कच्चे तेल आयात करतो. तर गॅस आयातीवर भारताचे अवलंबित्व ५० टक्क्यांहून अधिक आहे. कतारकडून भारतात सर्वाधिक गॅस आयात होतो. युद्धामुळे गॅस आयात आधीच विस्कळीत झाली होती. भारताच्या एकूण एलपीजी (द्रवीकृत पेट्रोलियम गॅस) गॅसपैकी कतारमधून एक तृतीयांश आयात होते, तर एलएनजीची (द्रवीकृत नैसर्गिक वायू) ५० टक्के आयात कतारमधून होते.
कतारमधील गॅस उत्पादन प्रकल्पाला लक्ष्य केल्यामुळे भारताच्या आयातीवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे भारताला आपला वायू वापर कमी करावा लागू शकतो. भारतात सध्या दैनंदिन नैसर्गिक वायूचा वापर १८९ दशलक्ष मेट्रिक मानक घनमीटर प्रतिदिन (MMSCMD) आहे. यापैकी ९७.५ दशलक्ष मेट्रिक मानक घनमीटर वायूचे उत्पादन देशांतर्गत होते.
युद्धाच्या काही दिवसानंतर होर्मुझच्या सामुद्रधुनीतील अडथळ्यामुळे इंधनाची वाहतूक विस्कळित झाली. ही तुलनेने तात्पुरती चिंतेची बाब होती. पण आता कतारच्या रास लफान प्रकल्पावर झालेला हल्ला मोठी हानी आहे. कारण संघर्ष थांबल्यानंतरही उत्पादन सुरळीत होण्यास बराच काळ लागेल.
युद्ध संपल्यानंतर रास लफान प्रकल्पावर झालेल्या इराणी हल्ल्यातील नुकसानाच्या प्रमाणावर भारतापुढील समस्या अवलंबून असतील. या प्रकल्पातून होणारा एलएनजी आणि पीएनजीचा पुरवठा हा प्रकल्पाच्या दुरूस्तीवर अवलंबून असेल.
साउथ पार्स गॅसफिल्डवरील हल्ल्यानंतर इराण आक्रमक
इस्रायलने इराणच्या सर्वात मोठ्या साउथ पार्स गॅस फिल्डवर हल्ला केल्यानंतर त्याच्या प्रत्युत्तरात इराणने कतारच्या वायू प्रकल्पाला लक्ष्य केले. कतार, यूएई आणि सौदी अरेबियातील ऊर्जा प्रकल्पांना लक्ष्य केले जाईल, असा इशाराही इराणने दिला होता. विशेष म्हणजे इराणचा साउथ पार्स गॅस प्रकल्पही भारतासाठी महत्त्वाचा आहे. इथूनही भारताला एलएनजीचा पुरवठा होत असतो.
इस्रायलच्या साउथ पार्सवरील हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेला या हल्ल्यापासून दूर ठेवले आहे. हा हल्ला पूर्णपणे इस्रायलचा निर्णय असल्याचा दावा त्यांनी केला.
