Why Annamalai Quits BJP: भारतीय जनता पार्टीचे दक्षिणेतील फायरब्रँड युवा नेते अण्णामलाई यांनी अखेर पक्षाचा राजीनामा दिला. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी अण्णामलाई यांचा राजीनामा स्वीकारला आहे. “तमिळनाडूचे माजी प्रदेशाध्यक्ष अण्णामलाई यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला असून, पक्षाने तो स्वीकारला आहे”, असे भाजपाने प्रसिद्ध केलेल्या अधिकृत प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. दरम्यान, अण्णामलाई यांनी पक्ष सोडताना मनातील खदखद बोलून दाखवली आहे.

अण्णामलाईंनी स्पष्ट केली भूमिका

अण्णामलाई यांनी दिलेल्या राजीनामापत्रात पक्ष सोडण्यामागील भूमिका मांडली आहे. “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून प्रेरणा घेऊन सहा वर्षापूर्वी, तमिळनाडूच्या राजकारणात बदल करण्याच्या उद्देशाने आणि त्यात सकारात्मक बदल घडविण्यासाठी मी भाजपात प्रवेश केला. राजकारण उच्चभ्रू आणि ठराविक लोकांसाठी असून, सामान्य नागरिकांसाठी नाही हा समज दूर करायचा होता”, यासाठी पक्षाने माझ्या विश्वास ठेवल्याबाबत अण्णामलाई यांनी भाजपा नेतृत्वाचे आभार मानले.

कारण क्रमांक १

“राष्ट्रीय पक्षांनी तामिळनाडूतील लोकांना समजेल अशा भाषेत कधीही संवाद साधला नाही”, असे म्हणत अण्णामलाईंनी भाषेचा मुद्दा अधोरेखित केला. भाषेच्या मुद्यावर काम करत असताना अंतर्गत व बाह्य अशा दोन्ही बाजूंनी आलेले अनेक अडथळे आणि विरोधाचा सामना केल्याचा उल्लेख अण्णामलाई यांनी केला आहे. तरी देखील त्यात बऱ्यापैकी यश आल्याचे अण्णामलाई म्हणाले. तमिळनाडूमध्ये अनेक वर्षापासून सुरु असणाऱ्या राजकारणाला येथील जनात कंटाळली असल्याचेही अण्णामलाई यांनी राजीनामापत्रात म्हटले आहे.

कारण क्रमांक २

“तामिळनाडूबाबत आमचे दृष्टिकोन जुळत नाहीत”, असा खुलासा अण्णामलाई यांनी राजीनाम्यात केला आहे. “पक्षश्रेष्ठींशी झालेल्या अनेक चर्चांची आणि गेल्या १८ महिन्यांत मी व्यक्त केलेल्या असहमतीची आठवण करून देऊ इच्छितो. तामिळनाडूमध्ये विकासाभिमुख आणि सांस्कृतिकदृष्ट्या रुजलेल्या राजकारणाच्या पुढील वाटचालीबाबतच्या माझ्या विचारांचा आणखी भार पक्षश्रेष्ठींवर टाकायचा नाही. वरिष्ठ नेतृत्वाशी झालेल्या संभाषणांनंतर, मी या निष्कर्षाप्रत पोहोचलो आहे की तामिळनाडूबाबत आमचे दृष्टिकोन जुळत नाहीत”, असे अण्णामलाई यांनी म्हटले आहे.

आत्मपरीक्षण करण्याची वेळ – अण्णामलाई

​मला आता पक्षाबाहेर पडण्याची, राजकारणात प्रवेश करण्याच्या माझ्या मूळ उद्देशावर आत्मपरीक्षण करण्याची आणि भविष्यात वारे ज्या दिशेने नेतील त्या दिशेने प्रवास करण्याची वेळ आली आहे, असे अण्णामलाई यांनी राजीनाम्याच्या अखेरीस म्हटले आहे. खूप विचार केल्यानंतर हा निर्णय घेतल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.