Ayatollah Ali Khamenei Funeral: इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या अंत्यविधीला तब्बल चार महिन्यांनी (१३१ दिवसांनी) सुरुवात झाली आहे. अमेरिका – इस्रायलबरोबर सुरू संघर्षामुळे खामेनी यांचा अंत्यविधी रखडला होता. अमेरिका -इस्रायलने केलेल्या हवाई हल्ल्यात २८ फेब्रुवारी रोजी तेहरानमधील निवासस्थानी ८६ वर्षीय खमेनी यांचा मृत्यू झाला होता. खामेनी यांच्या अंत्यविधीला सुरुवात झाली असून, जगभरातून दहा लाख नागरिक हजेरी लावण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दफनविधी लांबणीवर का पडला?

इस्लामिक परंपरेनुसार मृत्यूनंतर २४ तासांच्या आत दफनविधी करणे आवश्यक मानतात. पण, युद्धजन्य परिस्थितीमुळे खामेनी यांच्या पार्थिवाचा दफनविधी लांबणीवर पडला. या काळात धार्मिक गोष्टींचे पालन व्हावे यासाठी खामेनी यांचे पार्थिव शीतगृहात सुरक्षित ठेवण्यात आले होते. खमेनी यांच्या मृत्यूनंतर अमेरिका आणि इस्रायलचे इराणवर हल्ले सुरुच होते. युद्धजन्य परिस्थितीत दफनविधीसाठी नागरिकांना गोळा करणे आणि त्यांना सुरक्षित ठवणे अशक्य होते. युद्धविराम झाल्यानंतर आणि नुकत्याच सामंजस्य करारावर स्वाक्षरी झाल्यानंतर इराणने दफनविधी घेण्याचा निर्णय घेतला.

सुरक्षेची कारणे

इस्रायलकडून संभाव्य हल्ल्यांच्या धास्तीमुळे अनेक महत्त्वाच्या नेत्यांनी अयातुल्ला यांच्या दफनविधीत सहभागी न होण्याचा निर्णय घेतला. अयातुल्ला अली खामेनी यांचे पुत्र मोजतबा खामेनी देखील सुरक्षेच्या कारणास्तव वडिलांच्या अंत्यविधीला उपस्थित राहणे टाळले आहे. यापूर्वी १९८९ मध्ये अयातुल्ला रुहोल्ला खोमेनी आणि २०२० मध्ये कासिम सुलेमानी यांच्या अंत्ययात्रेत चेंगराचेंगरी होऊन अनेकांनी जीव गमवला होता. अशी घटना पुन्हा होऊ नये यासाठी देखील इराण सरकारकडून काळजी घेतली जात होती आणि त्यासाठी नियोजन केले जात होते.

खामेनींचा मृतदेह एवढे दिवस कुठे होता?

इस्लामी कायद्यानुसार मृतदेहावर रासायनिक प्रक्रिया करण्यास मनाई आहे. त्यामुळे खमेनी यांचे पार्थिव टिकवून ठेवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला. खमेनी यांचे पार्थिव फॉरेन्सिक शवागृहातील शीतगृहात ठेवण्यात आले होते. २८ फेब्रुवारीच्या हवाई हल्ल्यात खामेनी यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील काही सदस्यांचाही मृत्यू झाला होता. त्या सर्वांचे पार्थिव देखील याच शीतगृहात एकत्र ठेवण्यात आले होते. आज (३ जुलै) अयातुल्ला खामेनी आणि त्यांच्या नातेवाईकांचे पार्थिव तेहरानच्या भव्य ‘मोसल्ला मशीद’ संकुलात आणण्यात आले.

कधी होणार दफनविधी?

सध्या अयातुल्ला अली खामेनी यांचे पार्थिव मोसल्ला मशीद संकुलात अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आले आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, इराण आणि इराकच्या पाच प्रमुख शहरांमधून खामेनी यांची अंत्ययात्रा काढण्यात येणार आहे. यानंतर ९ जुलै रोजी त्यांच्या मूळ गावी मशहाद येथील इमाम रेझा दर्गा परिसरात त्यांच्या पार्थिवाचा दफनविधी पार पडेल.